हौस ऑफ बांबू : मराठीचे धारकरी ऊर्फ एसपीजी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hous of Bamboo
हौस ऑफ बांबू : मराठीचे धारकरी ऊर्फ एसपीजी!

हौस ऑफ बांबू : मराठीचे धारकरी ऊर्फ एसपीजी!

नअस्कार! मराठी भाषेतील पहिला शिलालेखही मराठी भाषेवर अन्याय करण्याबाबतच होता, अशी माहिती पुरातत्त्व खात्याने (इंग्रजीमध्ये) जाहीर केल्याचं मला कुणीतरी मध्यंतरी सांगितलं. ते खोटं असावं! माझ्या मराठीवर शतकानुशतके सतत अन्याय होतोय, हे मात्र अगदी खरं आहे. मराठीची हेळसांड शब्दबद्ध करणाऱ्या किमान दोन डझन कविता मला सांगता येतील. (‘मराठी असे आमुची मायबोली’ ते ‘आपुल्या घरात हाल सोसते मराठी- व्हाया कुसुमाग्रजांचा फटका) प्राचीन मराठी वाङमयात (फारा दिसांनी हा शब्द कामी आला!) मराठी आणि मराठी संस्कृतीबद्दल नाही नाही ते लिहून ठेवलं गेलं आहे. महाराष्ट्रातले लोक ‘अहिमाणे कलहसीले‘ (पक्षी : अहंकारी आणि भांडकुदळ) असल्याचं म्हटलं आहे. कोण म्हणतं आम्ही भांडकुदळ आहोत? जीभेला काही हाड?

पंधराव्या शतकात संतोषमुनि म्हणून एक साहित्यिक होऊन गेले. त्यांनी लिहून ठेवले आहे की-साठीलक्ष देश महाराष्ट्रु । तेथेचि राये शिहाणे सुभटु । वेदशास्त्र चातुर्याची पेठु । भरैली तिये देशी ।। …थोडक्यात तेव्हाही मराठी अस्मिता होतीच! अन्यायाशिवाय अस्मिता कुठून येणार? सारांश, गेल्या कित्येक शतकापासून मराठी आपली सोसत्येच आहे. एखाद्या भाषेनं किती सोशीक असावं, याला काही लिमिट आहे की नाही?

पण आता मात्र परिस्थिती बदलून मराठी ही शतप्रतिशत ज्ञानभाषा होणार हे अगदी नक्की झालं आहे. कारण मराठी भाषेचं आणि बोलीचं जतन, संवर्धन करण्यासाठी स्वतंत्र मंडळ स्थापण्यात आलं आहे. एकदा ही यंत्रणा उभी राहिली की काम फत्तेच!!

आणखी एक मंडळ स्थापून काय होणार असं तुम्ही विचाराल. पण हे साधंसुधं मंडळ नाही बरं! गेली शतकानुशतकं अन्याय सहन करणाऱ्या मायमराठीचा जीर्णोध्दार करण्याची जबाबदारी या मंडळाच्या खांद्यावर येऊन पडली आहे. केंद्र सरकारच्या नव्या शैक्षणिक धोरणानुसार उच्च शिक्षण हे त्या त्या राज्यांच्या राजभाषांमधून दिलं जावं, अशी शिफारस हिंदी भाषेत करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारनं नेमलेल्या डॉ. सुखदेव थोरात समितीने तयार केलेला सुधारित विद्यापीठ कायदा विधीमंडळात नुकताच संमत झाला. त्यात मराठी भाषा जतन, संवर्धन मंडळाच्या स्थापनेची शिफारस होती. ताबडतोब हालचाली झाल्या. कोणी केल्या? मराठीचे धारकरी ऊर्फ बॉडीगार्ड नंबर वन, नन अदर दॅन आपले मराठी भाषामंत्री मा. सुभाष देसाईजी!

(त्यांचं नाव बदलून आता मा. सुभाषाजी देसाई असंच ठेवण्याचा अध्यादेशही निघतोय, असं ऐकलं. असो.) या मंडळावर कोण कोण आहेत? ऐका- या मंडळात प्र-कुलगुरु, राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक , साहित्य संमेलनाचे एक पूर्वाध्यक्ष (प्रत्येकी एक नग), आणि मराठी भाषा, साहित्यासाठी कार्य करणाऱ्या संस्थांमधून कुलगुरूंनी मनोनीत केलेले दोन सदस्य, विभाग प्रमुखाव्यतिरिक्त एक ज्येष्ठतम प्राध्यापक, संलग्न महाविद्यालयातील, कुलगुरूंनी मनोनीत केलेला एक मराठी विभाग प्रमुख आणि मराठी भाषा व साहित्य मंडळ संचालक हा सदस्य सचिव असे सदस्य असणार आहेत.

त्यांच्या नेमणुकाही विजेच्या वेगाने पार पडल्या, असं ऐकिवात आलं. भराभरा कामं उरका आणि मराठी भाषेचं संवर्धन एकदाचं करुन टाका, अशी आम्हा मराठीजनांची आग्रही मागणी आहे. ही समिती म्हंजे मराठीचे धारकरी आहेत! मराठीच्या मारेकऱ्यांना बडगा दाखवणारा स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप म्हणा नं!! या एसपीजीच्या कवचात आपली बिचारी मराठी रुग्णाईतासारखी घेरली गेली आहे. माझ्या मायमराठीला बॉडीगार्डची गरज आहे की डॉक्टरची, हे आता ठरवण्यासाठी कुठली समिती नेमावी बरं?

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top