खेळांतून आनंदच नव्हे सक्षमीकरणही

सन्मय परांजपे
शनिवार, 13 एप्रिल 2019

मी  लहानपणापासून स्कूटरवर आईच्या मागे बसून टेबल टेनिस शिकायला जायचो. तेव्हा सिग्नलजवळ माझ्याच वयाची मुले भीक मागताना दिसली, की मी जरा अस्वस्थ व्हायचो. आईला विचारायचो : ‘ही मुलं माझ्यासारखी खेळ शिकायला का येऊ शकत नाहीत? कधी येऊ शकतील?’ या प्रश्नांना त्या वेळी उत्तर नव्हते. पुढे अनेक वर्षांनी तो मिळाले- जेव्हा माझ्या हातात टेबल टेनिसचा हॉल आला. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मला खेळायला मिळाले. जर्मनी, जपान, चीन, तैवानमधील प्रशिक्षण केंद्रांमध्ये सराव केल्यावर हे देश खेळात एवढे पुढे का? हे लक्षात आले. आपल्याकडेही असे दर्जेदार प्रशिक्षण मिळायला हवे, असे वाटू लागले.

मी  लहानपणापासून स्कूटरवर आईच्या मागे बसून टेबल टेनिस शिकायला जायचो. तेव्हा सिग्नलजवळ माझ्याच वयाची मुले भीक मागताना दिसली, की मी जरा अस्वस्थ व्हायचो. आईला विचारायचो : ‘ही मुलं माझ्यासारखी खेळ शिकायला का येऊ शकत नाहीत? कधी येऊ शकतील?’ या प्रश्नांना त्या वेळी उत्तर नव्हते. पुढे अनेक वर्षांनी तो मिळाले- जेव्हा माझ्या हातात टेबल टेनिसचा हॉल आला. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये मला खेळायला मिळाले. जर्मनी, जपान, चीन, तैवानमधील प्रशिक्षण केंद्रांमध्ये सराव केल्यावर हे देश खेळात एवढे पुढे का? हे लक्षात आले. आपल्याकडेही असे दर्जेदार प्रशिक्षण मिळायला हवे, असे वाटू लागले. क्‍लब कल्चरऐवजी खेळाडूंच्या हिताला प्राधान्य मिळावं, असं वाटत होतं. त्यातून मी ‘इंडिया खेलेगा’ ही क्रीडा प्रशिक्षण मोहीम सुरू केली. शि. प्र. मंडळीच्या सहकार्याने मोठा आणि संस्कृत विद्या मंदिरच्या सहकार्याने छोटा असे दोन टेबल टेनिस हॉल विकसित केले. मी स्पर्धात्मक खेळाडू असल्यामुळे प्रशिक्षक झालो नाही; पण माझे दोन मेहनती आणि उत्साही सहकारी शिवम्‌ छुनेजा आणि पूर्वा गिडवानी यांना प्रशिक्षक म्हणून तयार केले. विविध देशांत शिकलेल्या उत्तम प्रशिक्षण पद्धतींचा अवलंब शिवम्‌ आणि पूर्वाच्या मदतीने ‘इंडिया खेलेगा’मध्ये सुरू झाला.
प्रशिक्षणाची अशी घडी बसवल्यावर माझ्या बालपणीच्या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचं ठरवलं. त्यासाठी वंचित मुलांच्या एका पुनर्वसन केंद्राला भेट देऊन तेथील मुलांची क्रीडा कलचाचणी घेतली. त्यातून काही मुले निवडून अशांना विनामूल्य प्रशिक्षण देणारा ‘क्रीडा क्रांती प्रकल्प’ (स्पोर्टस इन्किलाब प्रोजेक्‍ट = एसआयपी) फेब्रुवारी २०१७मध्ये सुरू केला. पुढच्याच वर्षी जिल्हा स्पर्धांमध्ये एकेक, दोनदोन फेऱ्या जिंकण्याएवढी मजल १२ वर्षे वयाच्या दोन मुलांनी मारली. १४ वर्षांचा एक मुलगा तर आता अगदी राष्ट्रीय खेळाडूंना ‘मल्टिबॉल’चा सराव देणारा ‘सरावसाथी’ म्हणून तयार झाला आहे. २०१८मध्ये सहा वर्षे (अशा योग्य!) वयाची काही मुले प्रकल्पात सामील झाली. त्यांच्याकडून खूप आशा आहेत.

