हौस ऑफ बांबू : विवर्णमालेची वाङमयीन क्लृप्ती! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hous of Bamboo

नअस्कार! माझा वर्ण सध्या काळवंडल्यासारखा झाला आहे. या मराठी वर्णमालेनं मला अगदी विवर्ण करुन टाकलं. मराठी लेखक होणं कुणाला सोपं वाटेल, पण तसं नाही बरं! खूप काही करावं लागतं.

हौस ऑफ बांबू : विवर्णमालेची वाङमयीन क्लृप्ती!

नअस्कार! माझा वर्ण सध्या काळवंडल्यासारखा झाला आहे. या मराठी वर्णमालेनं मला अगदी विवर्ण करुन टाकलं. मराठी लेखक होणं कुणाला सोपं वाटेल, पण तसं नाही बरं! खूप काही करावं लागतं. अनुभवसिध्दतेला प्रतिभेचे पंख मिळाले की उत्कृष्ट साहित्य निर्माण होतं, असं कुणीतरी म्हटलंय. पण हे म्हणणाऱ्याला मराठी वर्णमालेचा इंगा ठाऊक नसणार.

आपल्याला मुगाचे, उडदाचे, पोह्याचे, बटाट्याचे असे खूप प्रकारचे पापड माहीत असतात. मसाला पापडही काही लोक संध्याकाळी चवीने खातात. (पाहा किंवा खा : मसाला पापड…पेपरथिन व्हरायटी ऑफ इंडियन जंक फूड गार्निश्ड विथ कांदा, टमाटे, मिर्चीकोथिंबीर, चाटमसाला एटसेटरा…) पण काही व्याकरणाचे पापडही असतात.

…तर अशा काही मराठीच्या पापडांनी एकत्र येऊन मराठी वर्णमालेत बदल केले आहेत. सरकारने २९ सप्टेंबर २०२१ रोजी भाषा प्रमाणीकरण निश्चितीसाठी समिती नेमली होती. त्या समितीतल्या पापडांनी गेल्या १० नव्हेंबराला नवा जीआर काढला. या जीआर नुसार आता आपल्या मराठीत ५२ वर्ण, ३४ व्यंजनं आहेत. (मला मेलीला तीन-चारच वर्ण माहीत होते- गोरा, निमगोरा, गव्हाळ, आणि उजळ!) वर्ण म्हटलं की काही लोकांना रंग आठवतोच नं? उदाहरणार्थ, ‘माझा वर्ण गोरा आहे!’ (उदाहरणार्थ घ्या म्हटलंय, दात काढून हसायला काय झालं? ) पण व्याकरणात वर्ण वेगळा असतो.

उदाहरणार्थ, काहीही झालं तरी ‘लृ’ हा वर्ण यापुढेही वापरावाच लागेल, असं त्यांनी ठरवलं आहे. वास्तविक ‘लृ’ हा वर्ण फक्त एकाच मराठी शब्दात वापरला जातो. तो म्हणजे ‘क्लृप्ती’! हा शब्द ज्या कुणी शोधून काढला, त्याला *** *** त्याच्या **** फटके ** ****त!! माझ्या मते हा शब्द सरळ ‘क्लुप्ती’ असाच आहे. त्याला ‘क्लृ’ का केला, याचा काहीच ‘क्लु’ मराठी भाषेच्या इतिहासात लागत नाही. ‘क्लृ’ हा वर्णच वापरु नये, अशी एक युक्ती मी सुचवत्ये.‘ञ’ हे सानुनासिकही तसे ‘भञकसच’ आहे. आता ‘चंदनवाले’ असं सरळ लिहिण्याऐवजी कुणी ‘चञदनवाले’ असं लिहिलं तर चालेल्का? वाङमयातला ‘ङ’सुद्धा अनावश्यक आहे, असं काही व्याकरणतज्ज्ञ मानतात. अर्थात संपूर्णच्या संपूर्ण ‘वाङमय’च अनावश्यक आहे, असंही काही लोकांचं मत आहे. साहित्य संमेलनाला कुणी आजवर वाङमय संमेलन म्हटलंय का? मराठी साहित्य परिषद वाङमय परिषद आहे का?

तसेच देठयुक्त ‘श’ आणि पाकळीयुक्त ‘ल’ बाबत म्हणता येईल. इथं मी दोन्ही वर्ण (मुद्दाम) चुकीचे दिले आहेत. ‘श’ आतल्या गाठीचा आहे, तो दंडयुक्त हवा. दंडयुक्त ‘श’ लिहिताना गोल गाठ न काढता शीर्षदंड जरा जास्त खाली ओढायचा की मनाला बरं वाटतं. (बघा ओढून! ) दंडयुक्त ‘ल’ हिंदीतला आहे. तो लोचट वाटतो. तो दोन पाकळ्यांचा काढला, सळसळतो.

वाचकहो, आपल्या मराठीत दोन पाहुण्या वर्णांची वर्णी लागली आहे. इंग्रजीत फारच वॉपरले जॉणॉरे शॉब्द मरॉठीत यॉवेत म्हणून ‘अँ’ आणि ‘आँ’ पण आले आहेत. आता मराठी बाराखडी म्हणायची, चौदाखडी की सोळाखडी? तुम्हीच ठरवा! वर्णमालेचे नवे नियम आल्यामुळे साहित्यिकांचे धाबे दणाणले असून साहित्य संमेलनाला जाऊ पाहणाऱ्या रसिकांनी वर्ध्याची तिकिटं भराभर क्यान्सल करायला सुरवात केल्याचं कळलं. मराठी वाङमयाला विवर्ण करणारी ही क्लृप्ती कोणाची, आँ?