Madan Das Devi : संघटनशास्त्राचे भाष्यकार : मदन दास

मदन दास देवी यांच्या निधनाने स्वतंत्र भारताच्या विद्यार्थी आणि युवक चळवळींच्या इतिहासातील एक पर्व संपुष्टात आले आहे.
rss ideologue madan das devi
rss ideologue madan das devi sakal

‘अभाविप’चे संघटनमंत्री राहिलेल्या मदन दास देवी यांनी संघटनात्मक वाढीइतकेच त्याच्या सदस्य विद्यार्थांमध्ये जबाबदारीचे भान, कर्तव्याची जाणीव आणि देशाप्रतीची बांधिलकी निर्माण करण्यावर भर दिला. या संघटनेचा विस्तार हे त्यांच्या दूरदर्शी कार्याचे प्रतीक आहे.

- विनय सहस्रबुद्धे

मदन दास देवी यांच्या निधनाने स्वतंत्र भारताच्या विद्यार्थी आणि युवक चळवळींच्या इतिहासातील एक पर्व संपुष्टात आले आहे. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) जडणीघडणीत महत्त्वाची अशी पायाभूत कामगिरी बजावणाऱ्या यशवंतराव केळकर, बाळ आपटे आणि मदन दास या त्रयींमधील शेवटचा मालुसरा आता अंतर्धान पावला आहे.

अभाविपची स्थापना १९४८मध्ये झाली ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरील बंदीच्या पार्श्वभूमीवर. स्वातंत्र्याची चव चाखलेल्या; परंतु राष्ट्रनिर्माणातील आव्हानांसाठी स्वतःला सिद्ध कसे करायचे, त्याबद्दलची जाण नसलेल्या तरुणांना सामावून घेणारे संघाबाहेरचे पण संघविचारांनी चालणारे असे छात्र युवा संघटन ही काळाची गरज आहे, हे या नेत्यांनी हेरले होते.

ज्यांनी या कामाबद्दलचा सर्वंकष विचार केला, त्यासाठीची एक सैद्धांतिक भूमिका विकसित केली आणि विशुद्ध संघटनशास्त्रावर आधारित अशी निर्दोष व्यूहरचना निर्माण केली, त्यात बिनीचे शिलेदार होते ते केळकर, आपटे आणि मदन दास.

rss ideologue madan das devi
Madan Das Devi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मदनदास देवी यांचे निधन

त्यांच्याबरोबरीने प्रा. अशोक मोडक, राजकुमार भाटिया,ओमप्रकाश कोहली,सदाशिवराव देवधर,शालिग्राम तोमर,पी. व्ही. कृष्णभट व दत्तात्रय होसबाळेंसह इतर कितीतरी!

संघ आणि ‘अभाविप’चा ‘कॅचमेंट एरिया’ एकच होता. म्हणजे दोन्ही संघटनांचे कार्य हे एकाच तरुण वर्गात होते. तरीही दोन्ही संघटनांच्या कामाच्या चौकटीत फरक होता. विद्यार्थी परिषदेचे काम महाविद्यालयांच्या परिसरात विकसित करायचे होते,

त्यात महाविद्यालयीन मुलांबरोबर मुली म्हणजे विद्यार्थिनींही सहभागी होणार अशी प्रथमपासूनच रचना होती. शिवाय परिषदेच्या कामाचा परिघ जरी राष्ट्रीय पुनर्निर्माणाचा असला तरी मुख्य कामाचा गाभा शिक्षणक्षेत्राचा होता.

rss ideologue madan das devi
Madan Das Devi : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मदनदास देवी यांचे निधन

आणखी महत्त्वाचा फरक हा होता तो म्हणजे संघाचे कार्य एखादी व्यक्ती आयुष्यभर करू शकते; पण ‘अभाविप’ ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संघटना असल्याने या संघटनेत एक प्रवाहीपणा स्वाभाविकच असणार होता.

एकदा का विद्यार्थी/विद्यार्थिनी महाविद्यालयातून बाहेर पडले की, ‘अभाविप’मधील त्यांचा सहभाग स्वाभाविकच संपणार. त्यामुळे छात्र-युवा कार्यकर्त्याला विद्यार्थी परिषदेत काम करण्याची संधी मिळत असतांना कमीत कमी कालावधीत त्याच्यात राष्ट्रीय पुनर्निर्माणासाठी आवश्यक असलेला राष्ट्रीय दृष्टिकोन रुजविणे,

सामाजिक समरसतेची आणि सामाजिक न्यायाची; तसेच स्त्री-पुरुष समतेची जाण विकसित करणे आणि मुख्य म्हणजे तो एक चांगला आणि प्रगल्भ नागरिक म्हणून देश विकासाच्या प्रश्नांकडे बघू शकेल, यासाठीची सर्व रचना करणे हे आव्हानात्मक काम ‘अभाविप’च्या धुरीणांकडे होते.

