हौस ऑफ बांबू : ‘मसाप’मधील काजळमाया!

पंतांच्या गोटाकडील बाजूने उभ्या असलेल्या टिळक रोडवरल्या दुतर्फा उंच-निमउंच इमारतींमधल्या बोळांमधून सूर्यप्रकाश गाळून येत पुढल्या सोप्यावर पसरला होता.
Hous of Bamboo
Hous of BambooSakal

पंतांच्या गोटाकडील बाजूने उभ्या असलेल्या टिळक रोडवरल्या दुतर्फा उंच-निमउंच इमारतींमधल्या बोळांमधून सूर्यप्रकाश गाळून येत पुढल्या सोप्यावर पसरला होता आणि तिथे एका प्लास्टिकच्या खुर्चीवर शून्यपणे बसलेल्या आर्यस्थविर प्रा. जोशी यांच्या अंगावर चाळवत होता.काही महिन्यांपूर्वीपर्यंत मसापचा सोपा भेटायला येणाऱ्या माणसांनी गजबजून गेला असे. त्यामुळे आता सोप्यावर बसलेले असताना, अंधाऱ्या खोलीची एक भिंत पडताच जुन्या कोंडलेल्या वस्तू झगझगीत प्रकाशात अपरिचित दिसाव्यात, त्याप्रमाणे आर्यस्थविर प्रा. जोशी यांना सारे काही नवेच भासू लागले होते…

एका साहित्यिक कार्यास वाहून घेतलेल्या त्रैमासिकाचे विमोचन करुन आर्यस्थविर नुकतेच उन्हातील जीवनसत्त्वे मिळवत बसलेल्या (पुण्याच्या) पेन्शनराप्रमाणे सोप्यावर बसले होते आणि गजघंटिकांच्या दूरवरुन येणाऱ्या अनाहत नादाचा मागोवा घेत होते. तेव्हाच ‘जीएं’च्या आठवणीने त्यांना कडकडून दंश केला. भाल्यावर बोटे आवळून सज्ज असलेल्या योद्ध्याप्रमाणे त्यांचे शरीर ताठच्या ताठ झाले. दहा जुलै आली! आपल्या लाडक्या ‘जीएं’ची जयंती. एरवीचे जग असते तर त्यांच्या जयंतीनिमित्त ‘मसाप’ने निथळत्या उत्साहाने जयंती साजरी केली असती. देशोदेशीच्या साहित्यिकांना पाचारण करुन विचारमंथनाबरोबरच खीरपुरीचे भोजन दिले असते. जीएंच्या साहित्याची मीमांसा करत करत निवृत्त होत जाणाऱ्या निवडक प्राध्यापकांना कार्यास जुंपले असते. परंतु, एका विषाणूने सारेच नासविले. कांच तडकावी आणि उन्हाचे कवडसे वितळून फरशीमध्ये विलीन होऊन जावेत, व छतावरील झुंबराच्या लोलकाचे लक्षावधी तुकडे होऊन त्याचे गारेच्या खड्यांमध्ये रुपांतर व्हावे, तसे झाले.

ढोलीतील साधकाप्रमाणे आर्यस्थविर जोशी सोप्यावर निश्वल बसून राहिले. मराठी आणि ऊर्दू या ‘भाषाभगिनींनी एकमेकांशी स्नेहबंध वाढवले पाहिजेत’ असे जाज्वल्य विचार त्यांनी नुकतेच आपल्या एका (घरगुती) भाषणात व्यक्त केले होते व रक्तवर्णी गरुडाने चोचीमध्ये धरुन ठेवलेली वाटोळी माणके एकेक करुन क्षीरसमुद्रात अर्पण करावीत, त्याप्रमाणे त्यांची विचाररत्ने समुद्रतळाशी जाऊन विसावली होती. ‘माशाल्ला’ अशी दाद देऊन एक विशालकाय देवमासा त्या माणकांना घेऊन खोल, अंधाऱ्या पाण्यात अदृश्य झाला…

तेवढ्यात नगराकडे येत असलेल्या रुंद मार्गावर (खुलासा : रुंद म्हंजे सदाशिव पेठेच्या हिशेबात रुंद!) एक रथ अतिवेगाने (खुलासा : पुण्याच्याच हिशेबात…) येत आहे व त्यावर नीलवस्त्रांकित हंसचिन्हाचा ध्वज फडकतो आहे, हे पाहून द्वारपालांनी ‘मसाप’च्या मुख्य द्वारावरील प्रचंड अर्गल बाजूला केला आणि त्याबरोबर अवजड धातूंच्या दोन लाटांप्रमाणे, त्याचे दोन पक्ष मागे येऊन स्थिर झाले…

आर्यस्थविरांनी नेत्र बारीक करुन पाहिले. कार्यवाहांचा रथ तर नव्हे? प्रश्नच नव्हता. अपेक्षेप्रमाणे कार्यवाह पायगुडे पायउतार होऊन पुढे आले. म्हणाले, ‘‘राजन, साहित्यभूषण, आर्यस्थविरांना वंदन असो. साक्षात सम्राटांचा निरोप घेऊन येण्याचा मान मला मिळतो आहे. येत्या दहा तारखेला ‘जीएं’ची जयंती जाहीरपणे साजरी करावी की करु नये? हा कूटप्रश्न सोडविण्याचे उत्तरदायित्त्व सम्राटांनी आपल्यावर सोडले आहे.’’

त्यावर लाव्हारसाच्या धडकांनी भूमी गुरगुरावी, तसा ध्वनी उमटून जांभळ्या आभाळातील क्षितीजांवर नारंगी रंगाची वीज चमकली आणि आर्यस्थविरांच्या मुखातून शब्द उमटला :

‘‘नको! पोष्टपोन करा!’’

एवढेच.

खुलासा : नअस्कार! दहा जुलैची तारीख आली की माझ्या भाषेला अस्सल धारवाडी कळा येऊ लागत्ये, आणि हे असले काहीबाही लिहून होत्ये…काही नाही, यंदा कोविडमुळे ‘जीएं’ची जयंती ‘मसाप’ तर्फे साजरी केली जाणार नाही, एवढेच सांगायचे होते. त्यानिमित्ताने रसिक वाचकांनी पुन्हा एकदा समग्र ‘जीए’ वाचायला घ्यावा, येवढीच म्या पामरीची इच्छा आहे. इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com