अग्रलेख : 'आपला' तो चंद्र!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 जुलै 2019

चांद्रयान मोहीम हा भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचा देदीप्यमान आविष्कार आहे. आपल्या समाजात चिकित्सक वृत्ती निर्माण व्हावी, संशोधनाच्या प्रेरणा निर्माण व्हाव्यात, यासाठीच्या प्रयत्नांना या मोहिमेमुळे गती मिळावी. 

पहिल्या उपग्रहाची सामग्री चक्क बैलगाडीवरून आणि सायकलवरून ज्या देशाने वाहून नेली, त्या देशाने यशस्वीरीत्या चांद्रयानाचे प्रक्षेपण केले आणि आणखी सुमारे दीड महिन्यातच त्या देशाचे यान थेट चांद्रभूमीवर उतरणार आहे. पुराणांतल्या वानगीला छद्मविज्ञानाची फोडणी देत पोकळ अस्मितांचे ढोल वाजविले जात असल्याच्या या काळातला वैज्ञानिक प्रगतीचा हा देदीप्यमान आविष्कार. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरण्याचा पराक्रम करणारा भारत हा पहिलाच देश ठरणार आहे.

या मोहिमेतील स्वयंपूर्णतेमुळे या यशाला एक वेगळी झळाळी मिळाली आहे. एकूणच या यशाच्या कौतुकाचे पडघम आज संपूर्ण देशात वाजत आहेत आणि ते स्वाभाविकही आहे. प्रत्येक भारतीयाच्या मनात या यशामुळे देशगौरवाचे चांदणे पडायलाच हवे. हे आवर्जून सांगावे लागते, याचे कारण या देशात आजही अनेक चिंतातुर जंतू आहेत. रस्त्यांवर अजूनही चांद्रभूमीसारखे खड्डे आहेत आणि तुम्ही चंद्रावर कसल्या स्वाऱ्या काढता? त्या पैशांतून येथील किती खड्डे बुजले असते, असा हिशेब करणारे हे चिंतोबा. त्यांना हे सांगावे लागेल, की अवकाश संशोधन ही पैशांची उधळपट्टी नसते, तर ती देशविकासासाठी केलेली दीर्घकालीन गुंतवणूक असते.

1969मध्ये पं. जवाहरलाल नेहरू आणि विक्रम साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेची- इस्रोची स्थापना केली नसती, तर आज आपले संदेशवहन एकतर टपाल खात्याच्या भरवशावरच चालल्याचे दिसले असते किंवा मग परदेशी संस्थांच्या. हेच अन्य विज्ञानसंशोधन संस्थांबाबत. तेव्हा अंतराळ मोहिमांच्या खर्चाचा वगैरे आपल्याला न पेलणारा विचार न करता, या यशाबद्दल इस्रोच्या वैज्ञानिकांचेच नव्हे; तर त्यांना संशोधनासाठी सुयोग्य वातावरण व सुविधा निर्माण करून देणाऱ्यांचेही अभिनंदन केले पाहिजे.

या यशाने देशाची आंतरराष्ट्रीय पातळीवर जी पतवाढ झालेली आहे, त्याबद्दल आनंद व्यक्त केला पाहिजे. मात्र ते करताना हेही लक्षात घेणे आवश्‍यक आहे, की हा प्रसंग म्हणजे केवळ साजरीकरणाचा 'इव्हेन्ट' नव्हे. अलीकडे 'इव्हेन्टग्रस्तते'चा आजार झालेल्या या देशास अस्मितांचे फटाके फोडण्यासाठी क्रिकेटच्या सामन्यातील फुटकळ विजयही पुरतो. हा प्रसंग मात्र त्यातला नव्हे. कारण या यशाने आपल्या सर्वांनाच पुन्हा एकदा एका वेगळ्याच जबाबदारीची जाणीव करून दिलेली आहे. ती म्हणजे - विज्ञाननिष्ठ समाजनिर्मितीची. 

आधुनिक भारताच्या निर्मात्यांनी राज्यघटनेच्या माध्यमातून आपल्याला हा वसा दिला होता. वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवण्याचे एक व्रत दिले होते आणि ते केवळ विज्ञानक्षेत्रापुरतेच मर्यादित नव्हते. मानवी जीवनाला अवगुंठून टाकणारी सर्वच क्षेत्रे त्यात यावीत, असा त्यांचा आग्रह होता. कारण देशाच्या सुयोग्य प्रगतीसाठी, सहिष्णू समाजनिर्मितीसाठी ते आवश्‍यक होते. एक समाज म्हणून आपणांस तो वसा कितपत पेलला? बरोबर 50 वर्षांपूर्वी चंद्रावर मानवाने पाऊल ठेवले. बारा मिनिटांचे ते अद्‌भुत. त्या वेळी आपल्यातील काहींनी ते पाहिले, काहींनी पाठ्यपुस्तकांतून वाचले. काल-परवा आपल्याकडील माध्यमांनी त्याचा मोठा उत्सवही साजरा केला. पण त्या चांद्रविजयाने आपल्या विचारपद्धतीत काही फरक पडला का, हा खरा प्रश्न आहे.

आज विज्ञानाचे, तंत्रज्ञानाचे विविध शोध लागत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता निर्मितीचे विविध प्रयोग होत आहेत. त्यातून जगाच्या ज्ञान आणि संपत्तीत भर पडत आहे. पण एक उपभोक्ता यापलीकडे आपला आणि त्याचा काही संबंध आहे? हे सारे घडते याचे कारण विज्ञानाबाबतचा आपला अर्धवट दृष्टिकोन. माणूस चंद्रावर गेला तरी इकडे चंद्रग्रहणात कसलेसे विधी करणारा समाजच पुढे जाऊन सगळेच शोध आमच्याकडे पूर्वीच लागले होते, असे म्हणत बसत असतो. हा केवळ अडाणीपणा नव्हे तर न्यूनगंडही असतो. समाजाचा एक मोठा भाग त्याने ग्रासलेला असतानाही आपण चांद्रमोहिमा यशस्वी करतो आहोत, हाच खरेतर एक चमत्कार म्हणावा लागेल. अशा वेळी या 'चमत्कारा'चा केवळ छातीठोक जल्लोष करण्याऐवजी देशातील नव्या पिढीतूनही असे 'चमत्कार' करणारे घडावेत यासाठी प्रयत्न करायला हवेत. केवळ शास्त्र शाखांत शिक्षण घेणे यातून विज्ञाननिष्ठा तयार होत नसते.

प्रश्न विचारणे, उत्तरे तपासून घेणे, 'बाबा वाक्‍यम्‌ प्रमाणम' वा 'येन गतः स पन्था:' यांसारख्या मेंदूच्या लगामांपासून लांबच राहणे यात विज्ञाननिष्ठा असते हे या पिढीला शिकवावे लागेल. ज्याला राहू-केतू ग्रहणात गिळतो तोही चंद्रच असतो आणि आपले चांद्रयान जेथे उतरले तोही चंद्रच असतो. त्यातला आपला नेमका कोणता चंद्र आहे, हे या पिढीलाच नव्हे, तर सर्वांनाच सांगावे लागेल. तो ज्ञानयोग सोमवार, ता. 22 जुलै, दुपारी 2.43 च्या 'मुहूर्ता'पासून सुरू झाला, तर त्यापरते या मोहिमेचे यश कोणते असेल?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Editorial on Mission Chandrayaan 2 and ISRO