पर्यटन, ‘आयटी’त इंडोनेशियाची साद

सम्राट फडणीस  (samrat.phadnis@esakal.com)
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

पंचवीस कोटी लोकसंख्येचा इंडोनेशिया भारताचा प्रमुख सागरी शेजारी आणि व्यापारातील भागीदार आहे. या देशामध्ये भारतीयांना गुंतवणूक आणि व्यापाराच्या संधी विस्तारत आहेत.

भारतातील मेट्रो शहरे आणि इंडोनेशियातील जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ बाली यांच्यादरम्यान थेट विमानसेवा सुरू करण्याचा इंडोनेशिया सरकारचा प्रयत्न आहे. इंडोनेशियातील भारतीय पर्यटकांची संख्या दहा वर्षांत तब्बल सहा पटींनी वाढली आहे. यापैकी जवळपास पन्नास टक्के पर्यटक बाली बेटावर पर्यटनासाठी जातात. त्यामुळे, इंडोनेशिया थेट विमानसेवेसाठी प्रयत्नशील आहे. इंडोनेशियाचे मुंबईतील नूतन कौन्सुलेट जनरल ॲगस पी सप्तोनो यांनी ‘सकाळ’ला दिलेल्या विशेष मुलाखतीत ही माहिती दिली. इंडोनेशियातील माहिती तंत्रज्ञान उद्योगात भारतीय उद्योगांसाठी गुंतवणुकीच्या संधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भारत आणि इंडोनेशियातील व्यापाराला दोन हजार वर्षांचा इतिहास आहे. भौगोलिक व्याप्ती, सांस्कृतिक विविधता आणि वसाहतीची पार्श्वभूमी अशी समानता उभय देशांमध्ये आहे. स्वातंत्र्योत्तर काळात दोन्ही देशांची धोरणेही परस्परपूरक राहिली आहेत. उभय देशांमधील व्यापार १८.७४ अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर कौन्सुलेट जनरल सप्तोनो यांनी मुलाखतीत भारतीय पर्यटन, उद्योग- व्यापाराला संधीच्या दृष्टीने भाष्य केले.

पर्यटन
पर्यटनवाढीसाठी इंडोनेशिया सरकार जोरदार ब्रॅंडिंग करत आहे. ॲट्रॅक्‍शन, ॲक्‍सेसिबिलिटी आणि ॲमेनिटीज या त्रिसूत्रीवर इंडोनेशियात नव्या पर्यटनस्थळांचा विकास करण्यात येत आहे. भारतीय पर्यटकांची संख्या सातत्याने वाढते आहे. त्यांच्या सोयीसाठी मुंबई, दिल्ली, कोलकता, चेन्नई आणि बंगळूर या मेट्रो शहरांमधून बाली बेटांसाठी थेट विमानसेवा सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

भारतीय सिनेमा
इंडोनेशियात भारतीय सिनेमाला मोठा प्रेक्षकवर्ग आहे. या क्षेत्राचे इंडोनेशियाशी आणखी दृढ नाते निर्माण व्हावे, या उद्देशाने सरकार विशेष प्रयत्न करत आहे. इंडोनेशियातील निसर्गाने नटलेली लोकेशन्स भारतीय चित्रपट निर्मात्यांसाठी खुली करीत आहोत. आमच्या कौन्सुलेटमार्फत इंडोनेशियातील विविध विभागांचा आणि भारतीय चित्रपट उद्योगाचा समन्वय घालून दिला जाईल.

उद्योग-व्यापार
व्यापक आर्थिक सहकार्य करार (कॉम्प्रेहेन्सिव्ह इकॉनॉमिक कोऑपरेशन ॲग्रिमेंट - सीईसीए) अजून पूर्णपणे अमलात यायचा आहे. ऑगस्ट आणि ऑक्‍टोबर २०११ मध्ये चर्चेच्या दोन फेऱ्या झाल्या. आतापर्यंत कर कपातीवर आणि विविध उत्पादनांवरील व्यापारबंदी उठविण्यावर चर्चा झाली. उभय देश लवकरच चर्चेचे प्रयत्न आणखी पुढे नेतील आणि व्यापार-गुंतवणुकीला चालना देतील.

ई-मार्केट
इंडोनेशियाचा आयसीटी (इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्‍नॉलॉजी) उद्योग आजघडीला दक्षिण-पूर्व आशियातील सर्वोच्च आहे. येत्या पाच वर्षांत १३० अब्ज डॉलरचे उद्दिष्ट आहे. ई-कॉमर्स आणि ई-बिझनेसमध्ये इंडोनेशियात वाढ दिसते आहे. गेल्या तीन वर्षांत अधिकाधिक गुंतवणूकदार ई-कॉमर्समध्ये उतरत आहेत. इंडोनेशियातील ई-मार्केट १३० अब्ज डॉलरचे आहे. आमच्याकडील वाढता सोशल मीडिया युजरही ई-कॉमर्स उद्योगाला खुणावतो आहे.

स्थानिक ई-कॉमर्स
शॉपी, लझाडा, बुकालपाक आणि टोकोपीडिया हे इंडोनेशियातील सर्वाधिक लोकप्रिय ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आहेत. फॅशनमध्ये बेरीबेन्का, हिजप महत्त्वाचे प्लेअर्स आहेत. बेरीबेन्का स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेतील हजारांवर ब्रॅंडसाठी ऑनलाइन स्टोअर आहे. हिजप प्रामुख्याने इस्लामिक फॅशनमध्ये आहे. ट्रॅव्हलोका आणि टिकेट हे पर्यटन क्षेत्रातील इंडोनेशियातील लोकप्रिय स्टार्टअप आहेत.

स्टार्टअप उद्योग
ई-कॉमर्सशिवाय फिनटेक, हेल्थटेक, एज्युटेक, क्‍लाऊड कॉम्प्युटिंग आदी उद्योगांमध्ये मोठी संधी आहे. देशामध्ये १३ कोटी इंटरनेट युजर आहेत. मोबाईल इंटरनेट युजरची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. आशियातील मोबाईल-फर्स्ट राष्ट्र म्हणून इंडोनेशिया आघाडीवर आहे. ही परिस्थिती ऑनलाईन रिटेल मार्केटमधील उद्योगाला अतिशय पूरक आहे. भारतीय स्टार्टअपनाही ही संधी आहे.

शिक्षण
व्होकेशनल (व्यवसायाभिमुख) शिक्षणावर इंडोनेशिया भर देते आहे. बारा वर्षे वयापर्यंत इलिमेंटरी स्कूल, त्यानंतरची तीन वर्षे ज्युनिअर हायस्कूल आणि नंतरची तीन वर्षे सिनिअर स्कूल अशी शालेय व्यवस्था आहे. भारतीय शिक्षण संस्थांना इंडोनेशियात संधी आहे, त्यासाठी आम्ही शैक्षणिक आदान-प्रदानावरही भर देतो आहोत.

(samrat.phadnis@esakal.com)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: samrat phadnis write Investment opportunities for Indian in Indonesia's industry