संपादकीय : कल भावी तंत्रज्ञानाचा

पुढील साधारणपणे दोन दशकांत कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान आपल्या उत्पादन,अर्थव्यवहार आदी क्षेत्रांत प्रभाव गाजवेल.
Technology
Technologysakal

पुढील साधारणपणे दोन दशकांत कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान आपल्या उत्पादन,अर्थव्यवहार आदी क्षेत्रांत प्रभाव गाजवेल. कंप्युटिंग, आयओटी, बिग डेटा आदींशी संबंधित आव्हाने आपल्याला खुणावत आहेत. त्यांना प्रतिसाद देण्याची तयारी करायला हवी.

साधारणपणे अठराव्या शतकापासून, म्हणजे पहिल्या औद्योगिक क्रांतीपासून कारखान्यांतून होणाऱ्या उत्पादनाचा वेग वाढवण्यासाठी, नवनवे बदल करण्यासाठी, तसेच खर्च कमी करण्यासाठी खरे तर ‘ऑटोमेशन’ला सुरुवात झाली. संगणक नियंत्रित यंत्रापासून आता आपण ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’च्या (आर्टिफिशल इंटलिजन्स) युगात प्रवेश केला आहे. आता जवळपास प्रत्येक क्षेत्रात याचा वापर होत आहे आणि नजीकच्या काळात त्याचा आवाका अधिक विस्तारणार आहे, हे नक्की. कॉम्प्युटर हार्डवेअर, प्रोसेसिंग चिप्स, सेन्सर, चार- जी, पाच- जी आदी संदर्भात झालेल्या क्रांतीमुळे कामाचे स्वरूप झपाट्याने बदलत आहे. पुढील २० ते २५ वर्षे या बदलाची साक्षीदार असतील यात शंका नाही. त्या संदर्भातील महत्त्वाच्या बदलांचा थोडक्यात येथे घेत आहे.

आज कृत्रिम बुद्धिमत्तेचा संरक्षण,औषध निर्माण, वैद्यकीय सल्ला व निदान, वाहने, अशा एक-ना-अनेक क्षेत्रातील वाढता उपयोग पाहता, त्याने दिलेली उत्तरे, सुचवलेले उपाय, त्यामागील कारणे, आदी वापरकर्त्याला कळणे किंवा समजणे फार गरजेचे आहे. साधारणपणे मशिन लर्निंग अल्गोरिदम्स, जसे आर्टिफिशिअल न्यूरल नेटवर्क्स, डीप लर्निंग आदींमधे वापरकर्त्याला अल्गोरिथमने घेतलेल्या निर्णयांची कल्पना दिली जात नाही. परंतु, वर नमूद केलेल्या जीवन-मरणाशी निगडित क्षेत्रांतील वाढता वापर पाहता, निर्णयांमागची कारणमीमांसा कायद्याने बांधिल असणे आवश्यक आहे.

याला ‘एक्सप्लेनेबल आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ असे संबोधतात. कारणमीमांसेबरोबरच उत्तराची अचूकता सांगणे अपेक्षित आहे. अमेरिकेच्या ‘डार्पा’ या सरंक्षणसंबंधी संस्थेने यामधे जोमाने काम सुरु केले आहे. अजूनही प्राथमिक स्वरूपात असलेल्या या क्षेत्रात पुढील दोन ते तीन दशकांत मोठी प्रगती होणे अपेक्षित आहे. त्यातून प्रशासकीय निरीक्षणाखाली कृत्रिम बुद्धिमत्तेच्या निर्णय प्रक्रियेवर वचक राहील, त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांचा विश्वास वाढीस लागून दैनंदिन जीवनात वापर वाढू लागेल.

