मराठी पत्रकारितेची दिल्लीतील ओळख

vijay naik
vijay naik

गेली पाच दशके दिल्लीत सजगपणे पत्रकारिता करताना विजय नाईक यांनी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणातील जाणकार आणि विश्‍लेषक म्हणूनही आदराचं स्थान मिळविलं. त्यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त त्यांच्या सुहृदाचं मनोगत.

महाराष्ट्रातील पत्रकार आणि राजकारणी राजधानी दिल्लीत फार काळ टिकाव धरू शकत नाहीत, असा समज आहे. पण विजय नाईक हा त्याला अपवाद आहे. मराठी पत्रकार दिल्ली दरबारी मानाचं स्थान संपादन करू शकतो, हे त्यानं दाखवून दिलं आहे. मराठी पत्रकारितेचं विजय नाईक हे दिल्लीतील ओळखचिन्ह बनलं आहे. त्यामागं आहे त्याची पाच दशकांची खडतर वाटचाल आणि अनुभव समृद्धतेतून उंचावत गेलेलं लेखन. आज तो केवळ दिल्लीतील एक ज्येष्ठ मराठी पत्रकार नाही, तर राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणातील जाणकार आणि विश्‍लेषक म्हणून आदराचं स्थान मिळवून आहे. गेली ४० वर्षे एक सहकारी, राजधानीच्या अंतरंगातील अज्ञात प्रवाह वाचकांपुढे मांडणारा वार्ताहर आणि राजकीय भाष्यकार हा त्याचा प्रवास मी जवळून पाहिला आहे; पण त्याहीपेक्षा हसतखेळत गप्पांमधून ज्ञानभांडार खुलं करणारा मित्र म्हणून तो मला अधिक जवळचा आहे.

लिखाणाची हौस
नगर-श्रीरामपूरमध्ये बालपण गेलेला आणि साठच्या दशकात बी.कॉम. झालेला विजय घरच्यांच्या इच्छेप्रमाणे वागला असता, तर पुण्या-मुंबईत कुठेतरी बॅंकेत लागला असता; पण तरुण वयातच त्याला ओढ होती लेखनाची आणि दिल्ली किंवा कोलकत्यात राहण्याची. त्या ओढीमुळे त्यानं दिल्ली गाठली आणि चौगुले उद्योगसमूहात अकाउंटंटची नोकरी पत्करली. याच उद्योगसमूहाकडे मालकी असलेल्या ‘गोमंतक’मुळे त्याला लेखनाची आणि त्यातून पत्रकारितेची वाट गवसली आणि काही वर्षांतच केवळ साप्ताहिक वार्तापत्रच नाही, तर दैनंदिन राजकीय बातम्या देणारा खराखुरा दिल्ली प्रतिनिधी बनला. त्या वेळी ‘गोमंतक’चे संपादक असलेले माधवराव गडकरी ‘सकाळ’मध्ये आले, त्यांच्याबरोबर विजयही ‘सकाळ’मध्ये आला. तेव्हापासून ‘सकाळ’ आणि विजय नाईक हे नातं कायम राहिलं. दिल्लीत जाणारे किंवा राहणारे पत्रकार मराठी राजकारणी नेत्यांभोवतीच घुटमळायचे आणि त्या मर्यादेतच लेखन करायचे; पण विजयनं बाबू जगजीवनराम यांच्यापासून देवराज अरस यांच्यापर्यंत सर्व प्रांतातील वरिष्ठ नेत्यांशी मैत्री जोडली आणि मराठी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने राष्ट्रीय परिघात नेऊन सोडलं. तिथंही न थांबता त्यानं परदेशी वकिलातींशी संबंध प्रस्थापित केले आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाचाही अभ्यास करून आपलं लेखन अधिक व्यापक पातळीवर नेलं. बातमीदाराची खरी शक्ती त्यानं प्रस्थापित केलेले वजनदार ‘कॉन्टॅक्‍ट्‌स’ आणि त्यांचा मिळविलेला विश्‍वास, ही असते. विजयनं ती मोठ्या मेहनतीनं कमावली आणि वाढवत नेली. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धापासून नरेंद्र मोदींच्या सत्तासंपादनापर्यंत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रत्येक मोठ्या घटनेचा तो साक्षीदार आहे. त्यावर त्यानं केलेलं लेखन, हे त्या त्या घटनेचं वास्तव चित्रण बनलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी राजवट संपुष्टात आल्यावर त्यानं त्या देशाला भेट देऊन केलेलं (आणि पुढे त्याचं ग्रंथ रूपांतर- ‘मंडेलांच्या देशात’) लेखन हे त्याच्या धडपड्या वृत्तीचं उत्तम 
उदाहरण आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जगाची भ्रमती
ज्या काळात मराठी वृत्तपत्रांना स्वतंत्र कार्यालय नसायचं आणि फोनशिवाय बातम्या पाठवायला अन्य साधन नसायचं, त्या काळात विजयनं दिल्लीतून ‘सकाळ’साठी केवळ वार्तापत्रच नाही, तर खऱ्याखुऱ्या ‘ब्रेकिंग न्यूज’ही दिल्या. जनता पक्षाच्या उदयानंतर महाराष्ट्रातील काँग्रेस फुटलेली असताना त्यांच्यात आघाडी होऊन वसंतदादा पाटील- नाशिकराव तिरपुडे यांचं सरकार बनणार, ही बातमी त्यानं प्रथम दिली. त्या वेळी अनेकांना तो कल्पनाविलास वाटला होता; पण काही दिवसांतच अशक्‍य वाटणारी ती घटना प्रत्यक्षात आली. १९८४ मध्ये इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीत शीख समुदायावर हल्ले झाले. त्या वेळी विजयबरोबर दिल्लीतील राजकीय घडामोडींबरोबर त्या अमानुष अत्याचारांच्या बातम्या मी दिल्या. निरपराध शीख नागरिकांना पोलिसांच्या समोर मारलं जात होतं. ती दृश्‍यं पाहणं आणि बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांशी बोलणं हासुद्धा शहारे आणणारा अनुभव होता. 

