हौस ऑफ बांबू : पुंगी, पुस्तकं, पुढारी आणि…पिंजरा ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हौस ऑफ बांबू : पुंगी, पुस्तकं, पुढारी आणि…पिंजरा !
हौस ऑफ बांबू : पुंगी, पुस्तकं, पुढारी आणि…पिंजरा !

हौस ऑफ बांबू : पुंगी, पुस्तकं, पुढारी आणि…पिंजरा !

नअस्कार! दिवाळीच्या फराळातली शेवटची चकली तोंडात टाकून लिहायला बसल्ये आहे. दिवाळी संपल्यानंतर पुन्हा साहित्य संमेलनाच्या तयारीला लागायचं असं ठरवलं होतंच. ठरल्याप्रमाणं आपलं संमेलन नाशिकला पार पडतंय बरं का! यायचं हं!! कुणीही नाही म्हणायचं नाही…

आधी संमेलन नाशिक शहरात होणार होतं. पण आता पार आडगावात गेलंय. आडगावात म्हंजे अक्षरश: आडगावात. हे गाव नाशिकला बिलगूनच आहे. बिल्डरांच्या जाहिरातींमध्ये आडगावचं नाव ऐकलं होतं. तिथं स्विमिंगपूल आणि जॉगिंग पार्कसकट बऱ्याच सोसायट्या उभ्या राहिल्या असल्यानं आडगाव तसं पुढारलेलं आहे, हे कळलं होतं. शिवाय तिथं आमच्या आर्मस्ट्राँगसाहेबांची नॉलेजसिटी आहेच! याच ज्ञाननगरीमध्ये यंदाचं ९४वं अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे. तेही ऐन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात. साहित्यिकांना माझी प्रेमाची सूचना आहे, की कानटोपी, मफलर, मोजे, स्वेटर आदी साहित्यविषयक सामग्री आपापली घेऊन, मगच आडगावाचा रस्ता धरावा. कडक थंडीत शब्द फुटणार नाहीत! शब्दच फुटले नाहीत तर साहित्य कसं निर्माण होणार? आडगावच्या आसपास हिरवागार परिसर आहे. तिथं कविता बिविता चांगल्या सुचतात, हे खरं असलं तरी वेळीअवेळी सापकिरडूदेखील निघते. हल्ली तिथं बिबट्याचा संचारही वाढला असल्याने ऐन संमेलनस्थळी वनविभागातर्फे पिंजरे लावण्यात येणार असल्याचं संयोजकांनी जाहीर केलं आहे.

आडगाव साहित्य संमेलनाच्या मांडवात काही तरुण माणसं हातात हूक लावलेली काठी आणि पिशव्या- बरण्या घेऊन हिंडताना दिसली तरी आश्चर्य वाटून घेऊ नका. ते सर्पमित्र आहेत, हे ओळखा! एखाद्या कवि अथवा साहित्यिकाच्या खुर्चीखाली वेटोळे घालून बसलेली धामीण हुकाने लीलया ओढून पिशवीत बंद करुन दूर माळरानी सोडून येण्याच्या कामी त्याची नियुक्ती झालेली असू शकते. काटकुळ्या प्रकृतीच्या कविंनी विशेष काळजी घ्यावी.

कविता ऐकून डोके फिरलेल्या एखाद्या सर्पमित्राने हुकाने मान धरुन बरणीत भरलं, तर त्याची जबाबदारी संयोजकांवर नसेल. काही (पुणे-औरंगाबादेतील) मान्यवर साहित्यिक स्वत:ची पुंगी नेणार असल्याचंही ऐकिवात आहे.

नाशकातल्या एखाद्या आयत्या बिळावरचा नागोबा हटवण्यासाठी पुंगीचा उपयोग होईल असं त्यांचं मत आहे. ही पुंगी अर्थातच गाजराची असेल, नागोबा नच सांपडल्यास मोडून खाता येईल, असा सरळसाधा हिशेब असणार. थंडीचे दिवस असल्याने संमेलनाचा दिवस संपल्यानंतर सायंकाळी सातनंतर काही पाहुणे साहित्यिक ‘नागीन डान्स’ करुन दाखवण्याच्या मूडमध्ये येतात. त्यांच्यासाठी वैधानिक इशारा! - सर्पमित्रांपासून सावध रहा!! ते सर्पांचे मित्र आहेत, साहित्यिकांचे असतीलच असे नाही…हे लक्षात ठेवून चालावे. उगीच कोणाच्यान शेपटावर पाय देऊ नये.

खरा धोका आहे तो वनविभागाच्या पिंजऱ्यांचा. बिबट्यांच्या नावाखाली हे पिंजरे लावण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं असलं तरी मला तरी बाई वेगळाच संशय येतो! एखाददुसरा बेसावध साहित्यिकच पिंजऱ्यात अडकायचा, अशी मला भारी भीती वाटते. काही बिबट्यांना मराठी साहित्याबद्दल आस्था असू शकते. बेसावधपणे पिंजऱ्यात अडकलेले दोन-चार कवी तिथल्या तिथे ‘पिंजराकाव्य’ रचताहेत, आणि बिबट्याची एक जोडगोळी (पिंजऱ्याबाहेरुन) तिथल्या तिथे दाद देते आहे, असं चित्र माझ्या डोळ्यासमोर उभं राहिलं.

एरवीही अनेक लेखक, बिबट्याने ‘गाऱ्या’वर यावं, तसेच संमेलनाच्या मांडवात येतात. त्यांनीही सावध राहावं. एकंदरित मराठी साहित्याच्या इतिहासात प्रथमच सर्पमित्र आणि बिबटे प्रतिबंधक वनकर्मचाऱ्यांचा आपत्कालीन कक्ष संमेलनस्थळी उभा राहातो आहे. पुंगी, पुस्तकं, पुढारी आणि पिंजऱ्यांच्या या संमेलनाला तुम्ही येणार ना? यायचं हं…कुणीही नाही म्हणायचं नाही!

loading image
go to top