तंत्र दुखापतीविना धावण्याचं...

तंदुरुस्त राहण्यासाठी धावण्याचा, चालण्याचा व्यायाम अनेक जण करतात. त्याचे योग्य तंत्र जाणून घेतले, तर हा व्यायाम अधिक परिणामकारक ठरू शकतो.
Running
Runningsakal

तंदुरुस्त राहण्यासाठी धावण्याचा, चालण्याचा व्यायाम अनेक जण करतात. त्याचे योग्य तंत्र जाणून घेतले, तर हा व्यायाम अधिक परिणामकारक ठरू शकतो. त्यादृष्टीने ‘ची’ या धावण्याच्या विशिष्ट तंत्राची ओळख करून देणारा लेख.

नुकतंच मी थायलंडला जाऊन ‘ची’ रनिंग हे तंत्र शिकून आलो. हे तंत्र आत्मसात केल्यास आपण चालण्या-धावण्याचा आनंद लुटू शकतो. या तंत्राचा उपयोग चालण्याकरता देखील होतो, हेही महत्त्वाचं आहे. हिवाळा म्हटलं की, चालण्या-धावण्याचा हंगाम सुरू होतो. हल्ली पुण्यामध्ये रस्तोरस्ती विविध वयोगटातले लोक अगदी पहाटेपासून धावताना दिसतात. ही चांगलीच गोष्ट आहे.

याच कारणामुळे विविध संस्था आणि संघटना मॅरॅथॉन स्पर्धा आयोजित करत असतात. चालणं आणि धावणं या दोन क्रिया, व्यायाम, आनंद आणि तंदुरुस्तीची चाचणी, अशा विविध उद्देशांनी केल्या जातात. मी स्वतः गेली अनेक वर्षं धावतो आहे. त्यात आता ‘ची’ रनिंग तंत्रज्ञान साथीला आहे. त्यामुळे वेगळा आनंद मिळतो आहे.

‘ची’ रनिंग हे तंत्र चीनच्या ताई-ची या स्वसंरक्षण व आरोग्यविषयक युद्धकलेच्या (मार्शल आर्ट) तत्त्वावर आधारित आहे आणि हे तत्त्व आहे – कमी म्हणजे जास्त. याचा अर्थ कमीत कमी ऊर्जेमध्ये जास्तीत जास्त परिणाम मिळवणं. ऊर्जेचा अनावश्यक वापर टाळणं. अनावश्यक हालचाली टाळणं. त्याऐवजी गुरुत्वाकर्षण, चल ऊर्जा अशा शक्तींचा वापर करणं. ताई-ची ही प्रणाली प्राचीन काळच्या चिनी विद्वानांनी प्राण्यांच्या हालचालींचा अभ्यास करून विकसित केली गेली आहे.

'ची' म्हणजे कुठल्याही सजीवाला चालवणारी चालक ऊर्जा. मानसिक एकाग्रता आणि शैथिल्य यांद्वारे आपण ही ऊर्जा अनुभवू शकतो, तसंच तिला दिशाही देऊ शकतो. ज्याप्रमाणे झाडाची मजबुती त्याच्या खोडात असते, फांद्या वा पानांमध्ये नव्हे! त्याचप्रमाणे, आपला पाठीचा कणा हा आपल्या शरीराची मजबूती ठरवतो. हा कणा म्हणजे जणू एक नळी असते, जिच्यातून ‘ची’ शरीरामध्ये प्रवाहित होत असते.

साहजिकच पाठीचा कणा जितका सरळ राहील तितका उर्जेचा प्रवाह विनाअडथळा आणि सुरळीत राहील. त्यामुळे चालताना वा पळताना पाठीचा कणा सरळ असेल आणि उर्वरित शरीर मात्र शिथिल असेल, तर शरीर ती क्रिया करताना थकणार नाही, त्याला दुखापत होणार नाही आणि मानसिकदृष्ट्याही आपण उल्हसित, तजेलदार राहू शकतो.

