विशेष : माध्यमांच्या कार्यसंस्कृतीचे निर्माते | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nanasaheb Parulekar

टिकाऊ मूल्यांवर आधारित माध्यमांची आणि पत्रकारितेची कधी नव्हे इतकी आवश्यकता समाजाला आहे. नानासाहेबांनी दिलेली समाजहिताची दृष्टी ही आजच्या काळाची नितांत गरज आहे.

विशेष : माध्यमांच्या कार्यसंस्कृतीचे निर्माते

टिकाऊ मूल्यांवर आधारित माध्यमांची आणि पत्रकारितेची कधी नव्हे इतकी आवश्यकता समाजाला आहे. नानासाहेबांनी दिलेली समाजहिताची दृष्टी ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. ‘सकाळ’ची बांधिलकी ही या दृष्टीशी आणि समाजाच्या हिताशीच आहे. सकाळचे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. उर्फ नानासाहेब परुळेकर यांची आज (ता. २०) जयंती. त्यानिमित्त.

देशातील माध्यम व्यवस्था अभूतपूर्व बदलाला सामोरी जात आहे. माध्यमांच्या आशयनिर्मितीच्या पद्धती, वाचक-प्रेक्षकांच्या आशय ग्रहण करण्याच्या सवयी, आशयाचे समाजावर होणारे परिणाम आणि या साऱ्यांचे व्यवस्थापन या साऱ्यांमध्ये बदल सुरू आहेत. बदल हा निसर्गाचा स्थायीभाव असला, तरी कोणताही बदल सहजपणे घडून येत नसतो. उलथापालथी, वाद-विवाद, चर्चा, प्रयोग, त्यांचे यश-अपयश हेदेखील बदलांसोबत येणारे स्वाभाविक; पण तात्कालिक घटक असतात. अशा बदलाच्या काळात ‘सकाळ’चे संस्थापक-संपादक डॉ. ना. भि. उर्फ नानासाहेब परुळेकर यांचे स्मरण महत्त्वाचे ठरते. केवळ एखादे वर्तमानपत्र प्रसिद्ध करून ते चालविले, इतकेच काम त्यांनी केले असते, तरीही त्यांचे स्मरण आवश्यक राहिले असते; तथापि त्याहीपलिकडे जाऊन माध्यम म्हणून मूलभूत स्वरुपाचे विचार मांडणे, ते विचार प्रत्यक्षात आणणे, त्यासाठी आवश्यक ते बदल घडविणे, प्रत्येक टप्प्याचे लक्ष्य जनहित हेच ठेवणे, प्रसंगी जनहितासाठी संघटनात्मक कार्य करणे अशा बहुविध अंगांनी त्यांनी माध्यमाचा उपयोग केला. या कार्यपद्धतीची संस्कृती निर्माण केली. ती संस्कृती दीर्घकाल टिकून राहाण्यात त्यांचे द्रष्टेपण आहे. या द्रष्टेपणातून शिकण्यासारखे खूप काही आहे आणि हे शिक्षण आजच्या बदलांच्या काळात अत्यावश्यक आहे.

माध्यमांबद्दल, पत्रकारितेबद्दल संशयाचे ढग दाटून आल्याचा आजचा काळ आहे. भारताने स्वीकारलेल्या लोकशाहीच्या व्यवस्थेत माध्यमांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोकांनी, लोकांकडून, लोकांसाठी चालवलेले सरकार, अशी लोकशाहीची ढोबळ व्याख्या सरसकट केली गेली, तरी सरकारच्या कामाचे निःपक्ष, वाजवी आणि दूरदृष्टीने मूल्यमापन करणाऱ्या घटकांची लोकशाही व्यवस्थेत आबाळ आहे. सामाजिक संस्था, चळवळी, सामाजिक कार्यकर्ते अशा घटकांचे काम करतातच; तथापि त्यांना मर्यादा पडतात. या मर्यादा ओलांडण्याचे आणि लोकशाही व्यवस्थेच्या सर्व बाजू वारंवार तपासत राहून त्या समाजासमोर आणि सरकारसमोर मांडण्याचे काम माध्यमे, पत्रकारिता करत राहते. यादृष्टीने माध्यमे आणि पत्रकारिता लोकशाही व्यवस्थेचा महत्त्वाचा घटक आहेत. तथापि, याचा अर्थ सगळीकडेच सारेच आलबेल आहे, असा अजिबात नाही. त्यातील दोष दूर करत राहावेच लागणार आहेत; मात्र या घटकाची उपयुक्तता सार्थ आहे. ती टिकवून ठेवण्याची जबाबदारी माध्यम, पत्रकारिता यांच्याबरोबरीने समाजाचीही असणार आहे.

परुळेकरांना माध्यमांच्या सामर्थ्याची जाणीव होती. ती त्यांच्या लेखनात, व्याख्यानात डोकावत असे. सरकार या व्यवस्थेबद्दल ते चिंतन करीत. ते चिंतन जाहीरपणे मांडत. एके ठिकाणी ते म्हणतातः दर्या तरून जावयाला नावेला जसे शीड, तसे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अडचणीतून पार पडावयास देशातील अनेकांना त्यांचे सरकार आधारभूत पाहिजे. त्या शिडाला स्वार्थाची भोके असता कामा नयेत. उलट प्रसंग पडला, तर अंगावरच्या कापडाचे ठिगळ शिडासाठी देण्याची तयारी लोकांत हवी. सरकार हे आडूनपाडून व्यक्तीचा स्वार्थ साधण्याचे साधन नसून देशातील सर्व लोकांचे एकवटलेले बळ, त्यांची सामुदायिक इच्छाशक्ती, भावना, सुरक्षिततेचे साधन आणि वर्तमान-भविष्यात वाट काढणारी जनतेच्या हातातील काठी होय.

