कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rajiv Gandhi

कार्यकर्त्यांना बळ देणारा नेता

राजीव गांधी तळागाळातील कार्यकर्त्याचीही दखल घेत. त्याच्या निरीक्षणांचा आदर करून सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेत. राजीव गांधी यांची आज (ता. २१मे) तिसावी पुण्यतिथी. त्यानिमित्ताने त्यांच्या आठवणींना दिलेला उजाळा.

दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांना आपल्यातून जाऊन तीन दशके होत आली, तरीही त्यांच्या आठवणी अजूनही मनात अगदी ताज्या आहेत. त्यांचे व्यक्तिमत्वच सगळ्यांना आपलेसे करणारे आणि प्रभाव टाकणारे होते. देशाला आधुनिकतेच्या वळणावर नेण्यात त्यांच्या नेतृत्वाचा वाटा मोठा होता. डिसेंबर १९८४मध्ये राजीव गांधी पुण्यात प्रचारासाठी आले होते. बॅ. गाडगीळ, शंकरराव पाटील आणि रामकृष्ण मोरे यांच्यासाठी त्यांची प्रचारसभा होती. त्यांची एवढी लोकप्रियता होती की, काँग्रेसने सभेसाठी पास छापले होते. त्यांना जवळून पाहता यावे, म्हणून मी महाविद्यालयीन युवक असताना पास मिळवून सभेला गेलो होतो. त्यावेळी शेवटच्या वर्षांत शिकत होतो. एवढी मोठी सभा त्यानंतर पुण्यात पाहिलेली नाही. त्यानंतरही अनेकदा ते पुण्यात येऊन गेले. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या शताब्दी समारंभाला राजीव गांधी १९८५मध्ये तसेच ७ जानेवारी १९८८रोजी सायन्स काँग्रेसच्या कार्यक्रमासाठी राजीव गांधी पुण्यात आले होते, तो कार्यक्रम संपवून ते काँग्रेस भवनमध्ये आले होते, त्यावेळी त्यांचे मी स्वागत केले. युवक काँग्रेसने सुरू केलेल्या पहिल्या रुग्णवाहिकेचे उद्घाटन त्यांनी केले. देशाचा पंतप्रधान रुग्णवाहिकेचे उद्घाटन करतो, याबाबत थोडे आश्चर्यच व्यक्त केले गेले होते. पण कार्यकर्ते आणि युवकांना प्रोत्साहन हे त्यांचे धोरण होते.

सर्वसामान्य कार्यकर्त्याची दखल

सामान्य कार्यकर्त्यांच्या पत्रांचीही राजीव गांधी दखल घेत. १९८६मध्ये त्यांनी राज्याच्या दुष्काळी भागाचा दौरा केला. पुणे जिल्ह्यातील शिरूर, केंदूर पाबळला ते आले होते. त्यांच्या दौऱयानंतर साधारणतः महिन्यानंतर त्या गावात गेलो. तेथील रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या लोकांशी बोलल्यावर त्यांना मिळणाऱ्या रोजगारात विसंगती आढळली. माझ्या लेटरपॅडवर पत्र लिहून पंतप्रधान कार्यालयाला पाठवले. त्यानंतर काही दिवसांनी उपजिल्हाधिकारी माझ्या घरी आले, तसेच पंतप्रधान कार्यालयातून शहानिशा करणारे पत्रदेखील आले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्या भेटायला या, असे सांगितले. सर्वसामान्य कार्यकर्त्यावरील नेत्याचा विश्वास, त्याच्या तक्रारीची तड लावण्याची त्यांची वृत्ती तसेच त्याला बळ देण्याचे त्यांचे धोरण दिसून येते.

(लेखक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सरचिटणीस आहेत.)

loading image
go to top