‘भारत जोडो’चे नेमके उद्दिष्ट काय? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi

‘भारत जोडो’चे नेमके उद्दिष्ट काय?

राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ केरळमधून सुरू झाली आहे. भाषणांमधून भाजप, रा.स्व.संघ आणि पंतप्रधान मोदींवर ते नेहमीच्या पद्धतीने जहरी टीका करतात; पण, ‘भारत जोडो’ म्हणजे नेमके काय, याबद्दल काहीच बोलत नाहीत. भारत आपण कसा जोडू पाहात आहोत, हेदेखील त्यांनी स्पष्ट केले पाहिजे.

कोणत्याही व्यक्तीचे बोलणे आणि प्रत्यक्ष कृती किंवा व्यवहार यात बरेच अंतर पडते, याचा अनुभव आपण अनेकदा घेतो. पुष्कळदा असाही अनुभव येतो की, एखादी व्यक्ती एखादा इरादा मनात ठेवून बोलते; पण प्रत्यक्षात तिच्या बोलण्यापेक्षा विपरीत घडते. काँग्रेसचे अनधिकृत सर्वेसर्वा राहुल गांधी सध्या हा अनुभव घेत आहेत किंवा असेही म्हणता येईल की त्यांच्या बाबतीत संपूर्ण देश हा अनुभव घेत आहे.

सध्या राहुल गांधी ‘भारत जोडो’ यात्रा करीत आहेत. आठ सप्टेंबर रोजी त्यांनी कन्याकुमारी येथून सुरु केलेली ही यात्रा १५० दिवसांमध्ये ३५०० किलोमीटर प्रवास करून काश्मीरमध्ये श्रीनगर येथे समाप्त होईल. तमिळनाडूमधून सुरु झालेली ही यात्रा बारा राज्यांमधून जाईल. केरळमध्ये सर्वात जास्त म्हणजे १९ दिवस यात्रा राहणार असून उत्तर प्रदेशमध्ये केवळ दोन दिवस असणार होती. पण हल्ली आलेल्या बातम्या बरोबर असतील तर आता ती यात्रा मूळ कार्यक्रम बदलून उत्तर प्रदेशमध्ये पाच दिवस असेल. महाराष्ट्राच्या केवळ सहा लोकसभा मतदारसंघांतून सोळा दिवस प्रवास करेल, पण गुजरातमध्ये जाणार नाही. २०२४ मधील लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राहुल गांधी आणि काँग्रेसने हा कार्यक्रम आखला आहे, असे म्हटले जाते. ‘मी या यात्रेचे नेतृत्व करत नसून त्यात सहभागी झालो आहे’, असे राहुल गांधी यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले असले तरी काँग्रेसच्या म्हणण्यानुसार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली ही यात्रा सुरु आहे.

ही यात्रा ज्या भारत जोडण्याच्या उद्देशाने सुरु केली, तो मात्र कोणालाही कळलेला नाही. राहुल गांधी त्यांच्या भाषणात भाजप, रा.स्व.संघ आणि पंतप्रधान मोदींवर नेहमीच्या पद्धतीने जहरी टीका करतात; पण, ‘भारत जोडो’ म्हणजे काय? याबद्दल काहीच बोलत नाहीत. भारत कसा तुटला किंवा तोडण्याचे प्रयत्न होताहेत आणि आपण तो कसा जोडू पाहात आहोत, हे राहुल गांधींनी स्पष्ट केले पाहिजे. पण त्याबद्दल ते अवाक्षरही बोलत नाहीत. कदाचित याबाबतीत ते शब्दांपेक्षा प्रत्यक्ष कृतीतून बोलत असावेत. कारण त्यांच्या यात्रेत ते ख्रिश्चन बांधवांच्या भेटी आवर्जून घेतात, त्यांच्या धर्मगुरुंचे मार्गदर्शन घेतात.

मुस्लिम मौलवींना भेटतात, त्यांच्याबरोबर चर्चा करतात. हिजाब घातलेल्या मुलीला सोबत घेऊन चालतात. पण, कोणा हिंदू साधू-संतांना अथवा धर्माचार्यांना ते भेटल्याचे अद्याप तरी वाचनात नाही. वास्तविक कन्याकुमारीपासून सुरुवात करताना तेथील अधिष्ठात्री देवता कन्याकुमारी, देवी अम्मनचे दर्शन, रामेश्वर येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन राहुल गांधी घेऊ शकले असते. कन्याकुमारीच्याच सागरातील विवेकानंद स्मारकाची शिला आणि तिरुवल्लूवर स्मारकाचे दर्शनही घेता आले असते. पण त्यांनी तसे केले नाही.

कांची कामकोटीच्या शंकराचार्य मठात जावून शंकराचार्यांशी चर्चा करणे, आद्य शंकराचार्यांच्या जन्मस्थानाचे दर्शन घेणे यापैकी काहीही त्यांना करावेसे वाटले नाही. बहुधा त्यांच्या कल्पनेतील भारतात देवी अम्मन, रामेश्वर, आद्य शंकराचार्य, तिरुवल्लूवर, स्वामी विवेकानंद अशांसारख्या कोणालाही स्थान नसावे. ही यात्रा सुरु झाल्यानंतर देशभरात नवरात्रीचा उत्सव साजरा होतोय. पण त्यांनी नवरात्रीनिमित्ताने ट्विटरवर शुभेच्छा दिल्याचेही पाहण्यात नाही. उलट, अत्यंत खालच्या थराला जाऊन हिंदू धर्मीयांवर आणि भारतमातेवर टीका करणारा फादर जॉर्ज पोनय्या यांची मात्र राहुल गांधींनी आवर्जून भेट घेतली. त्यांच्याबरोबर चर्चा केली. हिंदूंचे अस्तित्व संपवण्याची भाषा वापरणाऱ्या सलाफी मौलवींची भेट घेण्यासाठी राहुल गांधी मशिदीतही जाऊन आले. एकूणच ‘मी शिवभक्त जनेऊधारी दत्तगोत्री ब्राह्मण आहे’ असे म्हणत हिंदू समाजाची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणारे राहुल गांधी आता आपली खरी मानसिकता दाखवत आहेत, असे मानायचे का?

