esakal | ढिंग टांग : मम्मा की ममता?
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग

ढिंग टांग : मम्मा की ममता?

sakal_logo
By
ब्रिटीश नंदी

बेटा : (तावातावाने खोलीत येत) ढॅणटढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक!

मम्मामॅडम : (पुढ्यातल्या लॅपटॉपशी खटपट करत ) हंऽऽ..!

बेटा : (बराच वेळ वाट पाहून कानात मोठ्यांदा ओरडत) मम्मा, आयम बॅक! मी आलोय! मैं आ गया हूं…!

मम्मामॅडम : (दचकून) केवढ्या जोरात ओरडतोस? जरा हळू बोल ना!

बेटा : (त्राग्याने) इतका वेळ ओरडून ओरडून सांगतोय की ‘मी आलोय, मी आलोय’ तुझं लक्षच नाही!!

मम्मामॅडम : (मायेने) सॉरी बेटा, कामात बिझी होते नं…म्हणून लक्ष नाही गेलं!

बेटा : (कपाळाला आठ्या पाडत) हल्ली पुन्हा बिझी राहायला लागलीस हं तू! हे बरं नव्हे!!

मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) थोडी आहेत का कामं? ती मलाच निस्तरावी लागणार! दुसरं आहेच कोण?

बेटा : (रागावून) तू रिटायर झाली आहेस ना?

मम्मामॅडम : (संशयानं) कोण म्हणालं असं?

बेटा : (खांदे उडवत) तूच म्हणाली होतीस! की तुझा राज्याभिषेक झाल्यानंतर मी निवृत्त होणार आणि गोव्याला सुट्टीवर जाणार!!

मम्मामॅडम : (खुर्चीत व्यग्रपणे बसत) मला कोण होऊ देणारेय निवृत्त?

बेटा : (घाईघाईनं) मी देतोय ना! आता मी बघतोय की सगळं!

मम्मामॅडम : (कपाळ चोळत) तू बघतोयस, म्हणून तर मला लक्ष घालावं लागतंय बेटा! एरवी मला का रिटायर व्हायला आवडलं नसतं? तुम्हा बहीणभावांच्या हाती पक्षाची सूत्रं द्यायची आणि आपण निवृत्त व्हायचं, असं स्वप्न मी कितीतरी वर्षं बघत होते…नाहीच जमलं!!

बेटा : (कमरेवर हात ठेवून) का नाही जमलं? जमायलाच हवं!! किंबहुना जमायला पाहिजे! जमवल्याशिवाय राहणारच नाही! जमवूच! जमवलंच पाहिजे!!

मम्मामॅडम : (घाबरुन लॅपटॉपकडे पाहात) बाप रे! मला वाटलं की अचानक मुंबईतून मि. ठाकरे ऑनलाइन आले की काय!

बेटा : (काहीश्या नाराजीनं) विरोधी पक्षांमध्ये ऐक्य वाढलं पाहिजे म्हणून मी गेली कितीतरी वर्ष झटतोय! पण कोणीही धड रिस्पॉन्स देत नाही! काही दिवसांपूर्वी मी विरोधी पक्षाच्या खासदारांना ब्रेकफास्टला बोलावलं होतं! म्हटलं, ‘चला, आपण ‘आमलेट पर चर्चा’ करु या!!

मम्मामॅडम : (लॅपटॉपचं इंटरनेट कनेक्शन चेक करत) मग? केली का चर्चा?

बेटा : (निराशेनं) काही नाही, आमलेट खाऊन निघून गेले, चर्चा नाही नि काही नाही!!

मम्मामॅडम : (समजूत घालत) म्हणून या लोकांना ऑनलाइनच बोलवावं! घरचं खा, आणि चर्चा करा, म्हणावं!

बेटा : (एक भिवयी वक्र करत) परवा तुझ्या ऑनलाइन बैठकीला सगळे आले!

मम्मामॅडम : (समाधानानं) त्यांच्यापैकी बहुतेकांना मी बोलावल्याचंच अप्रुप होतं!! काही जण तर म्हणालेसुध्दा की ‘‘मॅडम, तुम्ही कधीही बोलवा, आम्ही येऊ!!’’..(अतिशय खुशीत) कधी नव्हेत ते मि. ठाकरेसुध्दा जॉइन झाले! म्हणाले, येणार म्हंजे येणारच! का नको येऊ? किंबहुना आलोच!! खुखुखु:!!

बेटा : आमच्यासोबत आमलेट खाणार, आणि चर्चा मात्र तुझ्याशी करणार!! धिस इज नॉट डन हं!!

मम्मामॅडम : (दुर्लक्ष करत)...ममतादिदींचाही फोन आला होता, म्हणाल्या, ‘‘ तुम्हीच घ्या पुढाकार, मी आहेच!’’

बेटा : (संयमाचा बांध सुटून) मम्मा, मम्माऽऽ...पण तू रिटायर झाली आहेस नाऽऽ..?

मम्मामॅडम : (भावविवश होत) मम्मा, कधी रिटायर होते का बेटा?

loading image
go to top