संगीतवाद्य रबाबच्या पुनरुज्जीवनासाठी...

संगीतवाद्य रबाबच्या पुनरुज्जीवनासाठी...
Updated on

गुरू नानकदेव यांचे शिष्य भाई मर्दाना यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि रबाब या विस्मरणात जाऊ पाहणाऱ्या वाद्याचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी सहा रबाबवादक कलावंतांना या आठवड्यात पुण्यात भाई मर्दाना स्मृती पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. या निमित्ताने भाई मर्दाना आणि रबाब या वाद्याविषयी... 

भाई मर्दाना हे शीख धर्माचे संस्थापक गुरू नानकदेवांचे पहिले शिष्य. भाई मर्दाना यांनी गुरू नानकांच्या देश-विदेशांतील प्रवासापासून ते कर्तारपूरमधील त्यांच्या अंतिम काळापर्यंत तब्बल २७ वर्षे नुसतीच साथ दिली नाही; तर गुरू नानकांना धर्मविषयक असंख्य प्रश्न विचारून शीख धर्मविचारात मोलाची भर घालायला मदत केली. ते मूळचे मुस्लिम; परंतु ते शीख म्हणजे शिष्य झाले, अशी इतिहासात नोंद आहे. रबाब हे मूळचे अफगाणिस्तानातले. वाद्य वाजवण्यात ते कुशल होते. गुरू नानकांच्या रचनांना ते रबाबची साथ देत, त्या रचनांचे सौंदर्य वाढवत असत. रबाब म्हटले तर प्रथम आठवतात ते भाई मर्दाना. एवढे रबाब आणि भाई मर्दाना यांचे अतूट नाते आहे. सुवर्णमंदिरात आजही गुरुबानीच्या नित्य गायनात रबाबची साथ असते आणि वादक हा बऱ्याचदा मुस्लिम असतो. एका अर्थाने भाई मर्दाना यांच्यामुळे रबाब हे माणसे, धर्म जोडण्याचे प्रतीक बनले आहे.यंदा गुरू नानकदेव यांच्या ५५० व्या प्रकाशवर्षाच्या निमित्ताने भाई मर्दानांची आठवण येणे अपरिहार्य आहे. पुण्यातील ‘सरहद’ आणि शीख जनसेवा संघ या संस्थांनी भाई मर्दानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि रबाब या विस्मरणात जाऊ पाहणाऱ्या वाद्याचे पुनरुज्जीवन करण्यासाठी रबाबचे गेली शंभर वर्षे जतन करणाऱ्या रबाबनवाज सनाउल्ला भट या संगीत घराण्यातील सहा रबाबवादक कलावंतांना भाई मर्दाना स्मृती पुरस्कार जाहीर केला आहे. या पुरस्कार वितरण समारंभाच्या निमित्ताने या आठवड्यात  पुण्यात रबाबवादनाचा जाहीर कार्यक्रम होणार आहे.

आज भारतात रबाबवादन करणारे मोजकेच कलावंत आहेत. त्यातही बव्हंशी काश्‍मिरी व्यक्तीच अधिक आहेत. रबाब हे तंतुवाद्य बनविण्याची कला मुळात अवघड. ती काश्‍मिरींनी आत्मसात केली. शाहतूत किंवा अक्रोडचे एकसंध लाकूड हे वाद्य बनवण्यासाठी वापरले जाते. तुंबाही एकसंध असतो. त्याच्या विशिष्ट आकारामुळे तार छेडताच ध्वनी धीरगंभीरपणे झंकारतो. या वाद्याला सतरा तारा असतात. हे वाद्य बनवू शकणारे आता संख्येने कमीच आहेत. रबाब जिवंत ठेवण्याचे काम केले ते काश्‍मीरनेच, असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही. काश्‍मीर खोऱ्यातील सनाउल्ला भट यांच्या घराण्याने ही अवघड कला जिवंत ठेवण्याचे कार्य गेली शंभरहून अधिक वर्षे केले आहे. देश-विदेशांत ते व त्यांचे पाच सहकारी रबाबवादनाचे जाहीर कार्यक्रम करत आहेत. लोकसंगीताला आणि रागदारीलाही साथ देण्यात या पहाडी वाद्याचा कोणी हात धरणार नाही. काश्‍मिरी लोकसंगीत या साजानेच खुलते. मात्र, पाश्‍चात्त्य संगीताच्या वाढत्या प्रभावामुळे रबाब मागे पडत गेले हे दुर्दैव. या वाद्याचे पुनरुज्जीवन व्हावे, देशभरच्या संगीतकारांना आणि संगीतप्रेमींना रबाबमधून उठणारे आगळे-वेगळे झंकार अनुभवायला मिळावेत, या हेतूने ‘सरहद’चे संस्थापक संजय नहार यांनी भाई मर्दानांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम हाती घेतला आहे. आठव्या शतकात अफगाणिस्तानात जन्माला आलेले रबाब हे वाद्य संगीतरसिकांना अगदीच अपरिचित नाही. सरोद या वाद्याचा जन्म याच रबाबचा पुढचा अवतार आहे. पण, रबाबचे ध्वनितंत्र वेगळे आणि त्याचे कारण रबाबच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेत दडलेले आहे. अनेक गीतांत हे वाद्य वापरले गेले आहे. पंजाबमध्येही या वाद्याचे पुनरुज्जीवन करण्याचे काम होत आहे. महाराष्ट्रानेही या उपक्रमाद्वारे यासाठी पुढाकार घेतला आहे. रबाब जिवंत ठेवण्यासाठी पिढ्यानपिढ्या प्रयत्न केलेल्या सनाउल्ला भट घराण्याचे वंशज असलेल्या रबाबनवाज अब्दुल हमीद भट, इश्‍फाक हमीद भट, मोहंमद अल्ताफ भट, मोहंमद युसूफ राह, सलीम जहाँगीर आणि यावेर नझीर यांना भाई मर्दाना पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. देश आणि देशातील माणसे जोडण्याचे कार्य केलेल्या गुरू नानकदेवांचे शिष्य भाई मर्दाना आणि रबाबची परंपरा जिवंत ठेवत तेच कार्य अथकपणे करत आलेल्या कलावंतांना दिला जाणारा हा पुरस्कार त्यामुळेच महत्त्वाचा आहे. रसिकांना रबाबचे स्वरवैभव अनुभवण्याची संधीही या निमित्ताने मिळेलच; पण विस्मृतीत जाऊ पाहणाऱ्या एका अलौकिक संगीतवाद्याचे पुनरुज्जीवन व्हायलाही यामुळे मोठी मदत होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com