हौस ऑफ बांबू : मराठी फेस्टिवल सीझन! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hous of Bamboo

नअस्कार! गेली दोन वर्ष ज्याची चातकासारखी वाट पाहात होते, तो डेक्कन लिटरेचर फेस्टिवल आजपास्नं आमच्या पुण्यात सुरु होतोय. मी सुटकेचा नि:श्वास सोडला.

हौस ऑफ बांबू : मराठी फेस्टिवल सीझन!

नअस्कार! गेली दोन वर्ष ज्याची चातकासारखी वाट पाहात होते, तो डेक्कन लिटरेचर फेस्टिवल आजपास्नं आमच्या पुण्यात सुरु होतोय. मी सुटकेचा नि:श्वास सोडला. दोन वर्षापूर्वी याच फेस्टिवलसाठी म्हणून महागडा ड्रेस घेतला होता. काल जाऊन नवा घेऊन आले. (आय हॅड नथ्थिंग टु विअर, यु नो! ) शॉपिंगला निघालेच होते, म्हणून पार्लरमध्येही गेले होत्ये…डेक्कन लिट फेस्टला एवढी तरी तयारी हवीच नं! आता काही जण मला ‘लिट फेस्ट’ म्हंजे काय बुवा? असं विचारतील. त्यांच्यासाठी : लिट फेस्ट म्हंजे लिटरेचर फेस्टिवल. म्हंजे एक प्रकारे साहित्य संमेलनच! मोनिका सिंग नावाच्या एक नामवंत कवयित्री मोठ्या प्रेमानं हा लिट फेस्ट दरवर्षी साजरा करतात. ‘दखनी अदब फौंडेशन’तर्फे होणारा हा सोहळा शनिवार-रविवारी आपल्या बालगंधर्व रंग मंदिरात पार पडणार आहे. ‘डेक्कन लिट फेस्ट’चं आम्हा पुणेकरांना भारी कौतुक असतं. पुणेकर अभिरुची म्हटलं की मंडईती जोशांची मिसळ (किंवा फार्तर बेडेकर), प्रभाचा वडा आणि ‘श्रेयस’ची थाळी यात मामला संपतो, असं काही (मुंबईकरांना) वाटतं. पण त्याकडे दुर्लक्षच केलेलं बरं. पुण्यात मराठी कार्यक्रम सतत होत असतात, पण हल्ली मराठीच्या संवर्धनासाठीही कार्यक्रम व्हायला लागले आहेत. ‘डेक्कन लिट फेस्ट’ मात्र फक्त मराठीपुरता मर्यादित नाही. इथं मराठीसोबत हिंदी आणि इंग्रजीतले साहित्यिक आणि कलावंतही (भारी भारी कपडे घालून) हलक्या आवाजात चांदणे शिंपडत वावरत असतात.

‘मराठीसोबत…’ असं म्हणणं थोडंसं चूकच आहे. कारण इथं मराठीची- समोश्याच्या स्टॉलसमोर कमी उंचीच्या पोराची जशी हातात नोट धरुन धडपड सुरु असते, - तशी अवस्था असते. गेल्या खेपेला जवाहरलाल ऑडिटोरिअम आणि बालगंधर्वला हा लिट फेस्ट झोकात झाला होता. कुमारविश्वासपासून विशाल भारद्वाज, स्वानंद किरकिरे अशी नामचीन मंडळी इथं आवर्जून येऊन गेली आहेत. आपले नटश्रेष्ठ सुबोध भावे (‘अरे, हा तर बालगंधर्व’ फेम) सहभाग नोंदवून गेले आहेत. यंदा किशोर कदम ऊर्फ सौमित्र यांची बहारदार मुलाखत होणार आहे. मुलाखत बहारदार होणार, हे आमचं भाकित आहे. कारण त्याआधी आमच्या सोऽऽ कूल सोनालीताई कुलकर्णींशीही (कॉफी पीत पीत) गप्पांचा घाट घालण्यात आला आहे. कॉफी थंड होणार, याची ग्यांरटी!

याशिवाय मुक्ता बर्वेचं ‘भाई, एक कविता हवी आहे’ हा सध्या गाजणारा कार्यक्रमही होईल. पुल आणि सुनीताबाईंच्या पत्रांच्या अभिवाचनाचा हा कार्यक्रम अतिशय मनोज्ञ आहे. प्रत्येक मराठी रसिकानं एकदा तरी हा कार्यक्रम बघावा, आणि मनात साठवून कायमचा घरी न्यावा! हे कमी पडलं म्हणून की काय, सुविख्यात नाटककार-अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या ‘सर सर सरला’ही प्रयोग ठेवलाय. हे सगळं मिस करणं म्हणजे गुन्हाच! या चुकीला माफी नाही!!

विशेष म्हणजे, महाराष्ट्राचे, पुणेकरांचे आणि त्यातही कोथरुडकरांचे लोकप्रिय पालकमंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते ‘डेक्कन लिट फेस्ट’चं उद्घाटन होणार आहे. अशा फेस्टिवलमधलं वातावरण अगदी इंटलेक्चुअल का काय म्हंटात, तसं असतं. सगळे छॉन दिसत असतात. कॉफीचे कप दर्वळत असतात. सुगंधांच्या झुळका नाकाला सुखावत असतात…आणि हे सगळं जयपूर किंवा डेहराडूनला नव्हे, तर चक्क आपल्या पुण्यात! मराठीचा फेस्टिवल सीझन सुरु झालाय. पाठोपाठ ‘मराठी तितुका मेळवावा’ विश्वसंमेलन मुंबईत होतंय, आणि लगेचच साहित्य संमेलन आणि नाट्यसंमेलन!! पुढले दोन महिने फुर्सत नाही!

…मी निघाल्येय. एण्ट्री फ्री आहे…आगाऊ नोंदणी मात्र हवी!