धरणामुळे वाहू लागले विकासाचे पाट

भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात प्राचीन काळातील देवस्थाने व धार्मिक ठिकाणे भरपूर आहेत.
Gosekhurd Dam
Gosekhurd DamSakal

बदलती गावे

पवनी

भंडारा जिल्ह्यातील पवनी शहरात प्राचीन काळातील देवस्थाने व धार्मिक ठिकाणे भरपूर आहेत. वैनगंगेच्या काठावर पवनी वसलेले आहे. या तालुक्यातील शेतकऱ्यांना मान्सूनच्या लहरीवर शेती करावी लागे. आता गोसेखुर्द धरणाचे काम पूर्ण झाल्यापासून या भागातील शेतकरी वर्षातून दोन-तीन पिके घेतात. दूधदुभत्यातही वाढ झाली आहे. ऐतिहासिक मंदिरांसह राष्ट्रीय प्रकल्प आणि पवनी-उमरेड-करांडला या अभयारण्यामुळे पवनी तालुक्यात वर्षभर पर्यटकांची ये-जा असते. त्यामुळे तालुक्यात रोजगार व उत्पादनात वाढ होत आहे.

पवनी, पूर्व विदर्भातील प्राचीन शहर. येथे सम्राट अशोककालीन बौद्ध स्तूप उत्खननात आढळले आहेत. त्यावरून हे शहर पुर्वी मध्य भारतातील व्यापारीदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण होते, असा अंदाज आहे. वैनगंगेच्या पात्रातील मासोळ्यांसोबतच नदीपात्रातील टरबूज, खरबुजांच्या वाड्यांतील माल नागपूरला विक्रीसाठी जायचा. मात्र, शेतात खरीप हंगामातील पिकाशिवाय इतर पीक घेता येत नव्हते. त्यामुळे शेतकरी वर्षातून अर्धवेळ रिकामेच राहत. तालुक्याच्या काही भागात मिरचीचे पीक व्हायचे. परंतु, सिंचन सुविधेअभावी वैयक्तिक विहिरी व बोड्यांच्या आधारे मर्यादित क्षेत्रातच उत्पादन होत होते.

गोसेखुर्द येथे वैनगंगेवर धरणाचे भूमीपूजन तत्कालिन पंतप्रधान राजीव गांधी यांनी १९८८ मध्ये केले होते. २९ गावांतील शेतकऱ्यांची शेती धरणात गेली. या गावांचे पुनर्वसन, शेती व घरांचा मोबदल्याची प्रक्रिया अनेक वर्षे सुरू होती. धरणाचे काम सुरू असताना डाव्या व उजव्या कालव्यांतून शेतीला सिंचनासाठी पाणी देण्यासाठी कालवे व वितरण व्यवस्थेची कामे करण्यात आली. आता तीन वर्षांपासून गोसेखुर्द धरणाचे पाणी सिंचनासाठी दिले जाते. चौरास आणि जंगलव्याप्त सावरला भागातील शेतात आता वर्षाला दोन-तीन पिके घेतली जातात.

Gosekhurd Dam
प्रियांका वाचवतील राज्यातील काँग्रेस?

युवक शेतकरी लाभदायक बागायती व भाजीपाला उत्पादनावर भर देत आहेत. भिवापुरीतील मिरची पिकाच्या क्षेत्रात दोन वर्षांत वाढ झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना रोजगार वाढला आहे. तालुक्यात दोन ठिकाणी फुलशेती आणि मशरूम उत्पादन केंद्र सुरू झाले. शेतीसोबतच पशूपालन आणि त्यामुळे दूधदुभत्याचे उत्पादन वाढत आहे.

पवनी पूर्वीच्या काळात रेशमी कपडे, विड्यांची पाने आणि रानमेव्यासाठी प्रसिद्ध होते. ब्रिटिशांच्या काळात घरघर लागलेला, विणकरांचा व्यवसाय आता बंद आहे. पानांचे मळे मर रोगामुळे ओस पडले. विणकर समाजातील युवकांनी रोजीरोटीसाठी सुरतमधील कारखान्यांकडे धाव घेतली. त्यामुळे तालुक्यातील बरेच लोक परराज्यात व मोठ्या शहरात रोजगारासाठी गेले होते. मात्र गोसेखुर्द धरणानंतर विकासाचा प्रवाह गावाकडे वळला आहे. येथे दुग्धोत्पादनांवर भर वाढला आहे. जंगलाच्या भागात आदिवासी बांधवांचा शेळी-मेंढी पालनाचा व्यवसाय सुरू आहे. बचतगटातर्फे महिलांनीसुद्धा शेळी व कुक्कुटपालन सुरू केले आहे. धरणाने शेतकऱ्यांना दुहेरी फायदा होत आहे. ते समृद्धीकडे वाटचाल करत आहेत.

पवनी शहरातील मंदिर व धार्मिक ठिकाणांत वर्षातून विशिष्ट उत्सव व सणासाठी भाविक येत होते. आता पवनी-उमरेड-करांडला अभयारण्य, रुयाळ येथे महास्तूप, गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पाला पाण्यासाठी पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. वन्य प्राण्यांच्या सहवासात भ्रमंती करणाऱ्या निसर्गप्रेमींची संख्याही वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com