अभिव्यक्तीचे समृद्ध सांस्कृतिक व्यासपीठ 

सदानंद देशमुख
गुरुवार, 19 ऑक्टोबर 2017

तहान, भूक, वासना या शारीरिक गरजा सर्व प्राण्यांत असतात, मात्र यानंतर मानवात अभिव्यक्तीची भूकसुद्धा असते. गुहेत राहताना आदिमानवानेही फावल्या वेळात पहिल्यांदा गुहेच्या भिंतीवर रेघोट्या ओढून आपली अभिव्यक्ती प्रकट केली. यातूनच पुढे चित्रलिपी, चित्रकथा आणि इतर कलांचा विलास व विकास झाला.

सणांच्या माध्यमातून कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर अनुभवविश्‍व प्रकट करण्याची संधी मिळत असते. दिवाळीचा सण हा मानवी मनातील हर्षानंद व्यक्त करणारे अभिव्यक्तीचे सशक्त, समृद्ध असे सांस्कृतिक व्यासपीठ आहे. 

हर्ष आणि उल्हासाचे प्रतीक असणारा, समाजव्यवस्थेत चैतन्यकळा आणि आनंद निर्माण करणारा दिवाळीचा सण म्हणजे परंपरेने समाजाला दिलेली अभिजात अशी सांस्कृतिक देणगी आहे. थाटामाटात साजरा होणाऱ्या या सणाला चैतन्यकळेचे अनेक पदर असतात. भारतीय सण, उत्सव हे श्रममूल्यांशी निगडित आहेत आणि भारतीय संस्कृती प्रामुख्याने कृषिकेंद्रित आहे. कृषिसंस्कृतीत म्हणजेच श्रमसंस्कृतीत श्रमाला प्राधान्य दिले जाते. त्यात बाराही महिने कष्ट करावे लागतात. शेतीचा हंगाम विशिष्ट कालावधीत येत असला तरी पूर्वमशागत, आंतरमशागत, पेरणी, काढणी, कापणी या कृतिशील बाबी बाराही महिने सुरू असतात. मात्र, या कालावधीत अधूनमधून श्रमपरिहार व्हावा, ज्या कृषीने धनधान्य दिले, तिच्याविषयीचा ऋणभाव व्यक्त व्हावा, त्याचप्रमाणे चैतन्य आणि आनंदाची अभिव्यक्ती व्हावी, यासाठी समाजपुरुषांनी सणांची मांडणी केल्याचे दिसते. सणांच्या भोवती अनेक पदर दिसून येतात. श्रमपरिहार, हर्षानंद, ऋणभाव व्यक्त करणे, याबरोबरच समाजव्यवस्थेतील नैतिकता आणि पावित्र्य जपणे, साहचर्य- संबंध वाढविणे, एकोपा निर्माण करणे इत्यादी मानवतावादी, सामाजिक दृष्टिकोनही यामागे असतोच. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. त्यामुळे सण - उत्सव कधी वैयक्तिक, कौटुंबिक पातळीवर साजरे केले जातात, तर कधी समूहकेंद्री होऊन त्यांच्या सादरीकरणाचा परीघ विस्तारला जातो. त्यांना सार्वत्रिक स्वरूप प्राप्त होते. 

तहान, भूक, वासना या शारीरिक गरजा सर्व प्राण्यांत असतात, मात्र यानंतर मानवात अभिव्यक्तीची भूकसुद्धा असते. गुहेत राहताना आदिमानवानेही फावल्या वेळात पहिल्यांदा गुहेच्या भिंतीवर रेघोट्या ओढून आपली अभिव्यक्ती प्रकट केली. यातूनच पुढे चित्रलिपी, चित्रकथा आणि इतर कलांचा विलास व विकास झाला. चित्र, शिल्प, काव्य, पाककला यांतून मानवी अभिव्यक्तीला विविध पदर प्राप्त झाले. सण, उत्सवाच्या सादरीकरणामागेसुद्धा ही आदिप्रेरणाच कारणीभूत असते. सण-उत्सवाचे सादरीकरण म्हणजे स्त्री-पुरुषांच्या अभिव्यक्तीला प्राप्त झालेले व्यासपीठ असते. दिवाळीसारख्या सणात गाणे-बजावणे, सजणे-धजणे, हर्षोल्हास व्यक्त करण्यासाठी रंगरंगोटी, रोषणाई करणे, याबरोबरच फराळाच्या माध्यमातून धान्यांपासून विविध रंगाकाराचे किंवा चवीधवीचे खाद्यपदार्थ बनविणे ही बाबसुद्धा स्त्रियांच्या पाककलेतील अभिव्यक्तीला व्यासपीठ मिळवून देणारी, म्हणून महत्त्वपूर्ण ठरते. 

