हौस ऑफ बांबू : मन्मनी अनुवादिनी..!

नमस्कारा! गेला आठवडाभर मी नवव्या ढगावर (अनुवाद : क्लाऊड नाइन) नुसती पिसासारखी तरंगत्ये आहे. माझ्या दोन घट्ट मैतरिणींना साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले
हौस ऑफ बांबू : मन्मनी अनुवादिनी..!
हौस ऑफ बांबू : मन्मनी अनुवादिनी..!Sakal news

नमस्कारा! गेला आठवडाभर मी नवव्या ढगावर (अनुवाद : क्लाऊड नाइन) नुसती पिसासारखी तरंगत्ये आहे. माझ्या दोन घट्ट मैतरिणींना साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर झाले. कोल्हापूरच्या सोनालीताई नवांगुळ आणि (मूळच्या) मराठवाड्याच्या मंजुषाताई कुलकर्णी!

सोनालीताई, मंजुषाताई आणि सरोजताई हे त्रिकूट मराठी साहित्याच्या प्रांगणात सुपरिचित आहेच. सोनालीताईंनी तामीळ भाषेतल्या ‘इरंदम जानमकालिन कथै’ (अनुवाद : मध्यरात्रीनंतरचे तास) या कादंबरीचा मराठीत अनुवाद (अनुवाद : ट्रान्स्लेशन) केला, आणि अकादमी पुरस्कार पटकावला. डॉ. मंजुषाताईंनी तर कमालच केली. त्यांनी ‘प्रकाशवाटा’ या डॉ. प्रकाशबाबा आमटे यांच्या कथनाचा चक्क संस्कृत भाषेत अनुवाद करुन साहित्य अकादमीचा सन्मान मराठीच्या अंगणात आणला. माझ्याही आगामी पुस्तकाचा अनुवाद लौकरच प्रकाशित होण्याच्या वाटेवर आहे. पण मूळ पुस्तक आधी लिहावं आणि नंतर अनुवाद आणावा की आधी अनुवाद लिहून टाकून नंतर मूळ पुस्तकाकडे वळावं, हे अजून मला कळत नाहीए. असो.

साहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यावर सोनालीताईंनी मंजुषाताईंना फोन करुन अभिनंदन केलं. मग मंजुषाताईंनी सोनालीताईंना फोन करुन ‘अभिनंदनम करिष्यामि’ केलं. या फोननंतर मंजुषाताईंनी संस्कृत भाषेसाठी भरीव काहीतरी करण्याचा संकल्प सोडला आहे, म्हणे. त्याची पहिली पायरी म्हणून त्या म्हणे सोनालीताईंना संस्कृत शिकवणार आहेत! गंमत बघा, आमच्या सोनालीताईंनी (कोल्हापुरात बसून) ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ (अनेक तास घेऊन) अनुवादित केलं आणि पुढे आश्चर्यच घडलं. त्याला साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाल्याच्या सुमारालाच तिकडे मराठवाडा साहित्य संमेलन भरलं. आमचे कौतिकराव ठाले-पाटील मांडवातल्या ग्रंथविक्री दालनात करडी नजर ठेवून हिंडत होते. (म्हणून काही जण त्यांना हल्ली स्टॉले-पाटील म्हणायला लागले आहेत…असो.)

तिथल्या मांडवात सोनालीताईंचे ‘मध्यरात्रीनंतरचे तास’ भर दुपारी एका तासाभरात संपले म्हणे! कमाल आहे की नाही? मराठवाडा साहित्य संमेलनात पुस्तकं धड खपत नाहीत, अशी प्रकाशकांची तक्रार होती. यंदा साडेसात लाखाची पुस्तकं दोन दिवसात संपली, म्हंजे बघा! कोण म्हणतं मराठी पुस्तकांना वाईट दिवस आले?

मंजुषाताईंचं तर काही विचारुच नका. त्यांच्या आईवडलांनी लहानपणापासूनच संस्कृतचे धडे द्यायला सुरवात केली होती. (मैंने संस्कृत ऑप्शन कू डालके हिंदी सबजेक्ट लिया था! रहने दो! म्हंजे असो.) पुढे संस्कृतसाठी काहीतरी करायला हवं, असं वाटून त्यांनी थेट पीएचडीच केली. त्यावेळी भर पुण्यात पीएचडीला संस्कृतचा गायडन्स द्यायला कुणी उपलब्धच नव्हतं म्हणे. पुण्यात अनेक लोक संस्कृत बोलतात, पण ते संध्याकाळनंतर!! दिवसा हल्ली हिंदीत बोलतात. परवा कोथरुडहून टिळक रोडवर जाताना रिक्षाचालकाला ‘मसाप’ सांगितलं तर म्हणाला, ‘किधर जाने का है? ठीकसे अड्रेस बताना!’ त्याला संस्कृतमध्ये काहीतरी सुनावणार होते, पण म्हटलं, जाऊ दे. मी संस्कृत ऑप्शनला टाकून हिंदी घेतली, पण आमच्या मंजुषाताईंची कमाल म्हणजे त्यांनी हिंदी भाषेवरही तितकंच प्रभुत्व मिळवलं. हे कसं काय जमवलं, त्यांनाच विचारणार आहे…

मंजुषाताईंनी ‘प्रकाशवाटा’चा गीर्वाण भाषेत ‘प्रकाशमार्ग:’ असा अनुवादम केला. त्याचं मराठीत ट्रान्स्लेशन करुन घेण्यासाठी कोल्हापूरचे मेहता प्रकाशक सध्या फोनाफोनी करताहेत, अशी खबर आहे. (अनुवाद म्हटलं की मेहताजी ऐक्कत नाही कुणाचं.) आमच्या मंजुषाताई आहेतच मुळात भाषा संचालक! मंजुषाताईंची एव्हाना पंचवीसेक पुस्तकं लिहून झाली आहेत आणि तेवीस पुस्तकं प्रकाशनाच्या वाटेवर आहेत, हे कळल्यानंतर मराठीतल्या अनेक सिद्धहस्त लेखकांना नैराश्याचा झटका आल्याचं कळतंय. स्वाभाविक आहे.. हो ना?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com