मेधा नांदेडकर, नागपूरसमाजाचे संघटन करायचे असल्याने समाजातील विधायक शक्ती या नात्याने महिलांचा सहभाग आणि भूमिका महत्त्वाची आहे. ही धारणा ठेवूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात महिलांच्या सहभागाकडे पाहिले जाते. .दिल्लीतील विज्ञान भवनात २६ ते २८ ऑगस्ट २०२५ दरम्यान आयोजित त्रिदिवसीय व्याख्यानसत्रात रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले, ‘‘राष्ट्र सेविका समितीची स्थापना १९३६मध्ये झाली होती आणि महिलांच्या शाखा समितीद्वारे चालवल्या जातात. संघ आणि समितीमध्ये हे सामंजस्य आहे की शाखा पूरक पद्धतीने चालवल्या जातील. याव्यतिरिक्त संघाच्या सर्व उपक्रमांमध्ये महिलांचा सहभाग असतो, कारण आम्हाला समाजाचे संघटन करायचे आहे.’’ रा. स्व. संघात महिलांचा सहभाग काय व कसा आहे हे समजण्यासाठी हे विधान पुरेसे आहे.संघाचे सध्या शताब्दी वर्ष सुरू आहे. संघाचे १९२५मध्ये कार्य सुरू झाल्यानंतर जवळपास अकरा वर्षांनी राष्ट्र सेविका समितीची स्थापना वर्धा येथे वंदनीय लक्ष्मीबाई उपाख्य मावशी केळकर यांनी विजयादशमीच्या दिवशी केली. समितीचे कार्य सुरू करण्यापूर्वी मावशींनी अनेकदा संघाचे प्रथम सरसंघचालक डॉ. हेडगेवार यांच्याशी चर्चा केली होती. त्याकाळच्या देशकाल परिस्थितीचे भान राखत, ती समजून घेत मावशींनी विचारपूर्वक टाकलेले हे एक धाडसी पाऊल होते. संघाच्या शाखेमध्ये नित्यनियमाने गेल्यानंतर आपल्या मुलांमध्ये घडून आलेले सकारात्मक परिवर्तन मावशी बघत होत्या. समाजाचा अर्धा हिस्सा असणाऱ्या मुली, महिलांनाही अशा प्रकारचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे, ही बाब त्यांना जाणवली आणि म्हणूनच त्यांनी डॉ. हेडगेवार यांना महिलांसाठी शाखा सुरू करण्याबाबत म्हटले..संपूर्ण समाजाचे संघटन करण्यासाठी ‘मैदानावरील शाखा’ हे जे माध्यम संघाने निवडले होते, त्या माध्यमाद्वारे मैदानात पुरुष महिलांनी एकत्र येण्यास; त्या काळात अनुकूलता नव्हती. त्यामुळे डॉक्टरांनी संघात महिलांना थेट शाखेत प्रवेश देण्यासाठी असमर्थता दर्शवली; मात्र त्याचवेळी मावशी केळकर यांनी असे काही कार्य उभे करण्याचे ठरवल्यास पूर्णपणे सहयोग करण्याचे, पाठीशी उभे राहू, असे सांगितले. सैद्धांतिक फरक नसेल... मात्र, महिलांचे स्वतंत्र संघटन व्हावे, याची प्रेरणा डॉक्टरांची होती. ही सहयोगाची भूमिका आजतागायत आहे..राष्ट्राची आधारशक्तीसमिती स्थापना होण्यापूर्वी दोन्ही संघटनांची आद्याक्षरे सारखी असावी असे डॉक्टरांनी सुचवले त्याप्रमाणे आरएसएस अशी दोन्ही संघटनांची आद्याक्षरे आहेत. राष्ट्र सेविका समिती महिलांमध्ये राष्ट्रभक्ती, संस्कृती सन्मान, स्वसंरक्षण, अनुशासन आणि शारीरिक-मानसिक विकास घडवून आणण्यासाठी कार्य करत आहे. समितीची स्वतंत्र कार्यपद्धती आहे. व्यक्ती व्यक्ती निर्माण करून राष्ट्रनिर्माणाकरता संघ कार्यरत आहे तर ‘स्त्री ही राष्ट्राची आधारशक्ती’ यानुसार तेजस्वी राष्ट्राच्या पुनर्निर्माणाकरिता समिती कटिबद्ध आहे. संघ संस्थापकांची ही दूरदृष्टीच होती की, महिलांना दिशादर्शन करणे, त्यांच्या समस्यांचे समाधान करणे या गोष्टी स्वतः महिलांनी कराव्या; कारण पुरुष या भूमिकेला पूर्णत्वास नेऊ शकणार नाहीत. संघ प्रेरणेने स्थापित समिती आज सर्वांत मोठे महिला संघटन आहे आणि २८ हून अधिक देशांमध्ये कार्य सुरू आहे. कुटुंब आणि समाजाचे महत्त्व अधोरेखित करत आपले कर्तव्य पूर्ण करत राष्ट्रनिर्माणातील आपला वाटा समिती उचलत आहे..