इंटरनेट ऑफ थिंग्स, म्हणजेच ‘आयओटी’ हा कृत्रिम बुद्धिमत्तेचा एक महत्त्वाचा उपयोग ठरत आहे. ज्यामधे विविध सेन्सर एकमेकांशी एका क्लाऊड प्लॅटफार्मवर जोडले जातात. त्या सेन्सरकडून सतत माहिती गोळा केली जात असते. त्याचे ‘इंटेलिजन्ट अल्गोरिथम्स’च्या साहाय्याने विश्लेषण करून पुढील योग्य सुधारणा, बदल तसेच उपाय केले जातात. उदाहरणार्थ, घरातील एसी, मनगटावरील घड्याळे, फ्रीझ, आदी उपकरणांमधील सेन्सर सतत ‘क्लाऊड प्लॅटफार्म’वर माहिती पाठवत राहतात. त्याचे विश्लेषण तेथील अल्गोरिथम्स करतात. त्यावरून संभाव्य बिघाडाचा अंदाज बांधला जातो व वापरकर्त्याला सूचित केले जाते. त्याचबरोबर उपकरणे बनवणाऱ्या कंपनीलासुद्धा बिघाडाबद्दल सूचित केले जाते. कंपनीच्या उत्पादनविभागातील उपकरणे त्याकरीता लागणारे आवश्यक बदल करतात व संपूर्ण प्रक्रियेत बदल घडवून सुधारणा केली जाते. हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.

जसजशी ‘आयओटी’ उपकरणे वाढत जातील तसतशी ही प्रक्रिया अधिक सोपी करण्याकडे कल वाढत जाणार आहे. प्रत्येक उपकरणाच्या अगदी छोट्यातछोट्या म्हणजे अगदी नट-बोल्ट डिझाईन करणे, बनवणे आदींच्या प्रक्रियेत सुद्धा ग्राहकांच्या सोयीनुसार त्वरित बदल होत राहतील. ‘बिझनेस इंटेलिजन्स इन्साईडर’च्या अहवालानुसार गत वर्षापर्यंत साधारणपणे तीन अब्ज आयओटी उपकरणे जगभरात वापरात आली, ज्यांची किंमत १७ हजार ५०० अब्ज रुपयांच्या आसपास आहे. पुढील कित्येक दशके ‘आयओटी’च्या प्रभावाखाली प्रगतिशील राहतील हे नक्की. या ‘आयओटी’च्या विस्तारामुळे खरेतर एक नवीन समस्या उभी राहत आहे. ती म्हणजे, आयओटी उपकरणांची क्लाऊडबरोबर सतत होणारी माहितीची देवाणघेवाण, तसेच क्लाऊडवर सतत होणारे विश्लेषण, यामुळे यंत्रणेवरचा ताण वाढतो आहे. ज्या वेगाने आयओटी उपकरणांची संख्या वाढत आहे, त्यादृष्टीने यंत्रणेवरचा ताण प्रचंड प्रमाणात वाढत आहे.

या समस्येवर तोडगा म्हणजे ‘एज कंप्युटिंग’ या संकल्पनेत, क्लाऊडपेक्षा कमी कॉम्प्युटिंगची क्षमता असलेले कॉम्प्युटर ठराविक क्षेत्रातील काही आयओटी उपकरणांच्या माहितीचे स्थानिक पातळीवर विश्लेषण करून मोजकी, गरजेपुरती व महत्त्वाची माहितीच ‘क्लाऊड’ कडे पाठवतात. पुढील कित्येक वर्षे ‘एज कंप्युटिंग’मधे आवश्यक बदल केले जातील. अर्थात यामधे संशोधनास प्रचंड वाव आहे. आज मोबाईल फोन्स, कॉम्प्युटर्स, इंटरनेट, आदींच्या माध्यमातून देवाणघेवाणीचा वेग दिवसागणिक वाढतो आहे. आजमितीला जगात ६०० कोटींहून अधिक स्मार्ट फोन्स वापरात आहेत. प्रत्येक फोन महिन्याकाठी साधारणपणे ४० एक्साबाईट इतकी प्रचंड माहिती तयार करतो. ही माहिती इ-मेल्स, एसएमएस, फोटोज, व्हिडिओज, ऑडिओ, फोन कॉल्स, आदींच्या माध्यमातून तयार होत असते.