यासाठीचे संघटनशास्त्र संघटनेच्या कार्यपद्धतीच्या बारीकसारीक तपशीलांसह विकसित करण्याचे काम केळकर-आपटे-मदन दास या त्रयीने अथकपणे केले. त्यात स्व. मदनजींचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी आजन्म प्रचारक राहून, व्रतस्थपणे देशाच्या कानाकोपऱ्यात हे संघटनशास्त्र पोहोचविले आणि ‘अभाविप’ला खऱ्या अर्थाने ‘अखिल भारतीय’ केले.

१९७०-८० हा कालखंड ‘अभाविप’च्या इतिहासातला महत्त्वाचा टप्पा म्हणायला हवा. एकीकडे संघटनेचे जाळे विणले जात असतानाच आणीबाणी घोषित झाली आणि विद्यार्थी परिषदेवर अधिकृत बंदी घातली गेलेली नसतानाही देशभरात अनेक कार्यकर्त्यांना अटक करुन कारावासात ठेवले गेले.

अशावेळी काहींनी भूमिगत राहून संघटनेची ज्योत तेवत राहील हे बघण्याचे मोठे आव्हान होते. मदनजी ‘अभाविप’चे संघटन मंत्री, त्यामुळे त्यांच्यावर जबाबदारी अधिक. देशभरातील कार्यकर्त्यांचे नीतिधैर्य शाबूत राखून मदनजींनी ही जबाबदारी समर्थपणे संभाळली.

याच काळात पुढे सामाजिक समरसता आणि सामाजिक न्यायतत्त्वाची हानी करणाऱ्या काही समाजघटकांनी आरक्षणाच्या प्रश्नावरून रण माजविले. पुढे मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या प्रश्नावरही समाजविघटनाचे भयावह चित्र समोर आले. अशावेळी ‘अभाविप’ने लोकशिक्षणाचा आणि प्रबोधनाचा मार्ग स्वीकारून सामाजिक न्यायाची बूज राखली जावी आणि सामाजिक ऐक्य व सौहार्दही कायम राहावे, यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले.

नैतिक अधिकाराचे अधिष्ठान

मदन दास हे ‘अभाविप’चे पहिले संघटनमंत्री. संघटनमंत्री हा संघ परिवारातल्या संघटनांमध्ये त्यांच्या ठायी असलेल्या संघटनकौशल्यासाठी ओळखला जातो. मुख्य म्हणजे त्याला सर्वांना संभाळून घ्यावे लागते, प्रसंगी रोष ओढवून घेणे,

वाईटपणा घेणे अशीही कामे संघटनेच्या व्यापक हितासाठी करावी लागतात. महत्त्वाचे म्हणजे संघटनमंत्र्याकडे बाकी कोणताही घटनादत्त अधिकार नसला तरी नैतिक अधिकार हा असावाच लागतो. मदनजींकडे हा नैतिक अधिकार ठळकपणे होता आणि त्यांनी तो आवश्यक तेव्हा वापरलादेखील.

संघटनमंत्र्याला संघटनेच्या सर्व कार्यकर्त्यांची आपल्या कामावरची श्रद्धा भंग पावणार नाही, हेही बघावे लागते. संपर्क, संवाद आणि सौहार्द या शिदोरीवर मदनजींनी हे सर्व यशस्वीपणे सांभाळून नंतर येणाऱ्या संघटनमंत्र्यांसाठी एक प्रथा-पद्धती आखून दिली. एकदा एका भाषणात मदनजींनी गीतेतल्या ‘अनपेक्षा, शूचिर्दक्षा’ या श्लोकाला उद्धृत करुन मांडणी केली होतीच, पण महत्त्वाचे म्हणजे स्वतः ते आयुष्यभर तसेच जगले!

परिषदेचा संघटनमंत्री या नात्याने दीर्घकाळ काम करणे तितकेसे सोपे नाही, कारण वय वाढले तरी कामाचे क्षेत्र कॉलेज कॅम्पस हेच असल्याने शिंगे मोडून वासरात म्हणतात तशी युवकांमध्ये उठबसही करावीच लागते.

तरुणांमध्ये तरुण होऊन वावरणे आणि तरीही पदाची प्रतिष्ठा राखणे हे तसे जिकिरीचेच. पण मदन दास यांनी ही अवघड जबाबदारी लीलया पेलली. तसे बघितले तर ‘अभाविप’च्या धुरीणांनी मुख्यत: युवकांमधली आदर्श मैत्री कशी असायला हवी याचे अनेक वस्तुपाठ घालून दिले आहेत. मैत्रीचे एक विज्ञान विकसित केले आहे.

मदनजी या विज्ञानाचे उपासक तर होतेच, पण नंतर ते भाष्यकारही झाले, हे महत्त्वाचे! विद्यार्थ्यांच्या सामाजिक सक्रियतेचे व त्यासाठीच्या संघटनशास्त्राचे, कालजयी कार्यपद्धतीचे विस्तृत आणि तपशीलवार प्रारूप तयार करणाऱ्यांमध्ये मदन दास प्रमुख होते. आत्ताच्या आव्हानात्मक काळात हे मूळ प्रारूप शाबूत राखून त्यात गुणात्मक भर टाकण्याचे काम त्यांच्या हजारो अनुयायांकडे आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com