गेलें तें भूस जावो परतें...

तुकोबांचा अभंगगाथा म्हणजे तुकोबांच्या मनाचा आरसाच जणू. ‘तुकोबा’नामक विलक्षण तरल मनाच्या अगदी अंत:स्तरावरदेखील उमटणाऱ्या सूक्ष्मातिसूक्ष्म विचारलहरींची प्रतिबिंबे आपल्याला त्यांच्या अभंगांत उमटलेली दिसतात.
गेलें तें भूस जावो परतें...
गेलें तें भूस जावो परतें...Sakal

तुकोबांचा अभंगगाथा म्हणजे तुकोबांच्या मनाचा आरसाच जणू. ‘तुकोबा’नामक विलक्षण तरल मनाच्या अगदी अंत:स्तरावरदेखील उमटणाऱ्या सूक्ष्मातिसूक्ष्म विचारलहरींची प्रतिबिंबे आपल्याला त्यांच्या अभंगांत उमटलेली दिसतात.

त्यांच्या गाथेमधील ‘नाट’ या अभंगप्रकारातील एका अभंगात तुकोबा काळाला धन्यवाद देताना दिसतात. ‘‘इथवर मी जगलो हे बरे झाले. शरीर आधीच पडले असते तर काहीच भक्तिसाधन हातून घडले नसते. आजवरचे दिवस अन्य गोष्टींमध्येच बव्हंशी व्यतीत झाले.

त्यांबद्दल खंत करत बसणे आता नको. हाताशी असलेले उर्वरित आयुष्य मात्र परमार्थसाधनातच वेचायचे...’’, असे तुकोबारायांच्या मनात उमटलेले विचारतरंग अभंगात अक्षरांकित झालेले आहेत.

गतकालीन घटितांबद्दल वर्तमानात हळहळत बसण्यापेक्षा तो सारा गतकाल झटकून टाकत, मनाशी योजलेल्या ईप्सिताच्या परिपूर्तीसाठी सरसावायचे हा तुकोबांच्या व्यक्तित्वाचा पीळ अभंगाच्या दुसऱ्या चरणातील, ‘गेलें तें भूस जावो परते’, या ओळींत रसरशीतपणे अवतरलेला आहे.

तुकोबा इथे दाखला देतात, तो शेतावरील खळ्यावर चालणाऱ्या उफणणीचा. कणसे मळून वेगळ्या केलेल्या जोंधळ्यातील भूस काढून टाकण्यासाठी दाणेे उफणले की निरुपयोगी भूस वाऱ्याबरोबर वाहून जाते.

त्याच न्यायाने, भूतकालीन घटनांचे निरुपयोगी व क्षुल्लक भुसकट मागेच सोडून, भविष्यात जे साध्य करायचे आहे, त्याच्या परिपूर्तीसाठी झटणे, हे तुकोबांच्या दाखल्यानुसार, सुज्ञपणाचे लक्षण होय.

भूतकाळाकडे बघण्याची तुकोबाप्रणीत तीच जीवनदृष्टी आधुनिक अर्थशास्त्रामध्ये, ‘लेट बायगॉन्स बी बायगॉन्स...’, अशा शब्दसंहितेद्वारे निर्देशित केली जाते. एखादा होतकरू नवउद्योजक मोठ्या उमेदीने नवीन व्यवसाय सुरू करतो.

उद्योग सुरू झाल्यानंतर अवघ्या वर्षा-दोन वर्षांतच, काही कारणाने त्या व्यवसायक्षेत्राचे दिवस फिरतात. हेही दिवस जातील, उद्योगामध्ये व्यवसायाचे चक्र खाली-वर तर होतच राहणार...अशी मनाची समजूत घालत तो होतकरू व्यवसाय रेटतच राहतो.

एक वेळ अशी येते की, या व्यवसायक्षेत्रातून आता बाहेर पडणेच इष्ट, अशी लक्षणे स्पष्ट दिसू लागतात. तरीदेखील, ‘‘अरे, एवढी गुंतवणूक या व्यवसायात केली, यंत्रसामग्री घेतली ...एवढ्या सगळ्यांवर पाणी कसे सोडायचे’’, या विचाराने, तोच उद्योग तगवण्याच्या हट्टी प्रयत्नांपायी तोट्याच्या गर्तेत अधिकाधिक रुतत जाणाऱ्या त्या उद्योजकाला अखेर एक दिवस,

‘लेट बायगॉन्स बी बायगॉन्स...’, या भूमिकेवर यावेच लागते. आजवर जे झाले ते झाले, आता याउपरही आपण दिशा बदलली नाही, तर वर्तमानाबरोबरच आपले भविष्यही धोक्यात येईल, तेव्हा भविष्यकालीन वाटचालीसाठी दिशा बदलण्यातच आपले हित सामावलेले आहे,

हे उमगलेला व्यावसायिक भूतकाळाचे भूस उफणून टाकत नव्या दिशेला प्रारंभ करतो. गतकाळातील घटनांकडे, इतिहासाकडे बघण्याच्या या तारतम्यपूर्ण नजरेलाच ‘प्रगल्भ इतिहासदृष्टी’ असे संबोधतात.

खामगाव येथे तारीख २७ डिसेंबर १९१७ रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘अखिल मराठा शिक्षण परिषदे’च्या ११व्या अधिवेशनादरम्यान केलेल्या अध्यक्षीय भाषणातील एक मुद्दा, करवीराधिपती छत्रपती शाहूमहाराजांच्या ठायी तशी प्रगल्भ, परिपक्व इतिहासदृष्टी कशी परिणत झालेली होती, याची पुरेपूर साक्ष पुरवितो.

स्वराज्यसंपादनाचे लाभ संपूर्णतया पदरात पाडून घेण्यासाठी प्रथम आपल्याला सामाजिक ऐक्यासाठी कसोशीने प्रयत्नशील बनावे लागेल आणि त्यासाठी गतकालातील अनिष्ट व कटू कथितांचे भूस वा­ऱ्याबरोबर लोटून द्यावे लागेल, ही बाब महाराजांनी त्यांच्या अध्यक्षीय विचारविमर्शादरम्यान पोटतिडकीने मांडलेली दिसते.

‘‘...जरुरीची गोष्ट ही की, जातिपद्धतीच्या शृंखला तोडून टाकण्याचे ध्येय साध्य करण्याकरिता आणि परस्परांची मने एक करणे असेल तर परशुरामास रामाने जिंकले तो राम क्षत्रिय होता आणि परशुराम हा ब्राह्मण होता,

असल्या प्रकारच्या गतकालीन ऐतिहासिक गोष्टी आम्ही साफ विसरल्या पाहिजेत. असल्या गोष्टींची आठवण आम्ही सदोदित ठेवू लागलो, तर राम आणि परशुराम यांच्यासारखीच भांडणे आमच्यामध्ये चालू रहातील, अशी मला खात्री आहे’’, हे शाहूमहाराजांचे प्रतिपादन म्हणजे

, ‘गेलें तें भूस जावो परतें’, या तुकोक्तीचा गाभा आणि आधुनिक अर्थशास्त्रीय व्यावसायिक तत्त्वाचा सारांश, त्यांना किती अचूकपणे आकळला होता, याचा सोळा कसी दाखला होय. ओंजळीत काय जपायचे आणि कोणते भूस उफणून टाकायचे याचे तारतम्य पूर्णपणे हरपण्यातच आपल्या आजच्या बहुतेक समस्यांची पाळेमुळे घट्ट रुजलेली आहेत!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com