esakal | हौस ऑफ बांबू : पुस्तके : एक जीवनावश्यक वस्तु!

बोलून बातमी शोधा

Hous of Bamboo
हौस ऑफ बांबू : पुस्तके : एक जीवनावश्यक वस्तु!
sakal_logo
By
कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! गेल्या एका खेपेला आम्ही याच सदरात ‘वाचाल तर वाचाल’ अशा शीर्षकाचा मजकूर लिहिला होता. तोही कुणी धड वाचला नाही, असे खेदाने म्हणावे लागते! (दरवेळी मेले हे असेच होते! कुण्णी कुण्णी वाचत नाही...) पुस्तके वाचली तर माणूस वाचेल, असा सिद्धांत आम्ही मांडला होता. पण ‘मराठी प्रकाशक परिषदे’चे अध्यक्ष आणि ‘पद्मगंधा’वाले अरुणजी जाखडे यांनाही त्याच वेळेला नेमके तस्सेच वाटत होते, हा किती विलक्षण योगायोग? दोन संशोधकांनी एकाच वेळेला दोन ठिकाणी एकच शोध लावल्याच्या घटना इतिहासात घडल्या आहेत.

पुस्तकांची निर्मिती आणि विक्री वगैरे जीवनावश्यक वस्तू व सेवांमध्ये करावी, अशी परिषदेची मागणी आहे. महाराष्ट्र सरकारने छत्री ही जीवनावश्यक वस्तू असल्याचे मान्य केले आहे, पण पुस्तके मात्र नाहीत! चष्म्याचे दुकान उघडे ठेवण्यास परवानगी दिली आहे, पण चष्मा लावून वाचायजोगी पुस्तके जिथे मिळतात ती पुस्तकाची दुकाने मात्र बंद! याला काय अर्थय?

पुस्तके जीवनावश्यक करावीत, या मागणीसाठी काही मराठी प्रकाशकांनी कोर्टात जायचं ठरवलं. म्हंजे ‘पद्मगंधा’वाले अरुण जाखडे उठले, आणि सरळ ‘मनोविकास’वाल्या पाटकरांची भेट घेतली. (दोघांच्याही खांद्याला धोकटी, आणि तीत पुस्तकांचे तुंबलेले गठ्ठे!!) ‘मनोविकास’वाले सावध झाले. सावधगिरीने त्यांनी स्वत:च्या धोकटीत हात घातला! पुढे संवाद असा जाहला :

पद्मगंधा : बेल्जियममध्ये भर लॉकडाऊनमध्ये पुस्तकविक्री चालू झाली!

मनोविकास : च्यामारी!

पद्मगंधा : इटलीत दोन दोन मजली पुस्तकांची दुकाने ऐन कंटेन्मेंट झोनमध्ये उघडी ठेवण्यात आली! आहात कुठे?

मनोविकास : खरं की काय? भलतंच!

पद्मगंधा : फ्रान्सने तर कहर केला, कहर! प्यारिसचे मेयर एनी हिडाल्गो माहितीयेत? मोठा माणूस! त्यांनी पुस्तकविक्रीला लॉकडाऊन असूनही पाठिंबा दिला!

मनोविकास : (कळवळून) बाई आहेत हो त्या!

पद्मगंधा : (ठामपणाने) असेनात! सतरा नोबेल मिळवलेत फ्रान्सनं आजवर!

मनोविकास : (स्वत:शीच) कुठून मिळते यांना ही माहिती? (उघड उघड) क्या बात है!

...येणेप्रमाणे संवाद होऊन दोघेही उठून असीम सरोदे वकिलांकडे गेले. सरोदेवकिलांनी कागद पुढे ओढून सराईतपणे याचिका लिहिली. : ‘‘ज्याअर्थी शिक्षण हा नागरिकांचा मूलभूत हक्क आहे व ज्याअर्थी तो पुस्तकांच्या माध्यमांतून दूरवर पोहोचविण्याचे कार्य केले जाते, त्याअर्थी पुस्तके ही अत्यावश्यक असली पाहिजेत व त्याअर्थी निव्वळ पुस्तके अत्यावश्यक वस्तू न मानता पुस्तकविक्री हीदेखील अत्यावश्यक सेवा मानणेत येऊन, त्याअर्थी इसेन्शियल सर्विसेस कायदा १९६८ मधील कलम २ (१) (अ) (९) अन्वये केंद्र सरकारने पुस्तके व पुस्तकविक्री यांचा अत्यावश्यक वस्तू व सेवांमध्ये समावेश करावा, ही विनंती...’’

(हुश्श...)

‘मराठी प्रकाशक परिषदे’ने केलेल्या मागणीला आमचा तंतोतंत पाठिंबा आहे, हे वेगळं सांगायला नकोच! पुस्तकांचं महत्त्व आमच्याइतकं कुणालाच ठाऊक नसावं! आम्ही या मागणीला पाठिंबा देणारा संदेश व्हायरल करणार आहो! (तो बरोबर वाचाल तुम्ही!)

तुम्हीही हा हॅशटॅग चालवा हं! जगात पुस्तके नसती, तर माणसाने इतकी प्रगती केली असती का? चाक, वाफ आणि पुस्तके हे तीन मानवाचे मूलभूत शोध आहेत, असे आमचे अभ्यासोक्त मत आहे. चाकाचे तूर्त राहू द्या, पण दिवसांतून दोनदा वाफ घ्या आणि पुस्तके (विकत घेऊन) वाचा, अशी प्रेमाची याचिका आम्ही वाचकांना येथे करीत आहो! इति.