काही ‘काँक्रिट’ उपाय | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Real estate

काही ‘काँक्रिट’ उपाय

आपल्या देशात बांधकाम क्षेत्राची व्याप्ती महाप्रचंड आहे. गृहबांधणी उद्योग (रिअल इस्टेट) आणि पायाभूत सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर) हे या क्षेत्राचे उपविभाग आहेत. दोन्हीही क्षेत्रात लागणाऱ्या बांधकाम साहित्यांचा विचार केला असता सिमेंट आणि स्टील हे प्रमुख बांधकाम साहित्य मानले जाते. यापैकी स्टील हे पर्यावरणपूरक आहे. नवीन स्टील अथवा लोखंड बनवताना जुन्या भंगार स्टीलचा संपूर्णपणे उपयोग करता येतो.

सिमेंटची निवड करताना मात्र आपल्याला दोन प्रमुख पर्याय उपलब्ध आहेत. यापैकी कार्बन उत्सर्जन कमी करणाऱ्या पोर्टलॅन्ड पोझोलना सिमेंटला आपण प्राधान्य दिले पाहिजे. काही ठिकाणी मात्र ऑर्डिनरी पोर्टलॅन्ड सिमेंट वापरणे योग्य असते. याबाबतचा सल्ला स्थापत्य आरोखकाकडून घेणे उचित ठरते. नवनवीन क्षेत्रांमध्ये विकासकामे करताना पर्यावरणाकडे दुर्लक्ष करून आपल्याला चालणार नाही. देशात विद्युत निर्मिती करताना होणाऱ्या कोळशामुळे प्रचंड प्रमाणात फ्लायअॅश निर्माण होत असते.

तिचे उपयुक्त गुणधर्म लक्षात घेऊन देशातील सिमेंट उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी त्याचा वापर करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. फ्लायअॅशचा समावेश असणाऱ्या पोर्टलॅन्ड पोझोलना सिमेंटची निर्मिती करून पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्वाचे कार्य केले जात आहे. देशात वर्षाकाठी अंदाजे ५५ कोटी टन सिमेंटनिर्मिती होत असते. त्यापैकी जवळपास ८० टक्के सिमेंट हे पोर्टलॅन्ड पोझोलना सिमेंट आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र यांच्या सीमावर्ती भागातील सिमेंटचे प्रकल्प पोझोलना सिमेंटची निर्मिती करत आहेत.

पोझोलनाचा पूर्वेतिहास मोठा मनोरंजक असाच आहे. पोझोलनामध्ये सिलिका आणि ॲल्युमिना हे प्रमुख घटक असतात. ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख, चुनामिश्रित माती, फ्लायअॅश, मायक्रोसिलिका हे सर्व घटक या प्रकारात येतात. काचेसारखे चकाकणारे असे घटक ज्या वेळी चुना आणि पाणी यांच्या संपर्कात येतात, तेव्हा त्यामध्ये सिमेंटशी साधर्म्य असणारे गुणधर्म आढळतात. पूर्वीच्या काळात ज्वालामुखीतून बाहेर पडणारी राख बांधकामात वापरली जात असे.

इटली देशातील पोझुली शहरात सर्वप्रथम सापडल्यामुळे तिला ‘पोझोलना’ हे नाव पडले. प्राचीन रोमन अथवा ग्रीक काळातील चर्च, मंदिरे, स्टेडियम आणि इतर वास्तूंसाठी या राखेचा उपयोग करण्यात आला. बांधकाम साहित्यातील ताकद आणि टिकाऊपणा यामुळे त्या काळातील वास्तू आजही आपल्या अस्तित्वाची साक्ष देत उभ्या असलेल्या आढळतात. त्या काळातील कॉंक्रिट वेगळ्या प्रकारे होत असे. कॉंक्रिटमध्ये विटांचे तुकडे, मार्बल, ग्रानाइट, चुना, प्राण्यांची चरबी, पाणी इत्यादींचा वापर केला जात असे. आजच्या काळात कॉंक्रिटमध्ये फ्लायअॅश, मायक्रोसिलिका यांचा वापर पोझोलना म्हणून होत आहे. देशातील भाक्रा नांगल, कृष्णार्जुनसागर, कोयना अशी धरणे बांधताना ‘सुरखी’ या चुनामिश्रीत मातीचा वापर करण्यात आला आहे. अलीकडच्या काळात झालेल्या नर्मदा सरोवर धरणाच्या बांधणीसाठी पोर्टलॅन्ड पोझोलना सिमेंटचा वापर करण्यात आला आहे.

बांधकामाच्या प्रत्येक ठिकाणी ऑर्डिनरी पोर्टलॅन्ड सिमेंटसाठी पोर्टलॅन्ड पोझोलना सिमेंट हा उत्तम पर्याय आहे. काँक्रिटमध्ये पोझोलना सिमेंट वापरले असता कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी होते. त्याच प्रमाणे उष्णतेचे उत्सर्जन कमी प्रमाणात होते. कॉंक्रिट बनवण्यासाठी पाणी कमी प्रमाणात लागून पाण्याची बचत होते. कॉंक्रिटमधील अंतर्गत पाणी झिरपण्याचे प्रमाण घटते. पृष्ठभागावरील तडे पडण्याचे प्रमाण नियंत्रित होते. कॉंक्रिटमधील अंतर्गत घटक एकत्रित राहून त्याचा वापर सुलभतेने करता येतो. पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी पोझोलना सिमेंटचा जास्तीत जास्त वापर होणे ही काळाची गरज आहे.

(लेखक स्थापत्य सल्लागार आहेत.)

Web Title: Sakal Special Marathi Editorial Article On Real Estate

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :SakalEditorial Article