... ज्ञानदीप लावू जगी
शंकर टेमघरे
संत सेना महाराज विद्वान संत म्हणून परिचित आहेत. त्यांनी महाराष्ट्रासह उत्तरेकडील प्रदेशांत भक्तीचा संदेश पोहोचविला. मध्य प्रदेशातील बांधवगड येथे १३०१च्या सुमारास त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव देविदास आणि आईचे नाव प्रेमकुंवरबाई. सेना महाराजांना रामानंद स्वामी यांचा सहवास लाभला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली त्यांनी भक्तिमार्ग स्वीकारला. व्यवसायाने ते नाभिक. त्यांनी सांसारिक जबाबदाऱ्या पार पाडल्या असल्या, तरी त्यांचे मन अध्यात्मात होते. बाराव्या शतकात संत ज्ञानेश्वर महाराजांनी भागवतधर्माचा पाया रचला. या संप्रदायाच्या उदयामुळे परकी आक्रमणांच्या काळातही मोठी आध्यात्मिक क्रांती झाली. वारकरी संप्रदायाच्या रुपाने सर्वसामान्यांना ज्ञानग्रहणाचा अधिकार असतो, याची जाणीव संत ज्ञानेश्वरमहाराजांनी करून दिली होती. त्यामुळेच संत नामदेव महाराज, संत जनाबाई, संत गोरोबाकाका, संत सावता महाराज आणि त्यानंतर संत सेना महाराज या संतांचे तत्त्वज्ञान सर्वसामान्यांच्या समोर आले.