Lok Sabha Election : अमेठी, रायबरेलीचा वारसा

अमेठीतून राहुल आणि रायबरेलीतून प्रियांका गांधींनी लढावे यासाठी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जणू आंदोलन छेडले होते.
Lok Sabha Election
Lok Sabha ElectionSakal

- विकास झाडे

अमेठीतून राहुल आणि रायबरेलीतून प्रियांका गांधींनी लढावे यासाठी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जणू आंदोलन छेडले होते. कॉँग्रेस ‘खुल जा सिमसिम’ म्हणत जादूचा पेटारा उघडेल, असे वाटत होते. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. प्रियांका यांना इंदिरा गांधींच्या रूपात पाहणाऱ्या कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचीही घोर निराशा झाली आहे.

अमेठी आणि रायबरेली हे दोन्ही मतदारसंघ गांधी परिवाराचे पारंपरिक आहेत. २०१९ च्या तुलनेत या वेळी काँग्रेसला ‘अच्छे दिन’ आल्याचे दिसत असल्याने अमेठीतून राहुल आणि रायबरेलीतून प्रियंका गांधींनी लढावे यासाठी कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जणू आंदोलन छेडले होते. कॉँग्रेसनेही या जागांची उमेदवारी रहस्यमय ठेवली.

उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख शुक्रवारी होती. कॉँग्रेस ‘खुल जा सिमसिम’ म्हणत जादूचा पेटारा उघडतील असे वाटत होते. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. अगदी शेवटच्या क्षणी कॉँग्रेसने नावे जाहीर केली.

त्यानंतर राहुल गांधी आणि प्रियांकावर टीकेची झोड उठायला लागली. राहुल गांधी यांनी अमेठी सोडली म्हणून विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले. प्रियांकाला इंदिरा गांधींच्या रूपात पाहणाऱ्या कॉँग्रेसच्या कार्यकर्त्यांचीही घोर निराशा झाली आहे.

अमेठीतून २०१४ मध्ये लाखावर मताधिक्याने राहुल गांधी यांनी भाजपच्या स्मृती इराणींचा पराभव केला होता. तत्पूर्वी २००४ पासून याच मतदारसंघातून सातत्याने दोन ते तीन लाखांच्या मताधिक्याने ते निवडणूक जिंकत गेलेत.

१९९९ मध्ये सोनिया गांधी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत होत्या. गांधी कुटुंबातील संजय गांधी आणि राजीव गांधी खासदार होते. पराभव झाल्यानंतरही स्मृती इराणी पाच वर्षे अमेठीच्या संपर्कात होत्या. नंतर त्यांनी २०१९ मध्ये राहुल गांधींचा पराभव केला. मात्र, गेल्या पाच वर्षातील या मतदारसंघातील चित्र बदलले आहे.

स्मृती इराणींचे लोकांशी वागणे, पत्रकारांना धमक्या देणे, मंत्रिपदाची बाधा होणे यामुळे मतदार त्यांच्यावर काहीसे नाराज आहेत. अमेठीत राहुल गांधी पुन्हा परततील, अशी अपेक्षा होती. परंतु रायबरेलीला पसंती दिल्याने त्यांना अमेठीतून जिंकण्याची खात्री नव्हती का?

असे प्रश्‍न उपस्थित होत आहेत. गेले चार दशके अमेठीशी संपर्कात असलेले काँग्रेसचे आणि गांधी घराण्याचे एकनिष्ठ किशोरीलाल शर्मा यांना अमेठीतून उमेदवारी देण्यात आली आहे. इराणीबाईंसमोर ते आव्हान उभे करतील यात वाद नसला तरी राहुल गांधी यांनी मतदारसंघ का सोडला, हा चर्चेचा विषय झाला आहे. तब्बल २५ वर्षात प्रथम अमेठीच्या मैदानात गांधी घराणे नसणार आहे.

इंदिराजींचा वारसा!

प्रियांका गांधी यांच्याकडे पाहून अनेकांना इंदिरा गांधी यांची आठवण येते. प्रियांकाच्या भाषणापासून तर पेहरावापर्यंत त्यांची तुलना इंदिराजींशी केली जाते. चेहरा कुटुंबातून मिळू शकतो. परंतु कर्तृत्व स्वतः सिद्ध करावे लागते.

इंदिरा गांधींनी अवघ्या ४२ व्या वर्षी काँग्रेसचे अध्यक्षपद भूषविले होते. आज प्रियांका गांधी ५२ वर्षांच्या आहेत. काँग्रेसच्या महासचिव म्हणून त्यांचा विशेष प्रभाव दिसला नाही. विधानसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशची जबाबदारी त्यांच्याकडे होती. त्यांच्या सभेला प्रचंड गर्दी होत असे. त्यांनी संपूर्ण उत्तरप्रदेश पिंजून काढला.

मात्र, काँग्रेसला केवळ २.३३ टक्के मते मिळाली. भाजपच्या डावपेचांपुढे कॉँग्रेस खुजी पडत गेल्याचे दिसले. परिश्रम करूनही यश न आल्याने नैराश्‍य येणे स्वाभाविक आहे. परंतु प्रियांका यांनी निवडणूकच लढायची नाही हा निर्णय गांधी कुटुंबावर प्रेम करणाऱ्या लोकांना खूपसा आवडलेला दिसत नाही.