एसआयपीमध्ये ८ सप्टेंबर २०१८ला (म्हणजे रॉजर फेडररच्या वाढदिवशी) लॉन टेनिसला सुरवात झाली. नंदन बाळ सरांनी त्या वेळी सुखवस्तू घरातील मुलांना ‘एसआयपीच्या मुलांसारखे मेहनती आणि शिस्तबद्ध प्रशिक्षणार्थी बना,’ असा उपदेश केला. हा आमच्यासाठी आशीर्वाद होता.  नुकतीच मार्च २०१९ मध्ये एसआयपीमध्ये पर्वती पायथा जनता वसाहतीतील मुले, रिक्षाचालकांची मुले, चौकीदारांची मुले यांची भर पडली आहे. माझा असा विश्‍वास आहे, की प्रशिक्षणातून या मुलांचा आत्मसन्मान जागा होईल. आत्मविश्वास, आनंद आणि आशावादाची कवचकुंडले त्यांना मिळतील- जी त्यांना व्यसनाधीनता, शोषण, गुन्हेगारीपासून संरक्षण देतील. खेळातील गुणवत्तेच्या जोरावर पुढे शासकीय आणि खासगी क्षेत्रात नोकऱ्याही मिळू शकतील. काही मुले प्रशिक्षक किंवा सरावसाथीसुद्धा बनू शकतील. जेव्हा तळागाळापर्यंत क्रीडा प्रशिक्षणाच्या सुविधा पोचतील, तेव्हाच भारत क्रीडा क्षेत्रात उत्तुंग भरारी मारू शकेल. पुस्तके आणि भाषणे यांत बऱ्याचदा असे गोड गोड; पण अवास्तव विचार मांडले जातात की, सर्वांचे सर्वांशी सतत छान सहकार्याचे नाते जुळावे. पण मानवी स्वभावात स्पर्धा, ईर्षा, चुरस, कुरघोडी करण्याची खुमखुमी याही प्रवृत्ती निसर्गतः येतात. प्रश्‍न असतो तो या प्रवृत्तींना विधायक वळण कसे देते येईल हा. एसआयपीतून नेमके ते साधायचे आहे. स्पर्धा जरूर करावी; पण ती नीतिनियम, सभ्यता यांची स्वेच्छेने स्वीकारलेली बंधने पाळूनच! यातच खरी मजा असते...  खुन्नस न करताही जिंकता येते आणि आपल्यापेक्षा बेहतर खेळाडूकडून हरण्यातही बरेच शिकता येते हा दिलदारीचा संस्कार मुलांवर कोवळ्या वयातच झाला, तर बेबंद गुंडगिरीला आळा बसेल.

सुखवस्तू घरातील मुले आणि एसआयपीची मुले यांच्यात एक फरक मला जाणवतो. ही मुले आत्मकेंद्रितपणात अडकून न पडता एकमेकांना निरपेक्षपणे मदत करतात. इतकेच नव्हे, तर एकदा लॉ कॉलेजच्या मैदानावर त्यांचे फिटनेस शिबिर संपल्यावर प्रशिक्षकाने त्यांना जेव्हा बिस्किटाचे पुडे वाटले, तेव्हा त्यांनी प्रशिक्षकाकडे एकमुखाने एकाच गोष्टीची परवानगी मागितली : ‘सर, आम्ही काही बिस्किटं या मैदानावर रोज येणाऱ्या कुत्र्यांना दिली, तर चालेल ना?’  बस, एसआयपीच्या मुलांकडून सेल्फीमग्न सुखवस्तू समाज ही दानत शिकला, तर भारताची क्रीडा क्षेत्रातील भरारी कोणीही रोखू शकणार नाही. अल्पकालीन तोट्याचा बाऊ न करता, झटपट चांगल्या निकालांचा हट्ट न धरता दीर्घकालीन उत्तम परताव्यासाठी सुखवस्तू लोक एसआयपीमध्ये सातत्याने, नियमितपणे आणि विश्वासाने आर्थिक गुंतवणूक करतात. स्पोर्टस इन्किलाब प्रोजेक्‍ट या एसआयपीची सुद्धा सुखवस्तू समाजाकडून अशाच आर्थिकच नव्हे, तर भावनिक आणि कौशल्यात्मक गुंतवणुकीची अपेक्षा आहे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sanmay paranjpe write youthtalk article in editorial