esakal | हौस ऑफ बांबू : दाढी, मिशी आणि मराठी साहित्य!
sakal

बोलून बातमी शोधा

Hous of Bamboo

हौस ऑफ बांबू : दाढी, मिशी आणि मराठी साहित्य!

sakal_logo
By
कु. सरोज चंदनवाले

नअस्कार! दाढी ही अशी गोष्ट आहे की ती काही न करता वाढते, आणि काही केल्यास कमी (पक्षी : गुळगुळीत) होते. दाढी (किंवा गेलाबाजार मिशी) हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, आणि त्याचा साहित्याशी अर्थाअर्थी काहीही संबंध नाही, असे कुणी म्हणेल. पण त्यांच्या (खुरटलेल्या दाढीयुक्त) तोंडावर उदाहरण फेकण्यासाठीच आम्ही आज हे दाढीपुराण सुरु केले आहे. आज पूजनीय रविंद्रनाथ ठाकुरांची जयंती आहे, हे त्यांनी लक्षात ठेवावे!

ज्यांच्या प्रतिभेच्या काव्यभराऱ्यांमुळे वंगसाहित्य सातासमुद्रापार गेलं, त्या रवींद्रनाथांचं किती साहित्य मराठी वाचकांनी वाचलं असेल? अगदीच तुरळक. तरीही कुठलाही वाचक (मराठी आणि जागतिक) रवींद्रनाथांची छबी मात्र अचूक ओळखेल. हे कशामुळे घडतं? साहजिकच, ज्या साहित्यात दाढीचे महत्त्व अधिक, ते साहित्य दिगंत कीर्तीला जातं, असा निष्कर्ष आम्ही संपूर्ण जबाबदारीनं (व) अभ्यासाअंती काढला आहे. या निष्कर्षाखातर टीकाकार आमची बिनपाण्याने करणार, याचीही आम्हाला कल्पना आहे. पण आम्ही त्याकडे दुर्लक्ष करु. ‘‘सरुताई, आज तुम्ही अचानक ही दाढी का काढलीत?’’ असे कुणी साशंक मनाने विचारीलही, पण आम्ही सरदिंदु बंदोपाध्याय यांच्या रहस्यकथांमधील सत्यान्वेषी नायक ब्योमकेश बक्षी यांच्याप्रमाणे (मिशीतल्या मिशीत) गूढ हसणारदेखील नाही. दुर्लक्षच करु!

नाहीतरी काही कुत्सित लोक (पक्षी : पुणेकर) आमच्या नसलेल्या मिशीबद्दलही काहीबाही बोलत असतात. आम्ही आमचं आडनाव बदलून ‘मिशीवाले’ असं करावं, अशीही एक खुरटी सूचना आमच्या कानांवर मध्यंतरी आली होती. आम्ही असल्या छछोर टीकेकडे ढुंकूनही पाहात नाही. अशा टीकाकारांना मी आधीच सांगून ठेवत्ये की, दाढीचा आणि माझा कुठलाही संबंध नसला तरी, मराठी साहित्याला आता एखादी भरदार दाढीच वाचवू शकेल, याबद्दल माझी खात्री पटत चालली आहे. नुसती मिशी पुरेशी नाही, हे प्रा. नेमाडेसरांना आता कुणीतरी सांगायला हवे!! मिशांच्या मिषाने मोठे होणारे साहित्यिक एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच वाढू शकतात. दाढीचं तसं नाही. चांगली मशागत मिळाली तर थेट हृदयापर्यंत पोचणारी (पक्षी : रुळणारी) ती एक दारुण शुंदोर गोष्ट आहे! मराठी साहित्यात दाढ्या नाहीत, असं नाही. मा. बाबासाहेब पुरंदऱ्यांपासून (व्हाया गोनीदां) मंगेशण्णा पाडगावकरांपर्यंत अनेकांच्या दाढ्या मराठी वाचकांना सुपरिचित आहेत. आणखीही बऱ्याच दाढ्या आहेत, पण आम्ही नावे घेणार नाही. (उगीच कोणाला तरी टोचायची!) परंतु, एकंदरित वंगसाहित्यापेक्षा आपल्याकडे दाढ्यांचे पीक अंमळ कमीच येत्ये, असं आमचं टोकदार निरीक्षण आहे.

मित्रों! बंगालात ‘आशोल पोरिबर्तन’ घडवून आणण्यासाठी भल्या भल्यांना दाढी वाढवावी लागली. पण काही उपयोग झाला नाही. मराठी साहित्यिकांनी मनावर घेतलं तर किमान मराठी साहित्यात तरी ‘आशोल पोरिबर्तन’ घडून येईल, असं वाटतं. सध्या दिवस लॉकडाऊनचे आहेत. हा काळ दाढीवर्धनासाठी अतिशय उपयुक्त ठरावा! हे लॉकडाऊन वगैरे संपलं की वर्ल्डकप टी-ट्वेंटी, उर्वरित आयपीएल यांच्यासोबत अखिल भारतीय साहित्य संमेलनही घेऊन टाकावं. त्या संमेलनाच्या मांडवात भरघोस दाढ्या हिंडाव्यात, मंचावर बसाव्यात. (मधल्या काळात दाढ्या वाढवाव्यात!) असं आमचं एक स्वप्न हल्ली गालावर उगवू लागलं आहे. मिशांची मिरास कमी होऊन दाढ्यांची दादागिरी सुरु झाली की मराठी साहित्यही सातासमुद्रापार पोचेल, अशी खात्री वाटते. तसं घडो! ‘बढती का नाम दाढी, चलती का नाम गाडी’ हे बोधवाक्य मराठी साहित्यिकांनी बिंबवून घ्यावं, हीच रविंद्रनाथांच्या जयंतीदिनी प्रार्थना.