अग्रलेख : मोर्चा चालला कुणीकडे?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

एका अर्थाने त्यांचा हा मोर्चा स्वत: सहभागी असलेल्या सरकारचा निष्काळजीपणा दाखवण्यासाठी असला, तरी गेली पाच वर्षे सत्तेत राहूनही विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या या मोर्चाच्या निमित्ताने ते प्रथमच जातीनिशी रस्त्यावर उतरणार आहेत!​

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका अडीच-तीन महिन्यांवर आलेल्या असताना खऱ्या अर्थाने प्रचाराचे रणशिंग फुंकले आहे ते शिवसेनेने! भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेची फळे चाखत असतानाही शेतकऱ्यांचे खरे वाली आपणच आहोत, हे दाखवून देण्यासाठी 'प्रधानमंत्री पीकविमा योजने'ची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही, हे दाखवून देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आक्रमक झाले आहेत.

मात्र, त्याचवेळी भाजप आणि विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या आक्रमक पवित्र्यामुळे अस्वस्थ होणार नाहीत, याची काळजी घेत उद्धव यांनी मोठ्या धूर्तपणे विमा योजनेच्या अंमलबजावणीतील दिरंगाईचा ठपका संबंधित विमा कंपन्यांवर ठेवला आहे. त्यामुळेच या विमा कंपन्यांना जरब बसवण्यासाठी येत्या बुधवारी 'मातोश्री' निवासस्थानापासून हाकेच्या अंतरावरील खासगी विमा कंपनीच्या कार्यालयावर ते शिवसैनिकांसह चाल करून जाणार आहेत. एका अर्थाने त्यांचा हा मोर्चा स्वत: सहभागी असलेल्या सरकारचा निष्काळजीपणा दाखवण्यासाठी असला, तरी गेली पाच वर्षे सत्तेत राहूनही विरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेच्या या मोर्चाच्या निमित्ताने ते प्रथमच जातीनिशी रस्त्यावर उतरणार आहेत!

त्याचवेळी चिरंजीव आदित्य ठाकरे यांचे राज्यभरात 'सॉफ्ट लॉंचिंग' करण्याचेही त्यांनी ठरवले असून, आता आदित्य यांची राज्यभरातील 'आशीर्वाद यात्रा' लवकरच सुरू होत आहे. शिवसेनेने घेतलेल्या या निर्णयांना गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घट्ट असे शिवबंधन बांधून घेणारे भाजप अध्यक्ष अमित शहा व फडणवीस यांना आक्षेपही घेता येणार नाही, अशीही चोख व्यवस्था करतानाच, 'आपणच शेतकऱ्यांचे कैवारी आहोत!' असे डिंडीम पिटणाऱ्या काँग्रेस व 'राष्ट्रवादीला'ही त्यांनी या निर्णयामुळे चारीमुंड्या चीत केले आहे आणि राज्यातील विरोधी अवकाश आपणच व्यापल्याचे दाखवून दिले आहे. 

मात्र, हा एक मोर्चा आणि एक यात्रा, यामागील उद्धव यांचे इरादे प्रथमदर्शनी दिसतात तेवढे साफ बिलकूलच नसणार! विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून शिवसेना आणि भाजप यांच्यात कितीही खडाजंगी झाली, तरी ती नुसतीच खडाखडी असणार आणि जागावाटप पार पडणार, ते या 'नुरा कुस्ती'चा देखावा उभा करूनच, हे आता जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे राज्यात भाजपपेक्षा किमान एक जागा तरी अधिक निवडून आणण्यासाठीच हा आटापिटा सुरू आहे. एकदा का शिवसेनेचे आमदार भाजपपेक्षा अधिक संख्येने निवडून आले, की मुख्यमंत्रिपदावर ते दावा करू शकतात. त्यामुळेच आता त्यांना परत एकदा राज्यातील रयतेचे प्रेम आले आहे.

अलीकडेच उद्धव यांनी कृषितज्ज्ञ पत्रकार पी. साईनाथ यांना पाचारण करून, त्यांच्याकडून या समस्यांवर काय तोडगा काढता येईल, ते समजावून घेतले होते. त्यानंतरच त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांवर सर्वंकष 'किसान कल्याण आयोग' नेमण्याची मागणी केली आहे. उद्धव यांचा हा आक्रमक पवित्रा आणि थेट रस्त्यावर उतरून मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय कॉंग्रेसला भलताच झोंबलेला दिसतो आणि त्यामुळेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी त्यांच्या या निर्णयाची संभावना 'स्टंट' अशी केली आहे.

राज्यातील सरकार शेतकऱ्यांना न्याय देण्यात अयशस्वी ठरले आहे आणि त्यामुळेच निवडणुकीच्या तोंडावर उद्धव हा मोर्चा काढत आहेत, असा चव्हाण यांचा निष्कर्ष आहे. त्यामुळेच सरकार अपयशी ठरले असताना राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेली कॉंग्रेस गेली पाच वर्षे काय करत होती, असा प्रश्‍न उपस्थित होतो. काँग्रेसने ना कधी या विषयावरून आक्रमक पवित्रा घेतला, ना कधी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. ते करू नये म्हणून अशोक चव्हाण वा त्यांचे अन्य सहकारी यांचे हात कोणी बांधून ठेवले होते काय? राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी मात्र लोकसभा निवडणुकीचा गदारोळ संपताच दुष्काळी भागांचे दौरे करून आपद्‌ग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि उपाययोजनांसंबंधात मुख्यमंत्र्यांशी चर्चाही केली. त्यामुळे लोकसभा प्रचारात बासनात बांधून ठेवलेला आपलाच विरोधकांचा 'पेहराव' शिवसेना पुन्हा परिधान करत असल्याचे बघून कॉंग्रेस अस्वस्थ होणे, साहजिकच आहे. 

आदित्य यांच्या महाराष्ट्रभरातील 'आशीर्वाद यात्रे'मागे 'वायएसआर' काँग्रेसचे नेते जगनमोहन रेड्डी यांच्या यात्रेतून मिळालेली प्रेरणा असू शकते. मात्र, त्यामागील मुख्य उद्देश हा आपले आमदार जास्त संख्येने निवडून आले, तर त्यांनाच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसवता यावे, यासाठी आवश्‍यक ती पार्श्‍वभूमी निर्माण करण्याशिवाय अन्य कोणताही असू शकत नाही. अर्थात, हे उद्दिष्ट सफळ संपूर्ण होण्यासाठी भले निवडणुकीत युतीचा देखावा कायम असला, तरी एकमेकांच्या उमेदवारांच्या पाडापाडीचा खेळ होऊ शकतो. 2004 मधील निवडणुकीत शिवसेना-भाजपने हाच खेळ केला आणि परिणामी सत्ता 'काँग्रेस-राष्ट्रवादी' आघाडीच्या हातात कायम राहिली, याचे भान दोन्ही पक्षांना असणारच.

एकंदरीत, शिवसेनेने रणशिंग तर फुंकले आहे आणि काँग्रेस भ्रांतचित्त आहे. त्यामुळे आता भाजप आणि राष्ट्रवादी त्याला कसे उत्तर देतात, ते बघणे कुतूहलाचे असेल!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Editorial on The Shivsena parties strategy for Vidhansabha Election