esakal | हौस ऑफ बांबू : मराठी साहित्यातले दोन दिलिपोत्तम!
sakal

बोलून बातमी शोधा

हौस ऑफ बांबू : मराठी साहित्यातले दोन दिलिपोत्तम!

हौस ऑफ बांबू : मराठी साहित्यातले दोन दिलिपोत्तम!

sakal_logo
By
कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! उद्याचा रविवार मराठी साहित्याच्या चरित्रग्रंथात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवावा लागेल. मराठी साहित्यातले दोन दिलिपोत्तम उद्या रविवारी एकमेकांसमोर (खुर्चीत) बसतील. एक दिलिप दुसऱ्या दिलिपला म्हणेल, ‘‘नमस्कार, मी दिलिप!’’ दुसरा दिलिपही प्रतिनमस्कार करत म्हणेल, ‘‘नमस्कार, अहो, मीसुध्दा दिलिपच!’’ ...पण ते पुढे काय बोलतील? बाय कोलतील? ...मला तर बाई भयंकर उत्कंठा लागून ऱ्हायली आहे.

या दोन दिलिपोत्तमांपैकी एक आहेत अखिल महाराष्ट्र सारस्वताचे लाडके चिमणराव, परमप्रिय आप्पा ऊर्फ श्रीयुत गंगाधर टिपरे वगैरे व्यक्तिरेखांचे शिल्पकार नटश्रेष्ठ आणि लेखकश्रेष्ठ रा. रा. दिलिपभाई प्रभावळकर, आणि दुसरे आहेत मराठी साहित्यमानसात विहरणारे (आणि शनिपाराशी बसून नेमके मोती हुडकणारे) एकमेव ‘राजहंस’ रा. रा. दिलिपराव माजगावकर. होय, फॉर ए चेंज, यावेळी दिलिपभाई मुलाखतकाराच्या खुर्चीत बसून दिलिपरावांना प्रश्न विचारणार आहेत.

ही ऐतिहासिक घटना घडणार आहे मेहेंदळे ग्यारेज (अर्थात पुणे!) जवळच्या मनोहर मंगल कार्यालयात. वेळ सकाळी साडेदहा. अखिल भारतीय प्रकाशक संघाचा जीवनगौरव पुरस्कार यंदा रा. माजगावकर यांना जाहीर झाला आहे.

या पुरस्काराच्या प्रदान सोहळ्यात रा. प्रभावळकर दिलिपभाई त्यांची मुलाखत घेणार आहेत. (वि. सू. : मुलाखतीनंतर जेवणाचा प्रमुख कार्यक्रम होईल!) माझी अशी सूचना आहे की रा. माजगावकर दिलिपराव आणि रा. प्रभावळकर दिलिपभाई यांच्यामध्ये एक (प्रशस्त) टेबल ठेवावे, आणि त्या टेबलाचे खण रा. प्रभावळकर यांच्या बाजूला ठेवावेत! रा. माजगावकर यांच्या उजव्या हाताला खण लागला तर मुलाखत रा. प्रभावळकरांचीच होईल. ‘राजहंस’च्या कचेरीत बसून रा. माजगावकर दिलिपराव खणांची उघडझाप करत आलेल्यांची रीतसर मुलाखतच घेतात, असा अनेकांचा अनुभव आहे. मागे एकदा एक होतकरु आणि धडपड्या प्रकाशक त्यांच्याकडे मार्गदर्शनासाठी गेला. त्याच्याशीही बोलता बोलता (टेबलाच्या खणात हात घालून) माजगावकरांनी त्याला ‘‘अहो, फार सुंदर आहेत तुमचे गठ्ठे खपवण्याचे अनुभव! लिहीत का नाही? चांगलं पुस्तक होईल!’’ असे सुचवून गार केलं होतं म्हणतात. खरं खोटं देव जाणे. रविवारच्या मुलाखतीसाठीही रा. प्रभावळकर दिलिपभाईंनी जबरी तयारी केल्याचं कळलं. कळलेली माहिती अशी की, दिलिपभाईंनी सुधीर गाडगीळ नावाच्या कुण्याएका अट्टल आणि दाखलेबाज मुलाखतकाराला गाठून टिप्स विचारल्या. या गाडगीळगृहस्थाने त्यांना काय सांगावे? म्हणाले की, ‘‘अहो, त्यांना काऽऽही विचारु नका, नुसते ‘विजय तेंडुलकर’ असे दोन शब्द उच्चारले की पुढचं सगळं माजगावकरच बोलतील!’’ असो.

बाकी रा. माजगावकर दिलिपराव आणि रा. प्रभावळकर दिलिपभाई या दोघांचंही मन:पूर्वक अभिनंदन. हे दोघे आहेत, म्हणून मराठी संस्कृतीत (पक्षी : पुण्यात) काहीएक रंग टिकला आहे. दिलिपभाईंचं एक बरं आहे, नाटकवाल्यांना सांगतात की मी जरा लिहितोय! आणि लेखकांच्या कट्ट्यावर सांगतात की मला उद्या शूटिंग आहे! एकंदर माणूस दोन्ही क्षेत्रात दबदबा राखून आहे. सत्कारमूर्ती दिलिपराव म्हंजे तर काय मूर्तिमंत राजहंस. -मुळामुठेच्या पाण्यात विचरण करणारे!! पुन्हा तो नीरक्षीरविवेकाचा राजहंसी गुणही अंगात पुरेपूर मुरलेला. उगीच का प्रकाशनाच्या आभाळात त्यांनी भराऱ्या मारल्या? लॉकडाऊनच्या काळात बाकीचे हंस कलकल कल ध्वनि करित्साते वेगळाले पळाले, पण आमचा हा राजहंस अजूनही नीर आणि क्षीर वेगळी करण्यात निमग्न आहे. तो तसाच राहो.

ज्ञानेश्वर माउलींची क्षमा मागून म्हणत्ये की-

की जैं राजहंसाचे छापणे। जगीं जालिया शहाणे।

म्हणौनी काय कवणे। छापोचि नये?।।

loading image
go to top