प्रत्येक सणाची निर्मिती कशी झाली असावी याचा शोध घेताना किंवा कारणमीमांसा करताना अभ्यासकांनी वेगवेगळी मते नोंदवली आहेत. उदा. पोळा हा सण शेतीत बारोमास राबणाऱ्या बैलांप्रती आदरभाव व्यक्त करण्यासाठी केला जातो. शेतीत काम करताना प्रत्यही दिसणाऱ्या नागासारख्या विषारी प्राण्याविषयीचे भय कमी व्हावे म्हणून त्याला देवत्व देऊन नागपंचमी साजरी केली जाते. पित्तरपाटच्या माध्यमातून पूर्वजांचे स्मरण करून त्यांचा पूजाविधी केला जातो. घटस्थापनेच्या माध्यमातून शेतमाती घरी आणून वावरीची पूजा केली जाते. तसेच रब्बी हंगामाची ती बीजप्रक्रिया असते, कृषी प्रयोगशाळा असते, असे शास्त्रीय स्वरूपही सांगितले जाते. रामायण, महाभारत या धर्मग्रंथांतील आशय- विश्‍वाशीसुद्धा उपकथानकांच्या आणि जोडकथांच्या माध्यमातून सण-उत्सवाचे नाते जोडले जाते आणि त्यांना धार्मिक, आध्यात्मिक पातळीवर नेऊन मनाला प्रसन्न करणारे पावित्र्य दिले जाते. त्यापैकीच दिवाळीचा सण मानवी मनातील हर्षानंद व्यक्त करणारे त्याचे अभिव्यक्तीचे सशक्त, समृद्ध असे सांस्कृतिक व्यासपीठ असते. म्हणूनच दसरा, दिवाळी किंवा इतर सणांमध्येही राम-कृष्णाच्या कथा गुंफलेल्या दिसतात. प्रत्येक सणामध्ये या कथांची रेलचेल असते. त्यामुळे सणउत्सवांना धार्मिक अधिष्ठान प्राप्त होते आणि सण साजरे करताना एक आंतरिक ऊर्जा आणि आध्यात्मिक शक्ती प्राप्त होते. 

सणांच्या माध्यमातून कौटुंबिक, सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवरचे अनुभवविश्‍वसुद्धा व्यक्त करण्याची संधी साधलेली दिसून येते. विशेषतः स्त्रियांनी आपले भावविश्‍व लोकगीतांच्या माध्यमातून सणांच्या निमित्ताने व्यक्त केलेले ग्रामव्यवस्थेत दिसून येते. उदाहरणार्थ विवाहित स्त्री वर्षाच्या इतर काळात संसारात, रामरगाड्यात गुरफटलेली असते, मात्र दिवाळीच्या काळात तिच्या माहेरच्या स्मृतींना उजाळा मिळतो. माहेरच्या वाटेचे, तिथल्या माणसांच्या सहवासाचे वेध तिला लागतात. मनाची ही उत्कट, अधीर अवस्था व्यक्त करताना तिच्या तोंडून शब्द येतात 

सणांमधी सण दिवाळी बहू आनंदाची 
नेणत्या बंधूची वाट पाह्यते गोईंदाची... 
बहिणीला भाऊ एक तरी गं असावा 
चोळी-बांगडी एका रातीचा विसावा... 
नवी वस्त्रे देऊन भाऊराया आपली पाठवणी करेल, ही खात्री तिला असते. म्हणूनच - 
किती पाहू वाट बाई दिवाळी सणाची 
सावळा बंधू घेईल साडी- चोळी गं मोलाची! 

अशी तिची अवस्था ती लोकगीतातून मांडते. अर्थात ती प्रातिनिधिक असते. 
नव्या वस्त्रांची, नव्या वस्तूंची वर्षभराची प्रतीक्षा दिवाळीच्या निमित्ताने संपणार, ती वस्तू आपल्याला मिळणार, याची खात्री घरातल्या सगळ्यांना असते. याच काळात शेतावरच्या खरिपाच्या हंगामाचे उडीद, मूग, सोयाबीनचे पैसे हाती आलेले असतात किंवा येणार असतात. किमान त्या उत्पन्नाच्या झडतीचा अंदाज तरी आलेला असतो. त्या भरवशावर तो उचल-उधारी करून कुटुंबीयांची इच्छापूर्ती करणार असतो. त्यामुळे मनामनांत आनंद पसरलेला असतो. हा आनंद स्वच्छतेच्या, नवेपणाच्या, उजळ-उजळल्या प्रकाशाच्या माध्यमातून गाव-शहराला चैतन्यकळा प्राप्त करून देतो. व्यापार व्यवस्थेत बाजारपेठांतून होणारे खरेदी-विक्रीचे व्यवहार, नोकरदारांना मिळणारा बोनस, त्यातून केलेली खरेदी या माध्यमातून चैतन्यकळा देणारा आनंदीआनंद असतो. त्यामुळेच दिवाळीला इतर सणांच्या तुलनेत सणउत्सवाच्या परिक्रमेत अग्रस्थान प्राप्त झालेले असते. 

दिवाळीच्या पाच दिवसांतील मध्यस्थानी येणारे लक्ष्मीपूजन धनसंपदेमुळे उत्साहाने साजरा केले जाते. नवरात्रीच्या दिवसांत मातीची, तशी दिवाळीच्या दिवसांत मातीतून प्राप्त झालेल्या धनसंपत्तीची पूजा केली जाते. ही धनसंपत्ती शेतीमातीतून घरी आणलेल्या धान्यरूपात किंवा त्या धान्याच्या विक्रीतून प्राप्त झालेली असते. त्यामुळे कृषिव्यवस्थेत सुकाळ असेल, तर दिवाळी चैतन्यशाली होते.

Web Title: Sadanand Deshmukh writes about culture