पावसाळी पर्यटनातील धोके आणि इशारे

पावसाळी पर्यटन असो नाहीतर गिरिभ्रमण... अशा कोणत्याही पर्यटनामध्ये सुरक्षिततेचे नियम नाही पाळले, स्वतःची काळजी न घेता बेदरकार वागल्यास त्याची किंमत मोजावी लागते. असे कटू प्रसंग टाळण्यासाठी काय करावे, काय करू नये याविषयी...
पावसाळी पर्यटनातील धोके आणि इशारे
पावसाळी पर्यटनातील धोके आणि इशारेsakal

पावसाळी पर्यटन असो नाहीतर गिरिभ्रमण... अशा कोणत्याही पर्यटनामध्ये सुरक्षिततेचे नियम नाही पाळले, स्वतःची काळजी न घेता बेदरकार वागल्यास त्याची किंमत मोजावी लागते. असे कटू प्रसंग टाळण्यासाठी काय करावे, काय करू नये याविषयी...

सतीश मराठे

पावसाळा सुरू झाला की पूर्वी कुठे किती पाऊस आणि धरणात किती पाणीसाठा याच्या बातम्या यायच्या. कधी कधी पावसाळी पर्यटनाला कुठे जाल, अशाही बातम्या येत. आता पाऊस चालू झाला की, अपघातांच्या बातम्या झळकू लागतात. पावसात हिरवेगार डोंगर, फेसाळते धबधबे दिसू लागतात, त्यामुळे प्रत्येकालाच या हिरवाईचा आनंद घ्यावासा वाटतो. काही इतिहासप्रेमी किंवा गिर्यारोहक पूर्वीपासून या ऋतूमध्ये आपापल्या सॅक घेऊन भटकायला बाहेर पडत. पण हे सगळे अनुभवी लोकांबरोबर असायचे. अपघातांचे प्रमाणही नगण्य होते. आता समाजमाध्यमे आणि आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे पावसाळी पर्यटन कित्येक पटींनी वाढले आहे. एकटे, मित्रांबरोबर किंवा सहकुटुंब बाहेर पडणारे बहुसंख्य लोक अननुभवी असतात. त्यामुळे निसर्गातल्या धोक्यांची किंवा परिस्थिती पटकन बदलून धोकादायक कशी होते, याची कल्पना अशा पर्यटकांना नसते. मग एकामागोमाग एक अपघात होतात. पुढे याचे पर्यवसन सगळ्या जागांवर बंदी येण्यावर होते. अर्थात हा पर्याय उपयोगाचा नसतो. कारण सह्याद्रीच्या रांगेतील प्रत्येक डोंगर आणि दरी पर्यटन करण्यासारखी, तसेच निष्काळजीपणा केल्यास अपघात होण्यासारखी आहे. एके ठिकाण प्रवेश बंद केला की लोक आणखी नवीन ठिकाणी जातात, जिथे मदतही उपलब्ध नसते. मग लोणावळ्याजवळ झालेल्या अपघातावेळी कुटुंबावर अवघड प्रसंग उद्भवला, पण लोक त्यांना मदत करू शकत नव्हते. अनेकांच्या डोळ्यादेखत हे कुटुंब वाहून गेले, अशा दुर्घटना घडतात. कारण तिथे कोणाकडेच दोर किंवा इतर सुरक्षा साहित्य नसते. तसेच ते कसे वापरायचे हे सुद्धा माहीत नसते.

ओळखा निसर्गाला...