पिंपरी चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सदैव आनंदी, हसतमुख आणि तणावरहित राहण्याचा स्वभाव यामुळेच विजय ७५व्या वर्षीही शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त आहे. दिल्लीत त्याच्याबरोबर वेळोवेळी काम करताना सकाळी नऊपासून रात्री दहापर्यंत कार्यमग्न असूनही त्याला कधी मी तणावग्रस्त किंवा दुर्मुखलेला पाहिलं नाही. दिल्लीत काम करणाऱ्या वार्ताहरांवरचा तणाव तर क्षणाक्षणाला वाढत जाणारा असतो; पण निर्व्यसनी राहून विजयनं तो दूर ठेवला, हे त्याचं असाधारण वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच त्याच्या वार्तांकनातील ताजेपणा कधी कमी झालेला नाही. विजयनं राष्ट्रपती- पंतप्रधानांसह आणि अन्यही कारणास्तव ५२ देशांचे प्रवास आणि वार्तांकनं केली आहेत. एवढं विश्‍वव्यापक अनुभवाचं संचित गाठीशी असलेला दुसरा पत्रकार भारतात असेल, असं वाटत नाही. त्याच्याबरोबर गप्पांची मैफल जमली, की ऐकणाऱ्याला त्याच्या स्मृतिखजिन्यात केवढ्या सुरस, रम्य सत्यकथा दडलेल्या आहेत, ते कळतं. ‘तू हे सगळं लिहून काढलंस तर दहा तरी पुस्तकं होतील’, असं मी त्याला अनेकदा म्हणतो. अमृतमहोत्सवी वाढदिवशी विजयनं ग्रंथलेखनाचा संकल्प करून तो प्रत्यक्षात आणावा, ही अपेक्षा आणि शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com