संघटनात्मक बांधणीचे महत्त्व

आपल्या नागरिकांची आणि विरोधकांचीही सरकारप्रती काय भावना हवी, याबद्दल ते म्हणतातः आपले सरकार बलिष्ठ आणि कार्यक्षम करण्यासाठी आपण आपल्या क्षेत्रात काय करू शकू, हा विचार ज्या देशातील नागरिकांपुढे सतत नसतो, त्यांचे जीवन पारतंत्र्य आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आपत्तीपरंपरेने भरलेले असते. त्यामुळे, देशाच्या राजसत्तेला धक्का लावणारे कोणतेही कृत्य नागरिकाने करू नये. आज सत्ता दुसऱ्या पक्षाच्या हातात आहे म्हणून विरोधकांची भूमिका करणाऱ्यांनी त्या सत्तेला धक्का लागू देण्याचे मनातही आणता कामा नये. लोकशाही राज्यकारभाारत सत्तेचा खांदेपालट साहजिक आणि अभिप्रेत असतो. इतकेच नव्हे, तर तसा तो होण्यात देशाचे अंतिम हित असते.

केवळ भाषणातून किंवा लेखनातून समाज तयार होत नाही; तर त्यासाठी संघटनात्मक बांधणीही करावी लागते, हा परुळेकरांचा दृष्टिकोन होता. त्यासाठी त्यांनी विविध संस्थांची उभारणी केली. ''सकाळ''च्या पुढाकाराने नागरी संघटना उभी केली आणि त्या संघटनेने निवडणुकाही लढविल्या. राजकारणातून काय अपेक्षा आहेत, याची मांडणी त्यांनी संघटनेच्या निमित्ताने सातत्याने केली. शिक्षण, रोजगाराद्वारे चांगला नागरिक घडवण्याचा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी वेळप्रसंगी राजकारणात उडी घेऊन बदल घडवण्याची त्यांची तयारी होती. संघटनेप्रमाणेच त्यांनी अगदी भाजीपाला, परसबाग, वक्तृत्व, भजन अशा विविधांगी गोष्टींमध्ये संघटनात्मक बांधणी केली. या साऱ्यांचा पाया माध्यम, पत्रकारिता होता. माध्यमाच्या निमित्ताने होणारा लोकसंपर्क, प्रभाव समाजाच्या भल्यासाठी वापरण्याची त्यांची प्रकृती होती.

किंमत आणि मूल्य

किंमत बदलत असते आणि मूल्य टिकाऊ असते, असे आपण म्हणतो. समाजाकडे बघण्याची परुळेकरांची एक दृष्टी होती. त्यासाठी पत्रकारितेचा मार्ग त्यांनी स्वीकारला होता. ही दृष्टी आणि मार्ग परूळेकरांचे मूल्य होते. ते आजही शाश्वत आहे. त्यामुळेच, ‘सकाळ’ केवळ लोकानुनय करणारे, सवंग लोकप्रियता मिळवणारे माध्यम कधी बनले नाही. प्रसंगी खेळकर, खोडकर आणि प्रसंगी समाजाच्या हितासाठी प्रवाहाच्या विरोधात जाऊन कठोर भूमिका घेण्याचे धाडस ''सकाळ''मध्ये आहे. या धाडसाला नव्वद वर्षांची परंपरा आहे. केवळ परंपरा आहे, म्हणून टिकवायची, अशी ‘सकाळ’ची कार्यपद्धती नाही; तर परंपरेतले उत्तम ते टिकवावे आणि काळाच्या कसोटीवर न टिकणारे सोडून द्यावे, ही कार्यपद्धती आहे. डॉ. परुळेकरांच्या पत्रकारितेची ही शिकवण आहे. त्याच शिकवणीच्या बळावर ‘सकाळ’ची वाटचाल आजच्या बदलांच्या काळातही लखलखीत सुरू आहे.

आजच्या तंत्रज्ञानावर आधारित माध्यमांच्या काळात आशयाचा भडिमार प्रत्येक क्षणी होत आहे. आशयाची संख्यात्मक वाढ झाली आहे; दर्जाबद्दलची नकारात्मकताही वाढते आहे. या आशयाचा समाजावर होणारा परिणाम व्यापक झाला आहे. प्रत्येक कृती-व्यवहाराकडे राजकीय पूर्वग्रहांतून पारखण्याचा प्रकार सुरू झाला आहे. या साऱ्यांचा परिणाम केवळ माध्यमांवरच नव्हे, तर समाजावरही खोलवर होऊ पाहतो आहे. अशा काळात टिकाऊ मूल्यांवर आधारित माध्यमांची आणि पत्रकारितेची कधी नव्हे इतकी आवश्यकता समाजाला आहे. परूळेकरांनी दिलेली समाजहिताची दृष्टी ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. ‘सकाळ’ची बांधिलकी ही या दृष्टीशी आणि समाजाच्या हिताशीच आहे.

Web Title: Samrat Phadnis Writes Nanasaheb Parulekar Birth Anniversary

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..