ढिंग टांग : एक दिवस, दोन वाढदिवस!

ब्रिटिश नंदी
dhing tang
dhing tangsakal

प्रिय मित्र मा. दादासाहेब यांसी स. न. वि. वि. आणि वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! सकाळी उठून आधी आरशासमोर उभे राहून स्वत:ला शुभेच्छा द्यायच्या, आणि लागलीच तुम्हालाही शुभेच्छा पाठवायच्या असे ठरवूनच काल झोपलो होतो. त्याप्रमाणे शुभेच्छापत्र पाठवत आहे. आंब्याचा सीझन गेला असल्याने पेटी पाठवता आली नाही, त्याऐवजी चांगलीशी अर्धा डझन केळी पाठवत आहे. कृपया ती गोड मानून घ्यावीत. प्रिय दादासाहेब, आपल्याला प्रत्यक्ष भेटून अभीष्टचिंतन करता आले असते तर फार्फार बरे झाले असते. तसे मी आमच्या पक्षनेत्यांकडे बोलूनही दाखवले होते.

‘‘दादासाहेबांच्या वाढदिवसाच्या अभीष्टचिंतनाची होर्डिंगे आपण पुण्यामध्ये आपल्या पक्षातर्फे लावू या का?’’ अशी विचारणा आमच्या मा. चंदूदादांनी केली होती. मा. चंदूदादा हेही आमचे दादाच आहेत, आणि तेही (हल्ली) पुण्यालाच असतात! पण अर्थात महाराष्ट्रातल्या राजकारणातले ओरिजिनल दादा तुम्हीच! ‘एकच दादा, विकासाचा वादा’ हेच खरे!! वाढदिवस एकाच दिवशी येत असल्याने, तुमची आणि माझी छबी एकाच होर्डिंगवर झळकावली तर जागा, पैसे, वेळ आणि विशेषणे यांची बचत होईल, अशी मा. चंदूदादांची कल्पना होती. परंतु, तसे घडू शकले नाही. परिणामी पुण्यात एकाच चौकात आपल्या दोघांचीही वेगवेगळी होर्डिंगे झळकत आहेत.

प्रिय दादासाहेब, आपले पक्ष वेगळे आहेत, विचारधाराही वेगवेगळी आहे. तरीही हृदये आणि वाढदिवस मात्र एकच आहेत. दीडेक वर्षापूर्वी नोव्हेंबरातील एका थंडगार, रम्य पहाटे आपण समुद्रकिनारी (पक्षी : राजभवनावर) भेटलो होतो, ते आठवते का? पहाटेच्या काळोखात आपण दोघांनीही महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी शपथ घेतली होती, ते आठवते का? परंतु, नंतर सगळेच ग्रह फिरले! येणारे गिऱ्हाईक बिल न देताच सामान घेऊन गेल्यावर किराणा मालाच्या दुकानदाराला जो मनस्ताप होतो, तोच आम्हाला झाला. असो. आपण पुढल्या वर्षी वाढदिवसाला महाराष्ट्रभर एकत्र होर्डिंगे लावायची का? कृपया कळवावे. पुन्हा एकदा शुभेच्छा. हॅप्पी बर्थ डे.

आपला पहाटेचा मित्र. नानासाहेब फ.

आ. नानासाहेब, तुम्हालासुद्धा वाढदिवसाच्या शुभेच्छा. हे शुभेच्छापत्र पोचवणाऱ्या इसमाकडे ते परत द्यावे किंवा फाडून टाकावे. मला कुठलीही नवी कटकट नको आहे. वाढदिवसाचा मेसेज व्हाटसअपवर पाठवावा, असे मला सुचवण्यात आले होते, पण तुम्ही तो मेसेज दुनियाभर व्हायरल कराल, आणि नसते महाभारत सुरु होईल, अशी भीती वाटल्याने ते मी टाळले. माझा आणि तुमचा वाढदिवस एकाच तारखेला येतो, हा निव्वळ योगायोग आहे. त्याचे कृपया राजकारण करु नये. मी ६२ तर तुम्ही ५२!! मी बारामतीचा, तुम्ही नागपूरचे. मी राष्ट्रवादी, तुम्ही कमळवाले! उगाच काहीतरी वडाची साल पिंपळाला लावायची, आणि राजकारण करत बसायचं हे आपल्याला मान्य नाही.

पहाटे समुद्रकिनाऱ्यावर आपण भेटलो, असे तुम्ही म्हणता. हे कधी घडले? मला तर काही म्हणता काहीही आठवत नाही! स्मरणशक्तीला कितीही जोर दिला तरीही आठवत नाही. याचा अर्थ ती सगळी घटनाच कपोलकल्पित असली पाहिजे. जाऊ दे. पुण्यात आणि अन्य काही ठिकाणी आपल्या वाढदिवसाची वेगवेगळी होर्डिंगे लागली आहेत. ती तशीच लागूदेत. संयुक्तपणे होर्डिंग लावण्याची काहीएक गरज नाही. त्यासाठी वेळ पडली तर मी वाढदिवसाची तारीख बदलून घेण्यास तयार आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा पुन्हा देतो. बाकी ठीक. कळावे.

आपला दादासाहेब बारामतीकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com