महागुरूंचा महामार्ग…!

न अस्कार! कोथरुडच्या वाहतुकीतून पोहत पोहत टिळक रोडवर निघायचं, आणि तिथंही हात मारत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इमारतीत शिरायचं, हे काही सोप्पं नाही.
 pune traffic maharashtra day sachin pilgaonkar
pune traffic maharashtra day sachin pilgaonkarSakal

न अस्कार! कोथरुडच्या वाहतुकीतून पोहत पोहत टिळक रोडवर निघायचं, आणि तिथंही हात मारत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या इमारतीत शिरायचं, हे काही सोप्पं नाही. पण केवळ महागुरु श्री. रा. सचिन पिळगावकर यांना ‘बघण्या’साठी मी हा खटाटोप केला.

त्यांच्या पुढ्यात जायचं या कल्पनेनं अंगावर शहारा आला. ठेवणीतला ड्रेस काढून ठेवलाच होता. आदल्या दिवशी, महाराष्ट्रदिन पार पडला असल्याने पार्लरची व्हिजिटही आयतीच झाली होती. साग्रसंगीत नटून थटून गेल्ये…

निधी आणि सुशील पोद्दार यांनी आपल्या मुलाच्या, दिव्यांशच्या कठीण जीवनसंघर्षावर एक पुस्तक लिहिलं आहे.- ‘‘ब्लेझ…ए सन्स ट्रायल बाय फायर : ए ट्रू स्टोरी’ हे त्याचं नाव. पुस्तक मनोज्ञ आहे. प्रत्येकानं वाचायलाच हवं असं.

…पण पुस्तक इंग्रजीत असलं तरी पुण्यात चालणार नाही, असं वाटून रुपा पब्लिकेशननं त्याचा मराठी अनुवाद आणून टाकला. त्याचंही नाव ‘ब्लेझ’च. त्या पुस्तकाचं प्रकाशन सचिनजींच्या हस्ते झालं. ‘ब्लेझ म्हंजे काय’ असं मी सभागृहात एकदोघांना विचारुन पाहिलं. त्यांनी ‘शुऽऽ…शुऽऽ…गप्प बसा, आम्हाला ऐकू द्या’ असा अनुवाद सांगितला. जाऊ दे.

प्रमुख पाहुणे होते नेहमीचे हसतमुख (आणि कोटधारी) प्रा. मिलिंद जोशीसर. आणि सन्माननीय वक्त्या होत्या नेहमीच्याच हसतमुख अरुणाताई ढेरे. मधोमध उभी होती उत्सवमूर्ती! माय डिअर सऽऽचिऽऽन सचिन ....सऽऽचिऽऽन…सचिन पिळगावकर.

प्रकाशनाच्या प्रती मंचावर यायला अंमळ उशीर झाला, तेव्हा कुठल्याही क्षणी ते ‘एक्कापेक्षा एक्क बेबी..’ सुरु करुन स्टेप्स टाकतील की काय, असं वाटू लागलं. पिळगावकरजींनी प्रकाशन कार्यक्रमातच ‘‘माझं वाचन फारसं नाही’’ असा कबुलीनामा बोली स्वरुपात दिला.

(बोली स्वरुपात, लेखी नव्हे, प्लीज नोट. ते लिहितही नसावेतच!!) त्यांचं सगळं शिक्षण वयाच्या चौथ्या वर्षापासून सुरु झालंय. वयाचं भान येण्यापूर्वीच त्यांच्याकडे दोन दोन राष्ट्रीय पुरस्कार आले होते. वाचन लागतंच कशाला?

ते बेजोड कलाकार आहेतच. पुढे त्यांनी चित्रपटनिर्माता म्हणूनही कारकीर्द घडवली. ते स्वत: उत्तम गजला गातात. अप्रतिम, जायकेदार ऊर्दू जबान त्यांच्या जुबांवर आहे. पण एवढं पुरलं नाही गृहस्थाला! नृत्यकलेत तर ते महागुरु आहेत, महागुरु!! माझं सगळं ज्ञानार्जन ‘ऐकून’ आणि ‘पाहून’ झालं आहे, असं त्यांनी सांगितलं. (हातातल्या पुस्तकाचं काय करायचं, असा प्रश्न उपस्थितांना तेव्हा पडला.)

महागुरु स्वत: वाचत नसले तरी त्यांनी आत्मचरित्र मात्र आवर्जून लिहिलंय. –‘हाच माझा मार्ग’ हे त्याचं नाव. अभिजीत पेंढारकरांनी त्याचं संपादन किंवा शब्दांकन वगैरे केलेलं आठवतं. पुढलं काहीही (मेलं) आठवत नाही.

कार्यक्रमापूर्वी ‘मसाप’च्या वरच्या कोहिनूर हॉलमध्ये अल्पोपाहाराची व्यवस्था होती. मी तातडीनं तिकडेच गेल्ये. साक्षात सचिनजी हसतमुखाने बसलेले होते. समोर जोशीसर त्यांना काँप्लेक्स देत काहीतरी विनोदी बोलत होते.

(या गृहस्थाचं वय एकदा विचारायला हवं!!) तेवढ्यात सँडविच आणली गेली. सचिनजींनी त्याकडे पाहिलंही नाही. पुण्यात सँडविच कोण खाईल? ‘मसाप’वाले हुशार, त्यांनी मागाहून बटाटेवड्याच्या प्लेटी आणल्या. वडे बघून सचिनजी एक हात वर करुन ओरडले : ‘‘माझ्या आवडीचे पदार्थ मी नेहमीच खातो!’’

कार्यक्रमानंतर मी त्यांना भेटले. त्यांनी मला विचारलं, माझं ‘‘हाच माझा मार्ग’ वाचलंय का?’’ मी नाही म्हटलं. त्यांनी मिलिंद जोशीसरांकडे पाहिलं, त्यांनी मोबाइल कानाला लावला. (गृहस्थ कमालीचा हुशार!!) अरुणाताईंनी सत्यनिष्ठेनं नकारार्थी मान हलवली.

‘‘माणसानं वाचलं पाहिजे…चौथी एडिशन कशी खपणार?.’’ असं पुटपुटत सचिनजी निघून गेले, आणि टिळक मार्गाला लागले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com