संपादकीय : वेदनामुक्तीचा अथक शोध

लोकांचे वय वाढू लागते आणि वेगवेगळे आजार घरोबा करू लागतात.
डॉ. अभिनंदन रावसाहेब पाटील
डॉ. अभिनंदन रावसाहेब पाटीलSakal

लोकांचे वय वाढू लागते आणि वेगवेगळे आजार घरोबा करू लागतात. आणि मग सुरू होतो...वेदनांसह जगण्याचा प्रवास. हे खरे असले तरी आपल्या ओळखीच्या लोकांमध्ये कर्करोग, पार्किन्सन आणि इतर आजार बळावत आहेत हे पाहून एक तरुण मात्र अस्वस्थ होत होता आणि विचार करत होता, हे टाळण्यासाठी काय करता येईल. दुर्धर आजारांवर औषधे नाहीत...मग हे आजार होऊच नयेत म्हणून काही करता येईल का, या विचारांनी त्याने झपाटल्यासारखे काम सुरू केले. त्यांनी असे दोन जीवाणू शोधून काढले जे कर्करोग टाळण्यासाठी आणि झाला तरी बरा करण्यासाठी साह्यभूत ठरले. (Sakal Editorial Article)

औषधनिर्माण शास्त्रातील ज्ञानाचा पुरेपूर वापर समाजासाठी करण्याचा विडा त्यांनी उचलला. डॉ. अभिनंदन रावसाहेब पाटील असे त्यांचे नाव. नुकतेच त्यांनी औषधनिर्माण शास्त्रात सलग तिसरे सुवर्णपदक पटकावून विक्रम केला आहे. त्यांच्या या विक्रमाची नोंद इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डसमध्ये झाली. तर महाराष्ट्राचा स्टार्टअप हिरो या पुरस्कारानेही गौरवण्यात आले. त्यांनी गेली काही वर्षे अखंड केलेल्या संशोधनाची ही पोहोचपावतीच. स्वभावाने अत्यंत मृदू डॉ. अभिनंदन सतत संशोधनात मग्न असतात. शालेय शिक्षण घेतानाच आएएस किंवा शास्त्रज्ञ व्हायचे त्यांनी मनाशी ठरवले होते.

महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास प्रारंभ झाला आणि ते संशोधनात रमू लागले. दुर्धर आजार झालेल्यांना वेदनांपासून मुक्ती देण्यासाठी आपण प्रयत्न करावेत आणि त्यातून समाधान मिळवावे या सूत्रावर त्यांची वाटचाल सुरू झाली. ‘आयर्विन ख्रिश्‍चन’मधून शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठातून औषधनिर्माण शास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर डॉ. डी. वाय पाटील विद्यापीठातून सुवर्णपदकासह पीएच.डी. पूर्ण केली. त्यानंतर मात्र अध्यापन करत कर्करोगावरील संशोधनाला त्यांनी वाहून घेतले. संजय घोडावत विद्यापीठात औषधनिर्माणशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करताना त्यांचे संशोधन अखंड सुरूच आहे. त्यांचे २९ शोधनिबंध राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झाले आहेत. या शिवाय त्यांनी दहा भारतीय आणि आठ परदेशी पेटंट आपल्या नावावर केलेली आहेत. त्यांचे प्रत्येक पेटंट हे सर्वसामान्यांसाठी उपयोग पडणारे असेच आहे.

कर्करोगावरील संशोधन करतानाच त्यांची इतरही शोधयात्रा सुरूच आहे. पारंपरिक संशोधन करतानाच कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापरही ते करत आहेत. सध्या लहान मुलांना होणाऱ्या गुळण्या रोखण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. त्यासाठी त्यांनी विशेष यंत्र बनविलेले आहे. दोन महिन्याच्या बाळापासून ते दीड वर्षांच्या बालकापर्यंत त्याचा अगदी सहज उपयोग करता येऊ शकणार आहे. त्यासाठीचे पेटंट त्यांनी ऑस्ट्रेलियातून मिळविलेले असून येत्या काही दिवसांत हे मशिन बाजारामध्ये सर्वसामान्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. २०१३ मध्ये भारतातील आदर्श विद्यार्थी पुरस्कार आयपीए आणि भारत सरकारकडून मिळाला. डॉ. अभिनंदन संशोधनाशिवाय ऐतिहासिक स्थळांच्या ठिकाणी रमतात. या सर्व धबडग्यातून निसर्गासोबत राहण्यासाठी ते वेळ काढतात आणि मैदानावर घामही गाळतात. समाजासाठी आपण काहीतरी देणे लागतो, या ध्येयाने सतत कार्यमग्न डॉ. अभिनंदन यांचे संशोधन यापुढील काळात उपयुक्त ठरणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com