एखादी अगदी साधी जागा, छोटासा ओढा किंवा प्रवाहसुद्धा काही वेळातच धोकादायक होऊ शकतो. पाण्याच्या प्रवाहाच्या वर डोंगरात पाऊस चालू झाला तर बघता बघता पाण्याचा प्रवाह वाढतो. अनुभवी व्यक्ती बरोबर नसेल तर हा धोका लक्षात न आल्याने मोठा अपघात होतो. मी असा अनुभव कित्येकदा घेतला आहे. ओढ्याच्या पाण्याच्या रंगात बदल होणे आणि स्वच्छ पाण्याऐवजी गढूळ पाणी वाहू लागणे, पाण्याबरोबर पालापाचोळा वाहत येणे, स्वच्छ पाण्याची पातळी वाढणे ही काही लक्षणे परिस्थिती धोकादायक होणार याची सूचना देतात. अशा वेळी सुरक्षित ठिकाणी जाणे, इतर कोणी अडकू नये म्हणून त्यांना सूचना देणे आवश्यक असते. आमच्या सारख्या भटक्यांकडे दोर आणि इतर साहित्य असते. त्यामुळे आम्ही आमच्या बरोबरच्या लोकांना सुरक्षितपणाने बाहेर काढू शकतो, तरीही हा धोका न पत्करणेच योग्य. वाहत्या पाण्यात काही खळगे असतात, ते बघून लोक त्यात उड्या मारण्याचा खेळ खेळतात. किल्ल्यांवर पाण्याची दगडात खोदलेली टाकी असतात, हे खळगे आणि पाण्याची टाकी त्यात कपरी असल्यास धोकादायक ठरतात. शिवाय या पाण्याला चांगलाच प्रवाह असतो. असे पाणी आपल्याला बघता बघता वाहून नेऊ शकते. त्यामुळे अशा ठिकाणी खात्री असल्याशिवाय उड्या मारू नयेत. पाण्याची खडकातील टाकी पिण्याच्या पाण्याची सोय म्हणून वापरली जातात. त्यात उतरल्याने हा साठा खराब होतो.

मदत आणि समन्वयासाठी महाराष्ट्र माऊंटेनिअर्स रेस्क्यु को-ऑर्डिनेशन सेंटर, संपर्क : ७६२०२३०२३१

सुरक्षित पर्यटनासाठी ...

सहलीला जात असाल तर धबधबे, ओढे अशा ठिकाणी पाण्यात जाऊच नका. दरीकाठी सेल्फी काढणे, रील्स बनवणे टाळा. डोंगरातील रस्त्यांवर दरडी कोसळण्याच्या धोका असतो, त्यामुळे सावध राहा. निसर्गात मोठ्याने गाणी लावणे, व्यसन करणे आणि बेभान होऊन बेसावध होणे टाळा.

तुम्ही ट्रेकिंगला जात असला तर एखाद्या अनुभवी ग्रुपबरोबर जा. त्यांची सरकारी नियमानुसार नोंदणी झाली आहे का, याची प्रमाणपत्र बघून खात्री करा. त्यांच्या बरोबर प्रथमोपचार आणि सुरक्षा साहित्य आहे का, याची खात्री करा.

ग्रुपऐवजी स्वतःच जात असाल तर एखादा गावकरी बरोबर घ्या. त्याने दिलेल्या सुरक्षा सूचनेचे पालन करा.

अनोळखी पाण्यात उतरू नका, ट्रेकला किती चालावे लागेल, याचा नीट अंदाज घ्या आणि वेळेत परत या. कुठल्याही अनुभवी ट्रेकरचे फोन नंबर, प्रथमोपचार पेटी आणि दोर सोबत ठेवा.

सरकारकडून अपेक्षित उपाय

महत्वाचे म्हणजे प्रत्येक स्थळी जास्तीत जास्त किती लोक जाऊ शकतात तो आकडा ठरवा (कॅरिंग कपॅसिटी). सगळ्या ठिकाणी जाण्यासाठी परवानगी आवश्यक करावी. त्यासाठी शुल्कनिश्‍चिती करून जवळच्या गावकऱ्यांना प्रशिक्षण देऊन त्यांची ग्रामारक्षक टीम करावी. त्यांना त्यातून मोबदला देणे आणि त्यांच्यातर्फे पर्यटन स्थळ सुरक्षित ठेवणे.

  • पोलिस, होमगार्ड, वनखात्याचे गार्ड इत्यादी खात्याचे लोक तैनात करून पर्यटनाला शिस्त लावावी. सामान्य व्यक्तीने स्वयंस्फूर्तीने सूचना केल्यास लोक दुर्लक्ष करतील; पण गणवेशामधील एक माणूस सर्व पर्यटकांना शिस्त लावायला पुरेसा असतो.

  • ऑनलाईन बुकिंगची सुरुवात करणे, जशी अभयारण्याला असते.

  • पर्यटकांना व्यसने करणे, स्पीकर लावणे अशा गोष्टींना प्रतिबंध करावा. त्यासाठी दंड किंवा अटक असे उपाय योजावेत.

  • धोकादायक रील्स, सेल्फी काढण्यावर बंदी घालावी. तसे करू पाहणाऱ्यांना शिक्षा करणे.

  • धोक्याच्या सूचना, स्थानिक पोलिस, जवळच्या दवाखान्याचा व मदतपथकांचे संपर्क फोन नंबर अशा पाट्या लावणे.

  • धोकादायक ठिकाणी कुंपण घालून स्थळ सुरक्षित करणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com