हौस ऑफ बांबू : कुटुंब रंगलंय ग्रंथात…! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hous of Bamboo

नअस्कार! आमच्या (तरुण) पिढीच्या आदर्श आणि सुविख्यात साहित्यिका अरुणाताई ढेरे यांना नुसतं बघितलं तरी कित्ती बरं वाटतं.

हौस ऑफ बांबू : कुटुंब रंगलंय ग्रंथात…!

नअस्कार! आमच्या (तरुण) पिढीच्या आदर्श आणि सुविख्यात साहित्यिका अरुणाताई ढेरे यांना नुसतं बघितलं तरी कित्ती बरं वाटतं. शनवारवाडा, वैशाली, चितळे आणि अरुणाताई हे महाराष्ट्राच्या (पक्षी : पुणे!) सांस्कृतिक वैभवाचे चार आधारस्तंभ आहेत, असं माझं ठाम मत आहे आणि कुणीही कितीही विरोध केला तरी ते बदलणार नाही. यापैकी वैशाली की बेडेकर मिसळ आणि चितळे की काका हलवाई असले किरकोळ पाठभेद मी समजून घेईन एकवेळ, पण शनवारवाडा आणि डॉ. अरुणाताई यांच्याबाबतीत नो काँप्रमाइज!!

डॉ. रा.चिं. ढेरे यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं परवा टिळक रोडवरच्या न्यू इंग्लिश स्कूलच्या गणेश सभागृहात अतिशय हृद्य कार्यक्रम पार पडला. ढेरे सांस्कृतिक संशोधन केंद्रातर्फेच या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. सायंकाळची वेळ होती. नुकताच पाऊस पडून गेला होता. अरुणाताईंच्याच भाषेत सांगायचं तर…

पाऊस हलके हलके पडत राहातो,

पडत राहातो पाऊस झिरमिर गेलेल्या काळावर

निवलेल्या दिवसातून येतात मंद वाफा…

…ढेरेकुटुंबीय पर्मनंटली ग्रंथांच्या सहवासात असतात, हे उभ्या महाराष्ट्राला माहीत आहे. अर्थात हा वारसा अण्णा ढेरेंनीच दिलेला असला तरी या कुटुंबातल्या प्रत्येक सदस्यानं साहित्य आणि संशोधनाच्या क्षेत्रात आपापल्या स्वतंत्र वाटा खोदल्या, हे खरंच. याच ग्रंथलुब्ध कुटुंबातल्या चार सदस्यांची पुस्तकं या समारंभात प्रकाशित करण्यात आली. खुद्द ती. अण्णांच्या ‘शोधन आणि चिंतन’ या पुस्तकाचं प्रकाशन झालं, अण्णांनी लिहिलेल्या प्रस्तावनांचं हे संकलन आहे. तसंच आमचे निष्णात फोटोग्राफर मिलिंददादा ढेरेंच्या ‘दृश्यभान’ या छायाचित्रग्रंथाच्या इंग्रजी अवताराचंही प्रकाशन झालं. आता हे दादा ढेरे फोटोग्राफर आहेत की आघाडीचे ललित लेखक असा प्रश्न कुणाला ‘दृश्यभान’ बघून पडेल. ‘काही वेळा प्रसवाच्या असतात. अनेक प्रवाह वाहत असतात देहामधून. धमन्या तट्ट फुगलेल्या असतात. हे आणि हेच तेवढं खरं असतं…’ असलं काहीतरी अभिजात खानोलकरी लिहून जातात हे दादा ढेरे! यांना कोण नुसतं फोटो काढायला बोलावणार? जाऊ दे, झालं.

अरुणाताईंच्या ‘प्रेमाकडून प्रेमाकडे’ या पुस्तकाचा इंग्रजी अनुवाद (ट्रान्सेंडिंग लव्ह) विनया बापट यांनी केला आहे. त्याचंही प्रकाशन झालं. ढेरेकुटुंबातल्याच वर्षाताई गजेंद्रगडकरांनी लहान मुलांसाठीची पाच पुस्तकं लिहिली आहेत. त्यांचंही प्रकाशन झालं. एकूण काय तर, एकाच मांडवात एकाच कुटुंबातल्या पाव डझन लेखकांची आठ पुस्तकं आवरणातून बाहेर आली! आहे की नाही कमाल? मिलिंद ढेरे हे मुळात फोटाग्राफीत निष्णात. उत्तम फोटो आणि सोबत त्यावर मुक्त चिंतन (चिंतनाला पर्याय नाही..आखिर नामही तो ढेरे है!! ) असं ‘दृश्यभान’चं स्वरुप आहे. त्याचं इंग्रजी भाषांतर शेफाली वैद्य यांनी केले आहे. भाषांतर केल्यानंतरही शेफालीताईंना करमेना! त्यांनी ताबडतोब (सवयीने) त्यावर सोशल मीडियावर पोस्टही टाकली. (त्यालाही पर्याय काय? असो!) ‘‘आयुष्यातही असंच असतं ना, आपण काय मूल्यं, आठवणी, अनुभव जपून ठेवतो, यापेक्षा काय सोडून देतो, हे जास्त महत्त्वाचं असतं. कशावर फोकस ठेवायचा, आणि काय ब्लर करुन सोडून द्यायचं, हे कळणं म्हणजेच आयुष्याचं दृश्यभान!’’ असं त्या पोष्टीत म्हणतात. हे वाक्य वाचून मी इतकी अंतर्मुख झाल्ये की, सगळंच ब्लर झालं…असो.

प्रकाशनानंतर बाकीबाब बोरकरांच्या कवितांचं अभिवाचन करायला प्रा. वीणा देव, प्रमोद पवार आणि समीरा गुजर होते, आणि गायनाला निशा पारसनीस होत्या. एकंदरित संध्याकाळ छान गेली. मनात कविता, आणि बगलेत आठ पुस्तकं घेऊन घरी आल्ये…पाऊस अजून पडतोच आहे!