हौस ऑफ बांबू : काही जीए, थोडे जीए, किंचित जीए आणि...डिट्टो जीए! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hous of Bamboo

झगझगीत मोरपिसाऱ्याप्रमाणे फुलारलेल्या क्षितीजावरचा लखलखीत वाटोळा डोळा तोडून त्या निळ्याजांभळ्या पक्ष्याने पंखांची नि:शब्द उघडझाप करत भरारी घेतली.

हौस ऑफ बांबू : काही जीए, थोडे जीए, किंचित जीए आणि...डिट्टो जीए!

झगझगीत मोरपिसाऱ्याप्रमाणे फुलारलेल्या क्षितीजावरचा लखलखीत वाटोळा डोळा तोडून त्या निळ्याजांभळ्या पक्ष्याने पंखांची नि:शब्द उघडझाप करत भरारी घेतली. चोचीमधला निळसर डोळा त्याने अखेर पथिकाच्या तळहातावर ठेवला, आणि म्हणाला, ‘या दिव्यचक्षुनेच तुला पर्वतापलिकडल्या परिसराचा धांडोळा घेता येईल. अन्यथा नाही. या डोळ्यासाठी आजवर अनेकांनी आपले प्राण गमावले, आणि त्यांच्या कलेवरांच्या राखेने आभाळ काळवंडले. तुझीही राख होईल...’ एवढे बोलून त्या महाप्रचंड पक्ष्याने अर्धे आभाळ झाकत पंख पसरले...

नअस्कार! वरला परिच्छेद मीच लिहिला आहे. (गेला ना मूड?) कारण गेले चार दिवस फक्त ‘निळासावळा’ वाचत्ये आहे. ‘निळासावळा’ संपलं की ‘सांजशकुन’, ‘हिरवे रावे’ वगैरे हातात घेणार. माझं बापडीचं असंच असतं. जो लेखक किंवा कवी हाताला लागतो, त्यानंतरचा आठवडा हे असलंच काहीतरी लिहून होतं. ‘काही दिवस लिहू नका’ असा सल्ला डॉक्टरांनी मध्यंतरी दिला होता. त्यांची चूक नव्हती. माझाच कवितांचा एक गुच्छ मी त्यांना अभिप्रायासाठी दिला होता. जाऊ दे.

एकसंब्याचे (ता. चिकोडी) गुरुनाथ आबाजी कुलकर्णी ऊर्फ जीए यांच्या जन्मशताब्दीला गेल्या दहा तारखेला प्रारंभ झाला. त्या निमित्ताने मराठी साहित्यसृष्टीत (पक्षी : पुणे) भरगच्च कार्यक्रम होणार आहेत असं कळतं. जीएंचा जन्म १९२३ सालचा. आज असते तर शंभरीत पदार्पण करते. एवढा अरभाट लेखक (हा त्यांचाच शब्द) मराठीत पुन्हा होणे नाही. जीएंच्या प्रतिमा, रुपकं, छद्मवास्तवाच्या चौकोनी जगात नेणारी त्यांची विलक्षण शब्दकळा हे सगळं मराठी साहित्यात मानदंड होऊन बसले आहेत. जीएंच्या दृष्टांतकथांना कथारुप मानायचं, तर त्या अतिवास्तवाचे रंग दाखवणाऱ्या अमूर्त चित्राचा अवतार घेतात. चित्र मानावं, तर त्यातलं शब्दवैभव वाचकाला खुळं करतं. कल्पनेचं गारुड म्हणावं तर प्रारब्धाची पावलंच त्यातून स्पष्टपणे ऐकू येतात. काहींना त्यांच्या कथा दुर्बोध वाटायच्या. ‘मोठ्या माणसांचा चांदोबा’ असंही त्यांना चिडवलं गेलं.

जीए एकलकोंडे होते. धारवाडच्या त्या कडेमनी कंपाऊंडमधल्या घरात फारसे कोणाला घेत नसत. गॉगल लावल्याशिवाय घराबाहेर पडत नसत. लेखन मात्र बावककशी, त्यांच्याच भाषेत ‘झगझगीत आणि पेटलेल्या अरण्यासारखे तेजस्वी’ होतं. मराठी साहित्याचे प्रांताधिकारी भारत सासणे (साहेब) यांनी ‘जीए अनुवाद किंवा अन्य मार्गे मराठीतून बाहेर जायला हवेत, त्यांची जागतिक ओळख व्हायला हवी’ असा आग्रह धरला आहे. परवा, पुण्यातल्या जीए-जन्मशताब्दी शुभारंभाच्या कार्यक्रमात ते अशाच आशयाचं काहीतरी सांगत होते.

भले! जीए जिथे भाषा-चित्र- रंग- रुपबंधाच्या आवाक्यात सापडू शकत नाहीत, तिथं त्यांच्या साहित्याचा अनुवाद व्हावा तरी कसा? आणि तो करायचा कोणी? जीएंचं साहित्य इंग्रजीत आणायचं म्हटलं तरी कुणीतरी घरी ‘शब्दांचेच धन आणि रत्ने’ असलेला महाभाग निर्माण व्हायला हवा, शेक्सपीअर, हेमिंग्वेच्या तोडीचं इंग्रजीही त्याला अवगत असायला हवं. असा शब्दप्रभू सांप्रतकाळी आणायचा तरी कुठून? सासणेसाहेबांनीच मनावर घेतलं तर बरं!

जीएंनंतर तसलं काहीतरी गूढ, छद्मवास्तवी, सुप्तमनस्वी लिहिण्याचा प्रयत्न मराठीत काहींनी केला. चांगलं लिहिलंही. पण ते जीएंचं नव्हतं. थोडे जीए, ऑलमोस्ट जीए, किंचित जीए आणि डिट्टो जीए बरेच आले आणि गेले. जीए मात्र होते तिथेच आहेत, आणि राहतील. जीए ही वीज आहे. ती मुठीत पकडता येत नाही. आभाळातून पडताना पाहावी, आणि भयचकित व्हावं. शताब्दीच्या वर्षात ही वीज महाराष्ट्रात (बिलाचे तगादे न लावता) खेळवावी, एवढंच आमच्यासारख्या रसिकांचं मागणं आहे.

Web Title: Saroj Chandanwale Writes Hous Of Bamboo 16th July 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..