उद्योग जगतातील शक्तिकेंद्र!
ब्रिटन आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध जुने आहेत. सध्या ब्रिटनमध्ये सुमारे ५० हजार मराठी नागरिक आहेत. भारतातून ६०-७०च्या दशकांत मोठ्या प्रमाणात डॉक्टर आणि इंजिनिअर ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले.
- रवींद्र गाडगीळ
‘ओव्हरसीज महाराष्ट्रीय प्रोफेशनल्स अँड आंत्रप्रेन्युअर्स ग्रुप’ (ओएमपीईजी) ही संस्था ब्रिटनमध्ये व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना, तसेच विविध व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांना मदत करण्याचे काम करते. संस्थेचा सहावा वर्धापन दिन आठ ऑक्टोबरला लंडनमध्ये होणार आहे. त्यानिमित्ताने संस्थेचे कार्य व तिने महाराष्ट्रातील उद्योजकांना दिलेल्या बळाचा हा आढावा.
ब्रिटन आणि महाराष्ट्राचे ऋणानुबंध जुने आहेत. सध्या ब्रिटनमध्ये सुमारे ५० हजार मराठी नागरिक आहेत. भारतातून ६०-७०च्या दशकांत मोठ्या प्रमाणात डॉक्टर आणि इंजिनिअर ब्रिटनमध्ये स्थलांतरित झाले. पुढे साधारण १९९५पासून येथील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात मराठी माणसांनी चांगलेच वर्चस्व प्रस्थापित केले. ब्रिटन येथे स्थलांतरित झालेल्या मराठी माणसांनी एकत्र येत येथे मराठी मंडळ किंवा महाराष्ट्र मंडळ स्थापन केले. बुद्धिमत्ता आणि कामाप्रती समर्पण अशी ओळख असणाऱ्या येथील मराठी माणसांत उद्योजकतेबाबत मात्र अनास्था दिसते. अलीकडे काही मोजक्या मराठी स्थलांतरितांनी उद्योजकतेकडे मोर्चा वळवला असला, तरी खाद्यपदार्थ, हॉटेल आणि माहिती तंत्रज्ञान एवढ्या क्षेत्रांपुरताच तो मर्यादित आहे.
मराठी समुदाय गटागटांमध्येच विविध उपक्रमात सहभाग घेतो आणि स्वतःपुरता मर्यादित राहात उपक्रमांचा आनंद घेतो. मात्र, मराठी माणसांना एका छताखाली आणून त्यांना उद्योगधंद्यांसाठी हक्काचे आणि शाश्वत व्यासपीठ उपलब्ध करून देण्यास कोणीही विशेष पुढाकार घेताना दिसत नाही. त्यातच, मराठी जनमानसांत असा एक समज दृढ झाला आहे, की उद्योगधंद्यांत एका ठरावीक समाजाचेच वर्चस्व असणार आणि त्यांनीच तो करावा. त्यामुळे मराठी तरुण पिढी ही जोखीम पत्करायला आणि एकत्र येऊन समूहाने काम करायला तयार नाही. पालकांकडून मुलांना मिळणारे मार्गदर्शन देखील यशस्वी उद्योजक होण्याऐवजी नोकरदार बनण्याबाबतच मर्यादित असते.
आता तंत्रज्ञान आणि गुगलकेंद्रित अर्थव्यवस्था यांमुळे ब्रिटनमध्ये व्यवसाय करणे अधिक सोपे झाले आहे. ब्रिटनमध्ये व्यवसाय करू इच्छिणाऱ्यांना, तसेच ब्रिटनमध्ये विविध व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या उद्योजकांना मदत करण्याचे काम, ब्रिटनमधील ‘ओव्हरसीज महाराष्ट्रीय प्रोफेशनल्स अँड आंत्रप्रेन्युअर्स ग्रुप’ (ओएमपीईजी) करत आहे. विशेष म्हणजे, या ग्रुपला चांगला प्रतिसाद मिळत आहे. व्यवसायातील स्टार्टअप, व्यवसायवृद्धी, व्यावसायिक क्षेत्र विस्तार किंवा परस्परांच्या सहकार्याने विविध व्यवसाय यांसारख्या सर्व स्थितीत असलेल्या व्यवसायिकांना आणि व्यवसायांना ‘ओएमपीईजी’ सहकार्य करत, त्यांना त्यांच्या व्यावसायिक यशाचे शिखर गाठण्यात मदत करतो.
स्थापना आणि विस्तार
उद्योग जगतातील आव्हाने समजावून घेत, त्यांच्यावर सामूहिक प्रयत्नातून यशस्वीपणे मात करण्यासाठी, २०१५-१६मध्ये ब्रिटनमधील काही प्रमुख समविचारी मराठी उद्योजकांनी एकत्र येत ‘ओएमपीईजी’ची स्थापना केली. ब्रिटनमधील मराठी माणसांमध्ये उद्योजकतेचे स्फुल्लिंग चेतवणे, त्यांना ब्रिटनमधील व्यावसायिकांशी जोडून देत व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे हा ‘ओएमपीईजी’चा मुख्य उद्देश आहे. ‘ओएमपीईजी’मध्ये खाद्यपदार्थ व्यवसाय, तंत्रज्ञान, अर्थसाहाय्य, फॅशन, कृत्रिम बुद्धिमत्ता, आरोग्य, फिनटेक, कायदेशीर सल्लागार, शिक्षण, किरकोळ विक्री, औषधे यांसारख्या विविध क्षेत्रातील उद्योजकांचा आणि व्यावसायिकांचा समावेश आहे. ‘ओएमपीईजी’च्या सभासदांपैकी ३० टक्के सभासद स्त्रिया आहेत, ही गोष्ट उल्लेखनीय आहे. विशेष म्हणजे, यापैकी बहुतांश स्त्रियांना उद्योजकतेची पार्श्वभूमी नसताना त्यांनी अगदी शून्यातून, छोट्या प्रमाणात आपले व्यवसाय सुरू केले होते.
