
Dr. Ashish Jha: अभ्यासू आरोग्य तज्ज्ञ
जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेत भारतीय वंशाच्या अनेक व्यक्ती आपल्या कर्तृत्वाचा डंका वाजवत आहेत. यात आता आणखी एका नावाची भर पडली आहे. १७ मार्च रोजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी एक ट्विट केले आणि तमाम भारतीयांची मान अभिमानाने उंचावली. बायडेन यांनी लिहिले, ‘‘व्हाईट हाऊसचे कोविड रिस्पॉन्स कॉर्डिनेटर म्हणून डॉ. आशीष झा यांच्या नावाची घोषणा करताना आनंद होतो आहे. ते आघाडीचे आरोग्यतज्ज्ञ आहेत. सार्वजनिक जीवनातील त्यांच्या अभ्यासू आणि संयत व्यक्तिमत्त्वाला अमेरिका चांगलीच परिचित आहे.’’ व्हाईट हाऊसच्या या घोषणेनंतर डॉ. झा यांचे नाव प्रकाशझोतात आले असले तरी त्यांना हे यश एका दिवसात मिळालेले नाही. अनेक वर्षांच्या साधनेचा आणि सातत्यपूर्ण कामाचा पाया त्यांच्या या यशोशिखराच्या मुळाशी आहे.
डॉ. झा यांचा बिहारच्या मधुबनी जिल्ह्यात १९७० मध्ये जन्म झाला. त्यांचे आई-वडील शिक्षण क्षेत्राशी संबंधित होते. साहजिकच शिक्षणाचे संस्कार त्यांना घरातूनच मिळाले. आशीष नऊ वर्षांचे असताना त्यांचे आई-वडील कॅनडात गेले. चार-पाच वर्षे तिथे राहून झा कुटुंब अमेरिकेतील न्यू जर्सी येथे स्थलांतरित झाले. तेथीलच बून्टॉन हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. पुढे कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी अर्थशास्त्रात बी.ए. केले. वैद्यकीय शिक्षण हावर्ड विद्यापीठातून पूर्ण केले. १९९७ मध्ये ते एम.डी. झाले. त्यानंतर कॅलिफोर्निया विद्यापीठात इंटर्नल मेडिसीन शाखेचे म्हणजे रोगांचे निदान, प्रतिबंध आणि उपचारासंबंधी प्रशिक्षण घेतले. त्यानंतर डॉ. झा यांनी २००४ मध्ये हार्वर्ड स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथून मास्टर ऑफ पब्लिक हेल्थची पदवी संपादित केली आणि वैद्यकीय सेवेला आरंभ केला.
त्यांनी हार्वर्ड चेन स्कूल ऑफ पब्लिक हेल्थमध्ये दीर्घकाळ अध्यापनाचे काम केले. हार्वर्ड ग्लोबल हेल्थ इन्स्टिट्यूटच्या संचालकपदाची जबाबदारीही त्यांनी पार पाडली. तसेच अलब्राईट स्टोनब्रिज ग्रुपचे वरिष्ठ सल्लागार म्हणून डॉ. झा यांनी विशेष भूमिका निभावली. २०२० मध्ये ब्राऊन विद्यापीठाच्या अधिष्ठातापदाची सूत्रे स्वीकारली. हा त्यांच्या कारकिर्दीचा महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा ठरला. याच वर्षी कोविडच्या महासाथीने जगासह अमेरिकेतही थैमान घातले. या काळात डॉ. झा यांचे कोविडविषयीचे सल्ले फायदेशीर ठरले. २०२०च्या मार्चच्या मध्यात त्यांनी देशभरात दोन आठवडे विलगीकरण करण्याचा उपाय सुचवला. तेव्हा अमेरिकेत कोविड चाचणीच्या सुविधा अत्यंत अल्प होत्या.
संसर्ग झालेली व्यक्ती ओळखणे कठीण होते. संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये लक्षणे दिसण्यास किमान दोन आठवड्यांचा अवधी लागे. तेवढ्या काळात आरोग्य व्यवस्थेला कोविडसंबंधी निर्णय घ्यायला अवकाश मिळेल, असे झा यांचे म्हणणे होते. त्यानंतर अमेरिकेतील आरोग्य क्षेत्रातील संसाधने मजबूत करण्याविषयी त्यांनी नेहमीच आग्रही भूमिका घेतली, तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांच्या रक्षणासाठी संरक्षक साधनांची निर्मिती करण्यावरही भर दिला. १ एप्रिलपासून ते पदभार स्वीकारणार आहेत. त्यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर आहे. अमेरिकेत कोविडमुळे नऊ लाखांपेक्षा जास्त नागरिकांनी प्राण गमावले आहेत. कोविडमुळे सर्वाधिक हानी झालेल्या देशांमध्ये अमेरिकेचा समावेश आहे. अशा परिस्थितीत झा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता ते ही जबाबदारी यशस्वीपणे पेलतील.
- कौस्तुभ पटाईत
Web Title: Sakal Editorial Article Dr Ashish Jha
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..