स्त्रीशक्तीचे प्रेरणातीर्थ सिंदखेडराजा 

अरुण जैन
शनिवार, 12 जानेवारी 2019

बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊसाहेब यांचा जन्म जिथे झाला ते सिंदखेडराजा हे गाव शिवतीर्थाच्या नामावळीत अग्रस्थानी आहे. सुमारे सव्वातीनशे वर्षांपूर्वीची ही नगरी आज जन्मस्थान आणि अलीकडच्या काळातील निर्माणाधीन भव्य जिजाऊसृष्टीमुळे अनेकांचे प्रेरणास्रोत बनले आहे. उद्या (ता. 12 जानेवारी) या राजमातेच्या जन्मदिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी नगरी सज्ज झाली आहे. 

बुलडाणा - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाऊसाहेब यांचा जन्म जिथे झाला ते सिंदखेडराजा हे गाव शिवतीर्थाच्या नामावळीत अग्रस्थानी आहे. सुमारे सव्वातीनशे वर्षांपूर्वीची ही नगरी आज जन्मस्थान आणि अलीकडच्या काळातील निर्माणाधीन भव्य जिजाऊसृष्टीमुळे अनेकांचे प्रेरणास्रोत बनले आहे. उद्या (ता. 12 जानेवारी) या राजमातेच्या जन्मदिनाचा सोहळा साजरा करण्यासाठी नगरी सज्ज झाली आहे. 

महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कै. बॅ. ए. आर. अंतुले यांच्या काळात तत्कालीन खासदार कै. बाळकृष्ण वासनिक यांनी सुरवातीला सिंदखेडराजा या ऐतिहासिक श्रद्धास्थानाचा विकास व्हावा, ही संकल्पना पुढे आणली. त्या काळात आणि भाजप- शिवसेना युती सरकारच्या काळात विकास निधी देऊन सरकारने हा ऐतिहासिक आणि भावनिक मातृ वारसा जतन करण्यासाठी पुढाकार घेऊन सुरवात केली. नंतरच्या काळात मराठा सेवा संघाच्या माध्यमातून संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांनी सिंदखेडराजाला जिजाऊसृष्टी निर्माण करण्याचे महत्त्वाकांक्षी स्वप्न उराशी बाळगून पाठपुराव्याला सुरवात केली. त्याला महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला. ज्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे नुसते नाव उच्चारले तरी अंगावर रोमांच उभे राहतात, त्या छत्रपतींच्या आऊसाहेबांचे जन्मगाव, याच सिंदखेडराजात बालशिवाजी महाराज यांची पावले दुडदुडली, त्यांनीच पुढे पातशाही आणि मोगलांच्या तावडीतून महाराष्ट्राची सुटका केली अन्‌ दुश्‍मनांच्या उरात धडकी भरवली! 
अशा या पावन नगरीत दरवर्षी 12 जानेवारी रोजी लाखो राजमाता जिजाऊभक्त येऊन दर्शन घेतात. आज सिंदखेडराजात लखुजीराजांचा राजवाडा, राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान, पुतळा, बारव, निळकंठेश्वर मंदिर, सजना बारव, चांदनी तलाव, रंगमहाल, रामेश्वर मंदिर, काळा कोट, लखुजीराजांची समाधी, मोती तलाव इत्यादी ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तूंच्या संवर्धनाची गरज आहे. त्यादृष्टीने सरकारने पावले उचलली पाहिजेत. 

मराठा सेवा संघाच्या माध्यमातून राजमाता जिजाऊ जन्मोत्सव सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होतो. जिजाऊसृष्टीवर भव्य विचारपीठ, राजमाता जिजाऊंची भव्य मूर्ती, सभामंडप, आकर्षक महाप्रवेशद्वार उभारण्यात आलेले आहे. या सर्व बाबी आणि ऐतिहासिक, भावनिक जाणिवेतून संपूर्ण देशभरातून लाखो पावले आपसूकच सिंदखेडराजाकडे वळत असतात. 

मातृशक्तीचा जागर 
राज्यात आज मातृशक्ती किंवा स्त्रीशक्तीशी संबंधित कोणतीही चळवळ, आंदोलन, प्रबोधनाचे कार्य असेल, तर त्याची सुरवात सिंदखेडराजा येथूनच होते. मंत्री पंकजा मुंडे, खासदार सुप्रिया सुळे, प्रीतम मुंडे, प्रणिती शिंदे, सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ, खासदार रक्षाताई खडसे, माजी आमदार रेखाताई खेडेकर आदींना सिंदखेडराजानगरी वारंवार आकर्षित करत असते. त्यामुळे मातृशक्ती आणि स्रीशक्ती यांचे हे प्रेरणास्थान सातत्याने सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा जीवनाच्या बहुविध क्षेत्रांना स्फूर्तीच देत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rajmata jijausaheb bhosle jayanti special