मतदान करण्यापूर्वी स्वतः विचार करा

प्रत्येक निवडणूक एक मोठी शक्यता असते. प्रत्येक नागरिकाला गेल्या पाच वर्षांचे मूल्यमापन करण्याची आणि जाणीवपूर्वक स्वतंत्रपणे मतदान करण्याची ही संधी आहे.
Voting
VotingSakal

प्रत्येक निवडणूक एक मोठी शक्यता असते. प्रत्येक नागरिकाला गेल्या पाच वर्षांचे मूल्यमापन करण्याची आणि जाणीवपूर्वक स्वतंत्रपणे मतदान करण्याची ही संधी आहे. त्यामुळेच या संधीकडे पाठ फिरविणे योग्य ठरणार नाही. प्रत्येकाने मतदानाचे कर्तव्य बजावले पाहिजे.

मी अनेकदा गमतीने म्हणतो की भूतांचे दोनच प्रकार आहेत: शरीर नसलेले आणि शरीर असलेले! बहुतेक मनुष्य हे फक्त शरीर असलेली भूतं असतात. थोडक्यात, ते त्यांच्या भूतकाळाचे भूत आहेत. त्यांचे जीवन केवळ वारशाने मिळालेल्या सवयी आणि उधार घेतलेल्या विचारसरणीद्वारे चालू असते. जरी आध्यात्मिक प्रक्रिया द्वैताचा भ्रम संपवण्याबद्दल असली तरी एक महत्त्वाची पहिली पायरी म्हणजे, आधी ‘एक व्यक्ती’ बनणे.

जेव्हा तुम्ही अनेक प्रभावांचे परिणाम असता, तेव्हा तुम्ही एक ‘समूह’ आहात. जेव्हा तुम्ही एक समूह असता तेव्हा परिवर्तन अशक्य असते. लोकांचा समूह विकसित होऊ शकतो, परंतु त्याचे रूपांतर होऊ शकत नाही. परिवर्तन (transformation), हा शब्दच सूचित करतो, की त्याला एक आकार (form), आवश्यक आहे. समूहाला आत्मज्ञान होणे अशक्य आहे. आत्मज्ञान केवळ व्यक्तीलाच होऊ शकते.

एक व्यक्ती बनणे जर आध्यात्मिक प्रक्रियेसाठी आवश्यक असेल तर लोकशाही प्रक्रियेसाठी ते तितकेच आवश्यक आहे. दुर्दैवाने, बरेच लोक त्यांचे मत वैयक्तिक म्हणून नव्हे तर गट म्हणून देतात. आपण अशा युगात जगत आहोत जिथे भाऊबंदकीचेच नवीन रूप समोर येत आहे.

आपण आजकाल पक्षाच्या धोरणातील गुण-दोषांचा विचार करून मग भूमिका घेत नाही; आपला पाठिंबा नसलेल्या पक्षाने (‘शत्रू टोळी’) जर काही धोरणे आखली असतील, तर आपण त्यांचा तीव्र विरोध करतो आणि आपलं समर्थन असलेल्या पक्षाने आखलेली धोरणे असतील तर आपण त्यांचे मनापासून समर्थन करतो! हे निव्वळ भाऊबंदकीतील भांडणासारखे आहे आणि त्याचा लोकशाहीशी काहीही संबंध नाही.

... तर ही शोकांतिका

स्वतंत्र बुद्धीच्या जोरावर निर्णय घेण्याची नागरिकांची क्षमता हा लोकशाहीचा पाया आहे. सामूहिक निष्ठा तुम्हाला क्लबसदस्यत्वाची सुरक्षितता किंवा सामूहिक ओळखीची सोय देऊ शकते. पण हे फक्त धार्मिक कट्टरतेचे राजकीय स्वरूप आहे, धर्मवेडेपणाचा एक नवीन ब्रँड आहे. आपण ‘धर्म’ आणि ‘जात’ या अडथळ्यांच्या पलीकडे जाऊन मतदान करण्याविषयी बोलतो. पण पक्ष हाच एक नवा धर्म झाला आहे! आपल्यासारखे मतदान करणाऱ्यांना आपण ‘आस्तिक’ मानतो आणि इतरांना ‘नास्तिक’. ही अधोगतीकडे नेणारी परिस्थिती आहे.

बहुतेक लोक एखाद्या पक्षाला मत देतात, याचे कारण त्यांच्या पालकांनी आणि आजी-आजोबांनी त्या पक्षाला मत दिले आहे; किंवा त्यांनी जर वेगळा विचार केला, तर त्यांच्या मित्र वर्तुळातून ते वगळले जातील. अमेरिकेत तुम्ही एखाद्याला त्यांच्या मतदानाच्या इतिहासाबद्दल विचारल्यास, ते सहसा म्हणतात, मी रिपब्लिकन आहे, याचे कारण माझे वडील आणि आजोबा रिपब्लिकन होते. ‘‘तुमचे राजकारणही अनुवांशिक असेल, तर ही एक शोकांतिका आहे!’

लोकशाहीची कल्पना ही एक विलक्षण कल्पना आहे. पण लोकशाही चालवायची असेल, तर प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा विचार करता आला पाहिजे आणि मतदान करता आले पाहिजे. जेव्हा समूह एकत्रितपणे मतदान करतात तेव्हा ही लोकशाहीच्या वेशात सरंजामशाही असते. तुम्ही कुटुंब, जात किंवा धार्मिक गट म्हणून मतदान करत असाल, तर याचा अर्थ तुम्ही आता स्वतःचा विचार करत नाही. तुम्ही गुप्त मतपत्रिकेद्वारे मिळालेली संपूर्ण शक्यता वाया घालवली आहे. त्याची गुप्तता तुमच्या सद्सद्विवेकबुद्धीनुसार मतदानाच्या अधिकाराचे रक्षण करण्यासाठी होती.

प्रत्येक निवडणूक एक मोठी शक्यता असते. प्रत्येक नागरिकाला गेल्या पाच वर्षांचे मूल्यमापन करण्याची आणि जाणीवपूर्वक स्वतंत्रपणे मतदान करण्याची ही संधी आहे. अंध सामूहिक निष्ठेवर पूर्वनिर्धारित निर्णय नाही. लोकशाहीचे सौंदर्य हे आहे की ते रक्तपाताशिवाय सत्तेचे हस्तांतर ती घडवते. मानवी इतिहासात क्वचितच हिंसा आणि रक्तपात न करता सत्ता हस्तांतरित झाली आहे.

गुप्त मतपत्रिकेच्या बळावर हे सामंजस्यपूर्ण सत्तेचे हस्तांतर करणे हा आज आपला प्रचंड अधिकार आहे. मानवतेने धर्माकडून जबाबदारीकडे जाण्याची वेळ आली आहे. हे केवळ आपल्या आध्यात्मिक जीवनासाठी उपयुक्त नाही. हे राजकीय प्रक्रियेसाठीही उपयुक्त आहे. ‘आसक्त प्रवृत्तीपासून जागरूकतेकडे’ हा खरा अध्यात्माचा मार्ग आहे. आणि ‘पूर्वनिर्धारित मतापासून, विचारपूर्वक मतापर्यंत’ - हा खरा लोकशाहीचा मार्ग आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com