संघाला समाजाचे संघटन करायचे असल्याने समाजातील विधायक शक्ती या नात्याने महिलांचा सहभाग आणि भूमिका संघ प्रेरित अन्य संघटना ज्या मिश्र स्वरूपाच्या आहेत तिथे देखील दिसून येतो. (स्त्री पुरुष एकत्रित काम करणे) विद्याभारती, १९७७मध्ये स्थापन झालेल्या भारतातील सर्वांत मोठ्या अशासकीय शैक्षणिक संघटनेमध्ये ९५ टक्क्यांहून अधिक महिला, शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. शिक्षणाच्या माध्यमातून नैतिक मूल्य, संस्कार आणि सामाजिक समरसतेला चालना देण्यावर विद्याभारतीचे कार्य केंद्रित आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, १९४९पासून सुरू झालेल्या या राष्ट्रव्यापी विद्यार्थी संघटनेच्या रूपाने बहुआयामी आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून शैक्षणिक जगतातील विद्यार्थ्यांच्या अंतर्णिहित शक्तीमध्ये अतूट विश्वास असणारे हे संघटन आहे. या संघटनेच्या लाखो विद्यार्थिनी, सदस्य असून नेतृत्व आणि स्वावलंबन या गुणांना आत्मसात करीत मोठ्या दायित्वाला कुशलतेने पूर्णत्वास नेतात..भारतीय जनता पक्षामध्ये देखील महिलांचा सन्मानपूर्वक सहभाग दिसून येतो. वर्तमान स्थितीमध्ये वनवासी क्षेत्रातून आलेल्या महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू असो किंवा लोकसभेच्या सभापती राहिलेल्या सुमित्रा महाजन, परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री निर्मला सीतारामन असो महत्त्वाच्या आणि निर्णायक दायित्व महिलांना दिलेले आहे. भारतीय स्त्रीशक्ती हे एक असे संघटन आहे, जे महिलांचा आत्मसन्मान, आरोग्य, शिक्षण आर्थिक स्वतंत्रता आणि लैंगिक समानतेच्या उद्दिष्टांवर कार्य करते. संघ प्रेरित अन्य संघटनांमध्ये जसे की भारतीय मजदूर संघ, संस्कार भारती, सेवा भारती, प्रज्ञा प्रवाह, विज्ञान भारती, संस्कृत भारती या संघटनांमध्ये देखील महिलांची संख्यात्मक आणि गुणात्मक उपस्थिती आहे, जी सक्रिय आणि निर्णायक आहे. संघाच्या दोन सर्वांत मोठ्या बैठकांमध्ये अखिल भारतीय कार्यकारी मंडळ आणि प्रतिनिधी सभा यामध्ये महिलांची उपस्थिती असते, हे संघाच्या महिलांप्रती सन्मान आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनाचे द्योतक आहे.संघाच्या अनेक आयामांपैकी कुटुंब प्रबोधन यामध्ये बहुसंख्येने महिला सक्रिय आहेत. संघाच्या अनेक कार्य विभागांमध्येही महिला सहभागी आहेत. याव्यतिरिक्त आणीबाणीच्या काळात संघबंदी झाल्यानंतर अटक झालेल्या संघ स्वयंसेवकांच्या घरातील महिला, समिती सेविका आणि अन्य महिलांनी गुप्तपणे सक्रिय राहून कार्य केले. श्रीरामजन्मभूमी आंदोलनातील महिलांचा सहभाग भरघोस होता; स्वतःहून पुढे येत, त्यांनी वेळ प्रसंगी बंदुकीच्या गोळ्या, लाठ्या प्रहार झेलले, हे सर्वज्ञात आहे. समाजाच्या विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणाऱ्या महिलांना मुख्य धारेत आणण्यासाठी मागील दीड दोन वर्षांपूर्वी संघ प्रेरित महिला संमेलनांना देशभरात मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व असाच होता. सर्वच संघटनांच्या प्रमुख पदांवर महिलांची सहभागिता निरंतर वाढावी, या विषयावर जोधपूर येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत विस्तृत चर्चा झाली आहे. या सर्वच बाबी संघ कार्यातील महिलांची सहभागिता स्पष्ट करतात..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.