सामान्यतः लांब अंतर पळणं किंवा वेगानं पळणं (किंवा चालणं) म्हणजे जास्त व्यायाम होतो आणि त्याकरता आपल्याला पायाच्या स्नायूंची शक्ती वाढवणं आवश्यक असतं, असं समजलं जातं. पण वस्तुस्थिती तशी नाही. ‘ची’ तंत्राचा गाभाच हा आहे की, कुठलीही शारीरिक क्रिया करताना तुम्ही जास्तीत जास्त आनंददायी असायला हवं आणि त्यामध्ये तुमचं मन एकाग्र, तसंच मन आणि शरीर शिथिल असावं.

आपण करत असलेल्या क्रियेमध्ये आपलं मन एकाग्र असेल, ताण किंवा तणावमुक्त असेल आणि त्याचबरोबर शरीरही कुठल्याही ताणाविना शिथिल असेल, तर ती क्रिया आनंददायी ठरते. आपण पाहतो की, लहान मुलं खेळतात, पळतात. त्यांचे स्नायू अद्याप पूर्ण विकसितदेखील झालेले नसतात, पण एखाद्या प्रौढ व्यक्तीच्या तुलनेत ते जास्त अंतर, जास्त वेगानं आणि दुखापतीविना पळू शकतात.

त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे ते ही क्रिया हसत-हसत आणि आनंदानं करत असतात. यामागे हेच तत्त्व आहे. खेळताना मुलांच्या मनावर अनावश्यक ताण नसतो, त्यांचं मन खेळावर एकाग्र असतं आणि त्यांचं शरीरही शिथिल असतं. त्यामुळेच ती खेळण्याचा आनंद मनापासून अनुभवत असतात. ‘ची’ रनिंगचं तंत्र आपल्याला हेच करायला मदत करतं.

दुसरं म्हणजे, चालणं, धावणं या क्रिया स्वाभाविक वाटत असल्या तरी वाढत्या वयासोबत या दोन्ही क्रिया करताना दुखापत होण्याची शक्यता खूप असते आणि काही बाबतींत ही दुखापत गंभीरदेखील ठरू शकते. पण ‘ची’ रनिंगचं तंत्र जाणून घेतल्यास दुखापत होण्याची शक्यता जवळजवळ नाहीशी होऊ शकते. अर्थातच, हे तंत्र एका रात्रीत वा काही दिवसांमध्ये शिकता येत नाही.

त्याकरता साधना करणं आवश्यक आहे, जाणीवपूर्वक सराव करणं आवश्यक आहे. वेळ देणं आवश्यक आहे. मी थायलंडमध्ये जे प्रशिक्षण घेतलं, ते खर्चिक असल्यामुळे सगळ्यांनाच तिथे जाऊन ते घेणं शक्य होणार नाही हे जाणून येत्या वर्षभरामध्ये तसा एक प्रशिक्षण कार्यक्रम पुण्यामध्ये सुरू करण्याचा माझा मानस आहे. हे प्रशिक्षण निःशुल्क असेल आणि पुण्यामध्ये विविध ठिकाणी ते दिलं जाईल, असा माझा प्रयत्न आहे.

त्यासाठी नियमित धावणाऱ्या लोकांशी संपर्क सुरू केला आहे. नियमित धावणारे अथवा चालणारे किंवा नुकतीच या गोष्टींना सुरुवात करणारे, तरुण अथवा वयस्कर, स्त्री वा पुरुष, लहान मुलं अथवा मुली, अशा सगळ्यांनाच या तंत्राचा फायदा होऊ शकतो. तेव्हा तुम्ही धावत असाल किंवा धावण्याचा संकल्प करत असाल, कुठल्याही वयाचे असाल, तरी हे तंत्र जाणून घ्या आणि धावण्याचा आनंद अधिक लुटा.

मला माझ्या आयुष्यात धावताना काहीवेळा त्रास सहन करावा लागला. पण ‘ची रनिंग’मुळे मला धावण्यासाठीचं नवं तंत्रज्ञान मिळालं आणि माझं चालणं, धावणं अधिक परिणामकारक आणि आनंददायी झालं.

(लेखक ‘स्वानंद ॲडव्हेंचर्स’चे संचालक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com