एका मिनिटाला स्नॅपचॅट या ऍपद्वारे २० लाखांहून अधिक फोटो शेअर केले जातात, ४० लाखांहून अधिकवेळा गूगलवर सर्च केले जाते, १० लाखांहून अधिक लोक फेसबुकवर काही ना काही शेअर करतात, ५० लाखांहून अधिक युट्युब विडिओ बघितले जातात, १९ कोटींपेक्षा अधिक इ-मेल्स पाठवले जातात. ही वेगाने येणारी माहिती साठवणे, लागलीच त्याची खातरजमा करणे, त्याचे वर्गीकरण करणे, त्यातील योग्य व महत्वाची माहिती शोधणे, हे एक आव्हान ठरत आहे. अशा अत्यंत वेगाने तयार होणाऱ्या भरमसाठ, तसेच वैविध्यपूर्ण माहितीला बिग डेटा असे संबोधले जाते. उदाहरणार्थ, आरोग्यसेवेशी निगडित माहिती. रुग्णांच्या मुलाखती, लिहून दिलेल्या औषधाच्या चिठ्ठ्या, विविध चाचण्यांचे अहवाल, क्ष किरण, रुग्णाचे वय, इतिहास, अशा एक ना अनेक गोष्टी असतात. अशी माहिती साधारणपणे प्रत्येक दिवशी सात एक्साबाईट तयार होत आहे. हे प्रमाण वाढते आहे.

पूरक आणि प्रभावी तंत्रे

मुख्य म्हणजे या माहितीचे विविध प्रकार पाहता एका चाळणीतून ही सर्व माहिती तपासणे शक्य नाही. बिग डेटावर झालेले संशोधन अजूनही प्राथमिक स्वरूपाचे आहे. थोडक्यात सांगायचे तर, पुढील साधारणपणे २० ते २५ वर्षे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, एज कंप्युटिंग, आयओटी, बिग डेटा आदींशी संबंधित आव्हानांनी व्यापलेले आणि मोठी भरारी घेणारी असणार आहेत. मुख्य म्हणजे ही सर्व तंत्रज्ञाने एकमेकांना पूरक आहेत व प्रभावी होत आहेत. या नव्या तंत्रज्ञानांच्या वापरामुळे दैनंदिन जीवनात अधिक सुलभता तर येईलच, पण विश्वासार्हता वाढून रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध होणार आहेत. आपला तरुण देश माहिती तंत्रज्ञानात आघाडीवर आहे, पण आता त्याचे फायदे सर्वसामान्य माणसापर्यंत पोचवण्याचा काळ आपल्या दारात उभा आहे. त्याकडे पाठ न फिरवता, पुढील दशकातील संधींचे सोने आपण करू शकतो.

यासाठी देशातील विद्यापीठांनी विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. विविध उपक्रमांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांकडून कित्येक प्रकारचे प्रकल्प राबवून घेऊन कमीतकमी वेळेत मोठी झेप घेणे सहज शक्य आहे. त्यासाठी विविध देशांतील विद्यापीठांसोबत करार करणे, अगदी शाळकरी मुलांना सामावून घेणे सुद्धा गरजेचे आहे. कारण शाळा, विद्यापीठे आणि विविध उद्योग यांची सांगड घालून सिंगापूर, जपान सारखे कित्येक छोटे छोटे देश संशोधन व उद्यमशीलतेत जगात अग्रेसर बनलेले आहेत. आपण या स्पर्धेत मागे न राहता या भावी तंत्रज्ञानांचा उपयोग राष्ट्र उभारणीत करण्यात व आपले राहणीमान उंचावण्यात करू शकतो.

(लेखक ‘एमआयटी वर्ल्डपिस युनिव्हर्सिटी’ येथे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’चे प्राध्यापक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com