मुद्रा : गृहिणी ते गृहमंत्री

संजय जाधव
सोमवार, 10 जून 2019

सर्वसाधारणपणे महिला आमदार म्हटले की "महिला व बालकल्याण मंत्रालय' असे समीकरण अनेक राज्यांमध्ये आढळते. परंतु, एखाद्या राज्याचे गृहमंत्रिपद महिलेकडे गेल्याचे अपवादानेच आढळते.

सर्वसाधारणपणे महिला आमदार म्हटले की "महिला व बालकल्याण मंत्रालय' असे समीकरण अनेक राज्यांमध्ये आढळते. परंतु, एखाद्या राज्याचे गृहमंत्रिपद महिलेकडे गेल्याचे अपवादानेच आढळते. त्यातच ही महिला दलितवर्गातील असल्यास असा अपवाद घडणेही विरळाच! परंतु, आंध्र प्रदेशमध्ये हे घडले आहे. मेकथोटी सुचरिता या महिलेने आधीची सर्व समीकरणे मोडीत काढत नवा इतिहास घडविला.

गृहिणी ते गृहमंत्री, असा त्यांचा प्रवास वाखाणण्यासारखा आहे. 
आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांनी सत्तांतर घडवून सर्वांनाच मोठा धक्का दिला. याचबरोबर तब्बल पाच जणांची उपमुख्यमंत्रिपदी नियुक्ती करून आणखी एक आश्‍चर्याचा धक्का दिला आहे. यातच त्यांनी दलित महिलेची गृहमंत्रिपदी नियुक्ती करून मोठे सुधारणावादी पाऊल उचलले आहे. आंध्रच्या गृहमंत्री होणाऱ्या सुचरिता या प्रतिपाडू विधानसभा मतदारसंघातून निवडून आल्या आहेत. गुंटूर जिल्ह्यातील त्या पहिल्याच दलित महिला मंत्री ठरल्या आहेत. पहिल्यांदाच मंत्रिपदाची संधी आणि तीही गृहमंत्रिपदाची, असा दुर्मीळ योग त्यांच्या बाबतीत घडला आहे. 

वाय. एस. आर. रेड्डी यांनी 2003 मध्ये काढलेल्या पदयात्रेवेळी सुचरिता यांच्यातील नेतृत्वगुण हेरले. गृहिणी असलेल्या सुचरिता यांना राजकारणात येण्यास त्यांनी प्रोत्साहन दिले. सुचरिता यांनी 2006 मध्ये कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून राजकारणास सुरवात केली. गुंटूर जिल्हा परिषदेच्या सदस्य म्हणून त्यांनी दोन वर्षे काम केले. त्यानंतर वायएसआर यांनी 2009 मध्ये त्यांना विधानसभेची संधी दिली.

वायएसआर यांच्या मृत्यूनंतर काही काळाने स्थापन झालेल्या वायएसआर कॉंग्रेस पक्षासाठी राजीनामा देणाऱ्या कॉंग्रेसच्या आमदारांमध्ये सुचरिता यांचा समावेश होता. त्यानंतर 2012 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत 17 हजार 500 मतांनी त्या विजयी झाल्या. 

आंध्र प्रदेशच्या विभाजनाला विरोध करण्यातही त्या आघाडीवर होत्या. वायएसआर यांच्या पत्नी विजयालक्ष्मी या दिल्लीत राज्याच्या विभाजनाला विरोध करण्यासाठी जात, त्या वेळी सुचरिता नेहमी त्यांच्यासोबत असत. सुचरिता यांना मागील विधानसभा निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. मात्र, अपयशाने खचून न जाता त्यांनी पक्षाचे संघटनात्मक कार्य सुरूच ठेवले.

या निवडणुकीत त्यांनी तेलगू देसम पक्षाचे डोक्का माणिक्‍य प्रसाद यांचा पराभव करीत दमदार पुनरागमन केले. गृहमंत्री म्हणून त्यांची कामगिरी प्रभावी ठरल्यास त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील ती एक लक्षणीय घटना ठरेलच; शिवाय एक प्रेरक उदाहरणही ठरेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sanjay Jadhav writes Article on Mekathoti Sucharita