मराठीजनांना उद्योगासाठी पाठबळ
‘ओएमपीईजी’ने गेल्या सहा वर्षांत दोन मोठ्या बिझनेस एक्स्पोसह सत्तरहून अधिक मोठ्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन केले आहे. ‘ओएमपीईजी’ उद्योजकांना व्यवसायिकांचे आणि ग्राहकांचे संपर्क जाळे उपलब्ध करून देत, त्यांना व्यवसायासाठी साहाय्य उपलब्ध करून देतो, तसेच परस्परांकडून अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देतो. आज ब्रिटनमधील १० हजाराहून अधिक जण ‘ओएमपीईजी’शी विविध माध्यमातून जोडले गेले आहेत. ‘ओएमपीईजी’ भारतीय उच्चायुक्त कार्यालय, ‘युकेआयबीसी’सारखे मोठे व्यापार समूह, महाराष्ट्रीय सोशल ऑर्गनायझेशन यांसारख्या संस्थांबरोबर सौहार्दपूर्ण संबंध ठेवत, मराठी माणसांना उद्योगासाठी आवश्यक असणारे पाठबळ उपलब्ध करून देतो. सचोटी आणि एकात्मता या मूल्यांचा आधारावर कार्य करत ‘ओएमपीईजी’ मातृभूमी महाराष्ट्र, भारत आणि कर्मभूमी ब्रिटन या दोघांनाही अभिमानास्पद ठरेल, असे कार्य करण्याचा प्रयत्न करत आहे.
‘ओएमपीईजी’च्या सदस्यांच्या व्यवसायवृद्धीसाठी ‘ओएमपीईजी’ वर्षभर विविध प्रदर्शने, उद्योगजगतातील तज्ज्ञांची मार्गदर्शनपर व्याख्याने, चर्चासत्र अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करतो. ब्रिटनमधील मराठीजनांच्या पुढील पिढीला उद्योग जगतातील नवनवीन मार्गांची ओळख करून देण्यासाठी एक नवा उपक्रम सुरू करण्यासाठी देखील ‘ओएमपीईजी’ प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे गृहिणींना व्यवसाय सुरू करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी देखील ‘ओएमपीईजी’ लवकरच एक उपक्रम सुरु करणार आहे. ओएमपीईजीचे सर्व प्रमुख सदस्य व्यावसायिक अथवा नोकरदार असून, ब्रिटनमधील मराठी माणसांच्या उन्नतीसाठी आपला मौल्यवान वेळ देत, स्वयंप्रेरणेने समविचारी संस्थांबरोबर विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात.
तसेच, ‘ओएमपीईजी’चे सर्व दैनंदिन व्यवहार सांभाळतात. ‘ओएमपीईजी’च्या वार्षिक उत्सवाची उत्कंठा आता शिगेला पोहोचली आहे.‘ओएमपीईजी’ हे नाव आता ब्रिटनमधील सर्व स्तरांपर्यंत पोहोचले आहे. ‘ओएमपीईजी’चा जनमानसावरील प्रभाव आणि व्यावसायिकांमधील गुणवत्तेला सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या क्षमतेमुळे ‘ओएमपीईजी’ ब्रिटनमधल्या उद्योग जगतातील एक शक्तिकेंद्र म्हणून गणला जाऊ लागला आहे. लोकांच्या सदिच्छा आणि सभासदांच्या प्रयत्नांमुळे ‘ओएमपीईजी’ या वर्षी आपला सहावा वर्धापन दिन साजरा करण्यास सिद्ध झाला आहे.
वर्धापनदिन विशेष
‘ओएमपीईजी’चा वर्धापन दिन म्हणजे, यशाचा उत्सव व सन्मान आणि उज्ज्वल भविष्याचा वेध. ‘ओएमपीईजी’ वर्धापन दिनाच्या समारंभात प्रतिवर्षी विविध क्षेत्रातील मान्यवरांचे अत्यंत प्रेरणादायी मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात येते. या वर्षी ‘ओएमपीईजी’च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त युनिलिव्हरचे चीफ ट्रान्सफॉर्मेशन ऑफिसर आणि चीफ पीपल ऑफिसर नितीन परांजपे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. हा कार्यक्रम आठ ऑक्टोबर रोजी रेनिसान्स लंडन हिथ्रो हॉटेल येथे होईल. कार्यक्रमाला ‘ओएमपीईजी’चे सदस्य, विविध उद्योजक उपस्थित राहणार आहेत.
(लेखक क्लाउड एन्टरप्राइज कन्सल्टंट आणि सिरिअल आंत्रप्रेन्युअर आहेत.)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.