तुका म्हणे हेचि फळ...

उत्तर शोधताना मात्र आपण प्रश्नाच्या अवतीभवती असणाऱ्या माणसांचा सतत विचार करत राहतो. कुणाला काय वाटेल, कुणी दुखावणार तर नाही ना, अशा शंकांनी आपणच दुःखी होतो.
sant tukaram life there are many situations that make us stop and think Makes decisions and move on
sant tukaram life there are many situations that make us stop and think Makes decisions and move onSakal

- डॉ. शेफाली भुजबळ

आयुष्याच्या वाटचालीत अनेक प्रसंग, प्रश्न असे येतात की, ज्यामुळे आपण थांबतो, विचार करतो. निर्णय घेतो आणि पुढे जातो. हे सगळे घडत असले तरी लिहिताना ते जितके सोपे वाटते तितके कृतीत आणताना सोपे नसते, दमछाक होते. प्रश्न निर्माण झाला की, त्याचे उत्तर आपल्यालाच शोधावे लागते. कुणीतरी येईल आणि उत्तर शोधून देईल, असे विसंबता येत नाही.

उत्तर शोधताना मात्र आपण प्रश्नाच्या अवतीभवती असणाऱ्या माणसांचा सतत विचार करत राहतो. कुणाला काय वाटेल, कुणी दुखावणार तर नाही ना, अशा शंकांनी आपणच दुःखी होतो. मग जड अंतःकरणाने एखाद्या निर्णयाप्रत येतो.

त्यानंतरसुद्धा काळजी वाटत राहते ती त्याच्या परिणामांची. आपल्या निर्णयावर कोण कशी प्रतिक्रिया देईल, हे आपणच ठरवतो. प्रतिक्रिया येण्याआधीच कुढत राहतो. या काळात मनात काही आराखडा तयार होत जातो.

त्याचा परिणाम आपल्याच मनावर होतो. कुणीतरी दुखावले जाईल, या भावनेने खिन्नता वाटत राहते. त्या मानसिकतेतच वावरत राहतो. त्यामुळे जगणे आनंददायी होण्यापेक्षा दुःखी होते. या परिस्थितीलाच ‘भावनिक होणे’ म्हणतात.

आमच्या परिचयात एक व्यक्ती अशी आहे, जी आजवर कायम स्वतःच्याच निर्णयांवर संशय घेत दुःखी राहात आली आहे. तिच्या त्या दुःखाचा विषय आता खूप पुढे गेला आहे. तिला उच्च रक्तदाबासारखी व्याधी जडली आहे.

काय होईल, कसे होईल, याच प्रश्नांभोवती मन फिरत राहायचे. म्हणजे दुसऱ्याचा विचार करूच नये, ते करणे चांगले नाही असे अजिबात म्हणायचे नाही; याउलट प्रश्नाची सोडवणूक करताना घेतलेल्या निर्णयाप्रती जर आपण ठाम राहात असू तर त्यामुळे नाराज होणाऱ्या, झालेल्या व्यक्तींचीदेखील समजूत काढून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा विचार केला पाहिजे.

जीवनामध्ये असा ठामपणा दाखवता आला नाही; तर शारीरिक, मानसिक या व्यक्तिगत प्रश्नांबरोबरच कौटुंबिक, सामाजिक प्रश्नदेखील निर्माण होतात. त्यामुळे एकदा निर्णय घेतला की त्यावर ठाम राहणे, परिणामांची चिंता न करणे, कुठल्याही परिस्थितीत भावनिक होऊन आपण चुकलो आहोत असे न म्हणता पुढे जाणे हे सर्वांत चांगले असते.

यालाच ‘निश्चयाचे बळ’ म्हणतात. कुढत बसणाऱ्याला काही दिवस आप्त-स्नेहीजन साथ देतात; पण ती कायमची, सततची नसते. त्यासाठी धैर्य, प्रामाणिकपणा या जीवनाच्या अस्सल दोन बाजू घेऊन मार्गक्रमण करता यायला हवे. जीवनसाधना करताना धैर्य आणि प्रामाणिकपणा या दोन शक्ती असतील तर कोणतेही युद्ध जिंकता येते.

लटपट कापणारे, निर्णय न घेणारे, मागे राहणारे लोक आपल्या जीवनाला आकार देऊ शकत नाहीत. येणाऱ्या प्रत्येक क्षणाला आपल्याला जर सुंदर करता आले, सजवता आले तर आणि तरच साध्य साधता येईल.

यासाठी जीवनसाधना करता येणे म्हणजेच अध्यात्माचा अंश आत्मसात करता येणे महत्त्वाचे आहे. रडत बसणारे लोक कुणालाच आवडत नाहीत; मग ते निर्मात्याला, अज्ञात शक्तीला आवडतील? - या प्रश्नाचा सावधपणे विचार करायला हवा.

आपल्याला मिळालेले जीवन हे कृतकृत्यतेच्या टप्प्यावर नेऊन ठेवायचे असेल तर त्यासाठी अनेकदा आयुष्यात कटू निर्णय निश्चयाच्या बळावर घ्यावेच लागतात. तसे केले तरच यश संपादता येते. सगळ्यांची मर्जी सांभाळत, सगळ्यांच्या भावनिकतेचा विचार करत, त्यांच्या भावना जपत कुठलेही यश मिळवता येत नाही. त्यात व्यक्ती गुंतून पडत असते.

अगदी नुकतेच पाऊल टाकू लागलेले मूल ते हिमालयात जाऊन साधक झालेले मन इथपर्यंतच्या सर्व मार्गक्रमणात ठामपणा फार आवश्यक असतो. अनेकांना हा प्रकार कठोरतेचाही वाटू शकतो; पण कर्तृत्व गाजवण्यासाठी व कर्तव्य निभावण्यासाठी भावनिकतेला थारा नसतो. ‘भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असते’, असे आपल्याकडे जे म्हटले जाते ते त्याचेच द्योतक.

त्यामुळे अविचारीपणे न वागता आणि सन्मार्गाची वाट न सोडता, भावनिकता बाजूला ठेवून ज्या व्यक्तीला निश्चयाचे बळ वाढवता येते, ते प्रत्यक्षात आणता येते, तिला यशप्राप्ती होतच असते. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे- निश्चयाचे बळ। तुका म्हणे हेचि फळ।। अशा फलप्राप्तीसाठी तुकाराम महाराजांचे हे अध्यात्मचिंतन समजून घ्यायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com