मर्म : स्वप्नांवर क्रूर घाव

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 मे 2019

जळगाव जिल्ह्यातील पायल तडवी या युवतीला "एमबीबीएस'ला प्रवेश मिळाला, तेव्हा तिने अनेक स्वप्ने बघितली असणार. डॉक्‍टर तर ती झालीही आणि पुढे ती मुंबईच्या सुप्रतिष्ठित नायर मेडिकल कॉलेजमधून "एमडी'ही करीत होती; पण तेथे तिला अनन्वित मानसिक छळाला सामोरे जावे लागले. त्याची परिणती अखेर तिने आत्महत्या करण्यात झाली.

जळगाव जिल्ह्यातील पायल तडवी या युवतीला "एमबीबीएस'ला प्रवेश मिळाला, तेव्हा तिने अनेक स्वप्ने बघितली असणार. डॉक्‍टर तर ती झालीही आणि पुढे ती मुंबईच्या सुप्रतिष्ठित नायर मेडिकल कॉलेजमधून "एमडी'ही करीत होती; पण तेथे तिला अनन्वित मानसिक छळाला सामोरे जावे लागले. त्याची परिणती अखेर तिने आत्महत्या करण्यात झाली. तिच्याच तीन सहाध्यायी डॉक्‍टर महिला तिला कायम तिच्या जातीवरून उपरोधिक बोलत आणि तसे मेसेजेसही पाठवीत. तिला तो छळ असह्य झाला आणि पायलने अखेर आपले जीवन संपविले. "मुलगी शिकली, प्रगती झाली!' असे वाक्‍य आपल्याला सतत सामोरे येत असते. मात्र, उच्चविद्याविभूषित असूनही मनाची कवाडे बंद असलेल्या काही स्त्रियांनीच एका स्त्रीचा असह्य छळ करावा, ही बाब धक्कादायक आहे.

तीन सहकारी महिला डॉक्‍टर पायलचा मानसिक छळ करत होत्या, असे तिच्या आईनेच सांगितले आहे. आपण त्यासंबंधात अनेकदा तक्रारीही केल्या होत्या आणि "नायर'च्या डीनची भेटही मागितली होती; मात्र आपल्याला त्यांना भेटू देण्यात आले नाही, असेही पायलची आई सांगते. हा सारा प्रकार संतापजनक तर आहेच; शिवाय एकविसाव्या शतकातही जातीच्या उतरंडीतून आपण बाहेर पडायला कसे तयार नाही, याचीच साक्ष देत आहे. आता पोलिसांनी पायलच्या या तीन सहाध्यायी डॉक्‍टरांविरोधात पायलला आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपाखाली गुन्हेही नोंदवले आहेत. मात्र, त्या तिघी तातडीने फरार झाल्या आहेत. त्यांचा शोध घेणे, ही तर पोलिसांची पहिली जबाबदारी आहे. मात्र, केवळ त्यांचा शोध घेणे आणि त्यांना या मानसिक छळाच्या गुन्ह्याबद्दल शिक्षा होणे, एवढ्याने हा विषय संपत नाही. ज्या महिला डॉक्‍टर आपल्या सहाध्यायी विद्यार्थिनीचा केवळ ती आदिवासी वा मागासवर्गीय आहे, म्हणून इतका टोकाचा छळ करू शकतात; त्या डॉक्‍टर झाल्यानंतर आपल्याकडे येणाऱ्या अशाच मागासवर्गीय रुग्णांना कशी वागणूक देतील, याचाही विचार व्हायला हवा.

खरे तर या तिघींना डॉक्‍टर म्हणून समाजात खुलेआम "प्रॅक्‍टिस' करण्यावरच मेडिकल कौन्सिलने बंदी घालायला हवी. तरच यापुढे असे प्रकार टळू शकतील आणि मागासवर्गांतून पुढे येणाऱ्या युवक-युवतींना समाजात मानसन्मान मिळू शकतील. या तिघी किरकोळ शिक्षा होऊन, समाजात पुन्हा डॉक्‍टर म्हणून मान वरून जगू लागल्या, तर हे असे प्रकार पुढेही सुरूच राहतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Editionl Article on Marm