देशासाठी संदेश काय!

‘भारत जोडो’ म्हणणाऱ्या राहुल गांधींना यात्रा तमिळनाडूमधून सुरू करावी आणि केरळमध्ये सर्वाधिक दिवस घालवावे असे का वाटले, हेही स्पष्ट केलेले नाही. तमिळनाडूत द्रमुक आणि केरळमध्ये कम्युनिस्ट सत्तेत आहेत. हे दोन्ही पक्ष भारताच्या अखंडतेला आव्हान देत आहेत असे राहुल गांधींना वाटत असेल तर त्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे बोलले पाहिजे. पण या दोन्ही पक्षांच्या राजकारणावर ते काहीही बोलत नाहीत. खरे तर राहुल गांधींचा हा ‘भारत जोडो’ प्रयास पाकव्याप्त काश्मीरपासून सुरू व्हायला हवा होता. देश स्वतंत्र झाला तेव्हा इंग्रजांनी आपल्या हवाली केलेल्या भूभागाचे क्षेत्रफळ ३४ लाख चौरस किलोमीटरवर होते.

सिक्कीम जोडून घेतल्यानंतरही आपले क्षेत्रफळ ३२ लाख ८७ हजार २६३चौरस किलोमीटर आहे. तब्बल एक लाख तेवीस हजार चौरस किलोमीटरपेक्षा अधिक भूप्रदेश आपण गमावला. त्यात ८५ हजार ७९३चौरस किलोमीटर प्रदेश पाकव्याप्त काश्मीर, गिलगिट व बाल्टीस्तानचा आहे; तो १९४८ मध्ये, राहुल गांधींचे पणजोबा पंडित नेहरू पंतप्रधान असताना गमावला. नेहरूंच्याच कारकिर्दीत १९६०मध्ये चीनने केलेल्या आक्रमणात आपण अक्साई चीनचा ३७ हजार २४४चौरस किलोमीटर प्रदेश गमावला. त्याचप्रमाणे २००४ ते २०१४ या दहा वर्षात, मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या काळात आपला ९६०चौरस किलोमीटर प्रदेश चीनने बळकावला. चीनने व्यापलेल्या या प्रदेशातून किंवा पाकव्याप्त काश्मीरमधून अथवा अक्साई चीनमधून आपली ‘भारत जोडो’ यात्रा सुरु करण्याचा मनोदय जरी राहुल गांधींनी बोलून दाखवला असता तर सारा देश त्यांच्याबरोबर राहिला असता. पण, या सगळ्या भूभागाबाबत राहुल गांधी कधीच काही बोलत नाहीत.

राहुल गांधींनी ‘भारत जोडो’ यात्रा पंजाबमधून सुरु केली असती अथवा पंजाबमध्ये अधिक वेळ दिला असता तरी त्याचा अर्थ समजू शकलो असतो. कारण आज पंजाबच्या काही भागात खलिस्तानी प्रवृत्ती पुन्हा सक्रिय होताहेत. याच प्रवृत्तींनी त्यांची आजी व भारताच्या पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधींचा बळी घेतला होता. त्या प्रवृत्ती सक्रिय होणे किंवा त्यांची ताकद वाढणे भारताच्या एकात्मतेसाठी आव्हान ठरू शकते. पण राहुल गांधी त्या धोक्याबद्दल मौन बाळगून आहेत. नक्षलवाद्यांच्या फुटीरतावादी कारवायांबद्दल ते कधी काही बोलले नाहीत. ‘भारत तेरे टुकडे होंगे...’ अशा घोषणांना कधी हरकतही घेतलेली नाही. उलट अशा घोषणा देणाऱ्यांचे घोळके राहुल गांधींभोवती जमा झालेलेच देशाने पाहिले आहे. अशा घोषणा देणाऱ्यांचा म्होरक्या कन्हैय्याकुमार या ‘भारत जोडो’ यात्रेत राहुल गांधींबरोबर आहे. हे दृश्‍य पाहिल्यानंतर ‘भारत जोडो’च्या माध्यमातून ते देशाला नेमके काय सांगू पाहात आहेत? हा प्रश्न विचारावा लागतो.राहुल गांधी जे काही सांगू पाहत आहेत ते आमच्यासारख्या त्यांच्या विरोधकांनाच समजत नाही अशातलाही भाग नाही. ते नेमके काय बोलत आहेत हे काँग्रेसमधील त्यांच्या अनुयायांनाही कळेनासे झाले आहे. म्हणूनच त्यांची यात्रा सुरू झाल्याबरोबर गोव्यातील काँग्रेस आमदार पक्ष सोडून गेले. अगदी अशोक गेहलोतांसारखे विश्वासू शिलेदारसुद्धा ‘फॅमिली’च्या विरोधात बंड करायला लागले आहेत. या सगळ्याचा अर्थ समजण्याइतकी भारतीय जनता सूज्ञ आहे.

(लेखक महाराष्ट्र भाजपचे उपाध्यक्ष आहेत.)

madhav.bhandari@yahoo.co.in