
पंतप्रधान मोदी यांनी तीन ऑक्टोबर २०१४ रोजी ‘मन की बात’ उपक्रम सुरू केला. समाज माध्यमांचे महत्त्व ओळखून त्याला विकासात्मक संवादाची दिशा ते देऊ पाहात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ उपक्रमातून केवळ संवादाचा पूलच बांधला नाही, तर जनतेपर्यंत सरकारची ध्येयधोरणे प्रभावीपणे पोहोचवली.
‘मन की बात’ हा उपक्रम अभिनव प्रयोग म्हणून नोंदवला जाईल, याबद्दल मला खात्री आहे. याचे कारण, की जगातील सर्वात मोठी आणि प्रगल्भ लोकशाही असलेल्या देशाचे नेतृत्व करताना समाजहिताच्या संवादाचे पूल कसे बांधावेत, याची शिकवण या उपक्रमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. ‘मन की बात’ भारतीयांसाठी असली तरी त्याचे पडसाद जगभरात उमटले, यावरून समाजहिताच्या संवादाच्या पुलाचे महत्त्व लक्षात यावे. तब्बल शंभर कोटी भारतीयांपर्यंत ‘मन की बात’ पोहोचली असल्याचे संशोधन इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, रोहतक या संस्थेने परवाच जाहीर केले.
पंतप्रधान मोदी यांनी तीन ऑक्टोबर २०१४ रोजी ‘मन की बात’ उपक्रम सुरू केला. समाज माध्यमांचे महत्त्व ओळखून त्याला विकासात्मक संवादाची दिशा ते देऊ पाहात आहेत. जनतेला राजकीय नेत्यांच्या भाषणांची सवय आहे; मात्र मोदी यांनी केलेला प्रयोग नाविन्यपूर्ण होता. जनतेशी थेट सातत्याने बोलणे आणि जनतेनेच शोधलेल्या नवीन संकल्पनांचा प्रचार-प्रसार करण्याचा हा प्रयोग आहे. जनतेसाठी राबवत असलेल्या योजनांची माहिती सर्वोच्च नेत्याने थेट जनतेलाच देण्याचा हा प्रयोग आहे. देशवासीयांनी या प्रयोगाला प्रचंड उचलून धरले आणि ‘मन की बात’ कोट्यवधींच्या हृदयाचा आवाज बनली.
शिक्षण आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारा भाजप कार्यकर्ता म्हणून मला या संवादाचे महत्त्व अधिक वाटते. माहितीचा भडीमार चहूदिशांनी होत असताना जनतेला उपयुक्त माहिती देणे, प्रयोगशीलतेला चालना देणे आणि विधायकतेचा खणखणीत पुरस्कार करणे मला अत्यंत महत्त्वाचे वाटते. ‘मन की बात’ हा सर्वार्थाने जनतेला सामावून घेणारा संवाद आहे. महिन्यातून एका रविवारी कोट्यवधी भारतीय सहकुटुंब तो ऐकतात. चर्चा करतात. त्यातील आवाहने प्रत्यक्षात आणतात.
‘मन की बात’मधून पंतप्रधानांनी एखाद्या भारतीयाच्या प्रयोगाची माहिती सांगावी, त्यांना प्रोत्साहन द्यावे आणि साऱ्या भारताने त्या व्यक्तीला, संस्थेला ‘सेलिब्रेटी’ बनवावे असे प्रत्येकवेळी घडले. दूरची उदाहरणे आहेतच; पुण्यातही हा अनुभव आला. ‘अस्मि गम्मत कट्टा’ युट्यूब चॅनलद्वारे लहान मुलांना लॉकडाऊनच्या काळात गोष्टी सांगणाऱ्या वैशाली देशपांडे-व्यवहारे प्रसिद्ध झाल्या. अमेय जोशींनी व्यक्त केलेली रस्ते अपघाताबद्दलची चिंता भारताची चिंता बनली. रोझलँड गृहनिर्माण संस्थेतील सभासदांनी केलेला जलसंवर्धनाचा प्रयोग ‘मन की बात’द्वारे देशवासियांसाठी आदर्श बनला. एमएसआर-ऑलिव्ह गृहनिर्माण संस्थेतील सौरऊर्जा प्रकल्प देशासाठी अभिमानाची बाब बनला. या संस्था, व्यक्तींना आणखी कामाची मिळालेली प्रेरणा निखळ आनंददायी आहे.
साध्यासुध्या माणसांमधील सकारात्मकता शोधून त्याचा प्रसार ‘मन की बात’ने केला. सकारात्मकता पाझरत समाजातल्या शेवटच्या स्तरापर्यंत जायला हवी, यासाठी पंतप्रधानांनी प्रयत्न केले. त्याचा भाग म्हणून ‘मन की बात’ राजकारणापलीकडे पोहोचली. राजकारणाचा भाग म्हणून काहींनी या उपक्रमावर टीकाही केली; मात्र जनतेशी थेट नाळ जोडलेला, जनतेच्या हृदयाचा आवाज बनलेला नेता अधिक प्रभावी असतो, हे या यशाने सिद्ध केले.
आकाशवाणीची २६२ स्टेशन्स, खासगी आणि कम्युनिटी रेडिओची ३७५ स्टेशन्स, विविध वृत्तवाहिन्या, इंटरनेट रेडिओ अशा सर्व माध्यमांतून एकाच वेळी ‘मन की बात’चे प्रसारण होते. तेव्हा भारताच्या एकात्मतेची, राष्ट्रीय भावनेची साक्ष पटते. ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियान असो किंवा आरोग्याचा संदेश असो किंवा जवानांप्रती कृतज्ञता असो, नरेंद्र मोदी यांनी आवाहन करावे आणि कोट्यवधी भारतीयांनी त्यांना साथ द्यावी, असे अनेकदा घडले. देशाच्या इतिहासात पंतप्रधानपदावरील व्यक्तीने इतक्या सातत्याने, वैविध्यपूर्ण रीतीने, जनतेशी संवादाचा भक्कम पूल बांधल्याचे दुसरे उदाहरण नाही.
(लेखक भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.