उत्तरप्रदेशातील तेव्हाचे आणि आताचे चित्र खूप वेगळे आहे. लोकांना महागाईचे तडाखे बसताहेत आणि रोजगारासाठी वणवण फिरावे लागत आहे. लोकांना धार्मिक ध्रुवीकरण नकोसे झाले आहे. त्यामुळेच प्रियांका गांधी यांनी अमेठी किंवा रायबरेलीमधून निवडणूक लढणे गरजेचे होते, असे कॉँग्रेसचे लोक मत व्यक्त करतात.

इंदिरा गांधी प्रतिकूल परिस्थितीतही खंबीर असत. प्रियांकाची भूमिका तशीच असावी, असे अनेकांना वाटते. १९६४ मध्ये पंडित नेहरूंचे निधन झाल्यानंतर लालबहादूर शास्त्री पंतप्रधान झाले. त्यावेळी इंदिरा गांधी खासदारसुद्धा नव्हत्या. लालबहादूर शास्त्री यांनी त्यांना माहिती व नभोवाणी मंत्री केले.

त्या राज्यसभेवर निवडून आल्या. दुर्दैवाने १९६६ मध्ये शास्त्रीजींचे निधन झाले. यानंतर काँग्रेसमध्ये पंतप्रधानपदासाठी चढाओढ सुरू झाली. मोरारजी देसाई, जगजीवनराम, के. कामराज, गुलजारीलाल नंदासारखे दिग्गज काँग्रेसमध्ये होते.

इंदिराजींनी काँग्रेसचे अध्यक्ष के. कामराज यांना विश्वासात घेतले व संसदीय मंडळात पंतप्रधानपदाचा उमेदवार ठरावा, अशी गळ घातली. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत मोरारजी देसाईंचा इंदिरा गांधींनी पराभव केला व पंतप्रधानपद मिळविले. इंदिरा गांधी यांना नेहरूंची कन्या म्हणून पंतप्रधानपद मिळाले नाही; तर ते त्यांनी आपल्या राजकीय कौशल्याने मिळविले होते. १९७७ मध्ये रायबरेलीतून त्या पराभूत झाल्या. परंतु पुढेही त्या लढत राहिल्या.

नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधीप्रमाणेच प्रियांका आणि राहुल गांधींकडून लोकांच्या अपेक्षा आहेत. किंबहुना त्यांच्यावर त्या लादल्या जातात. गांधी कुटुंबातील कोणीही सदस्य पुढे नसले की कॉँग्रेसची नौका डगमगत असते.

सोनिया गांधी यांच्यानिमित्ताने ‘विदेशी’चा मुद्दा नेहमी चर्चेत ठेवण्यात आला. तरीही त्यांनी कॉँग्रेसला ऊर्जा देण्याचेच काम केले. राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाड हे दोन्ही मतदारसंघ जिंकल्यास रायबरेलीला सोडण्याची वेळ आली तर अमेठी आणि रायबरेली हे मतदारसंघ गांधी कुटुंबाचे होते, अशी इतिहासात नोंद होईल.

सत्तेसाठी वाट्टेल ते!

तिसऱ्या टप्यातील ९४ लोकसभा मतदारसंघांसाठी मंगळवारी मतदान होईल. परंतु या काळात प्रचाराचा आणि उमेदवारनिवडीचा स्तर अत्यंत घसरला. पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी ‘बेटी बचाव, बेटी पढाओ’ हे अभियान राबविले होते.

परंतु देशात खरेच महिलांचा सन्मान होतो का? सात महिला कुस्तीपटूंनी भारतीय कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष आणि भाजपचे बाहुबली खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते.

यासाठी ‘जंतरमंतर’वर आंदोलन झाले. निष्पन्न काय झाले? पोलिसांनी महिला कुस्तीपटूंनाच फरफटत नेले. परंतु बृजभूषणवर कारवाई करण्याची मोदी सरकारची हिंमत झाली नाही. त्यांच्यावर खुनापासून ते ‘गॅंगस्टर अ‍ॅक्ट’पर्यंतचे चाळीसपेक्षा अधिक गुन्हे आहेत. बृजभूषणला हात लावला तर उत्तरप्रदेशात भाजपच्या अनेक जागांवर धक्का बसू शकतो, म्हणून भाजपने त्यांचा मुलगा करण भूषण सिंहला तिकीट दिले.

आता तर प्रचारही टोकाचा होत आहे. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी कॉँग्रेसवर आरोप करताना पदाच्या मर्यादा ओलांडताना दिसतात. गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले जाईल, घरातील खोली तुमची नसेल, तुमची एक म्हैस हिरावण्यात येईल अशी भाषणे होत आहे. मोदी म्हणतात, ‘मी २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढले आहे.

भाजपकडून त्याच्या जाहिराती केल्या जातात. ८० कोटी लोकांना मोफत धान्य देत असल्याचे अभिमानाने सांगणारे फलक लावले गेले आहेत. याचा अर्थ देशातील १०५ कोटी लोक हे दारिद्र्यरेषेखाली होते, असे समजायचे का? २०१२ मध्ये देशातील १७ कोटी लोक दारिद्र्यरेषेखाली असल्याचे आकडे आहेत. मोदींच्या दहा वर्षाच्या काळात केवळ विकासाची गंगा वाहात होती, तर भारत इतका दारिद्र्यात कसा गेला?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com