esakal | ढिंग टांग :…गतीसी तुळणा नसे!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : …गतीसी तुळणा नसे!

ढिंग टांग : …गतीसी तुळणा नसे!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी न्यूज नेटवर्क

‘‘शंभर लाख कोटी?,’’ असे ओरडून आम्ही निपचित पडलो. ‘फट’ असा ध्वनि होऊन गुरुत्वाकर्षणाच्या बंधनातून मुक्त होत्साते आम्ही आपापत: तरंगत छताशी पोचलो. खालील बाजूस आमचेच शरीर निश्चेष्ट पडलेले होते. ‘‘त्यांचीच चप्पल हुंगवा, आत्ता उठतील!’’ कुणीतरी म्हणाले.

‘‘कांदा आणा, कांदा!’’ आणखी कुणीतरी म्हणाले.

‘‘कांदा आणा काय? श्रावण सुरु आहे..,’’ माजघरातून परिचित आवाज आला. ‘‘गेला क काय?’’ कमरेवर हात ठेवून कुणीतरी शंका काढली. ‘‘क्काय! गेले? मेलो!!...म्हंजे माझे पाच हजारसुध्दा गेले! उसने घेतले होते पहिल्या लाटेत!’’ हा शेजारच्या अण्णाचा आवाज, आम्ही (छतावरुन) ओळखला. महाकद्रू आणि खोटारडा माणूस! पाचशेचे पाच हजार केले फटक्यात!! पुढेमागे संधी मिळाल्यास अण्णाच्या मानगुटीवर बसण्याचा बेत आम्ही आखू लागलो.

तेवढ्यात कुणीतरी दाराशी जाऊन त्यातल्या त्यात झिजलेली, कळकट चप्पल आणली. कां कुणास ठाऊक, पण कुणीही पायताण हातात घेतले की आमचे ऊर धडधडते. ‘‘झालं काय होतं नेमकं? हार्ट्याट्याक तर नाही?’’ कुण्या संवेदनशील शेजाऱ्याने विचारणा केली. ‘‘ ह्याला आणि हार्ट्याट्याक? नाव सोडा!’’

अण्णांना पाच हजाराचा धक्का बहुधा ज्यास्त जोरात बसला असावा. ‘‘ काही नाही हो! टीव्हीवर मोदीजींचं भाषण ऐकत नेहमीप्रमाणे रिकामटेकडे बसले होते, अचानक ‘शंभर लाख कोटी?’ असं ओरडून शुध्दच हरपली हो!’’ घरच्या मंडळींनी ब्रेकिंग न्यूज दिली. इथे आमचा विषय बाजूला पडला, आणि मोदीजींनी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गतिमान भारत योजनेची चर्चा सुरु झाली.

‘‘अहो, गेली तीन वर्षं ही फोकनाड ऐकतोय! त्यात हार्ट्याट्याक येण्यासारखं कायाय?’’ पलिकडले शेजारी आप्पा पिढ्यानपिढ्या कांग्रेसवाले आहेत. कां? तर त्यांचे तीर्थरुप कांग्रेसवाले होते, आणि रा. राहुल गांधी पुण्यात आलेले असताना ऐन गर्दीत त्यांच्याकडे बघून गोड हसले होते, म्हणे! ‘‘पण शंभर लाख कोटी हा आकडा जरा काहीच्या काहीच आहे हो! गतिमान भारत योजना कसली? सद्गतीमान योजना आहे ही! थेट मोक्षच! कविमनाचा एखादा माणूस धक्क्यानं जायचा असाच!’’ कुणीतरी सहानुभूतीचे उद्गार काढले.

‘‘हा आणि कविमनाचा? हु:!!’’ इति अण्णा. पुढेमागे याला घोळसण्याचा आम्ही तिथल्या तिथे निर्धार केला. नाही, एखाद्याचे पाश्शे घेतलेही असतील आम्ही. परिस्थिती सगळ्यांनाच असते. पण जगलो वाचलो तर परत केलेच असते ना…कदाचित? ‘‘शंभर लाख कोटी म्हंजे शंभरावर किती शून्य हो?’’ कुणीतरी गणिती प्रश्न उपस्थित केला. ‘‘मला वाटतं, बारा…बाराच!’’ दुसऱ्या कुण्या शेजाऱ्याने उत्तर दिले.

‘‘शंभरावर बारा नाही, एकावर बारा!’’ कुणीतरी चूक सुधारली. शंभरावर बारा की एकावर बारा शून्ये! काय फरक पडतो? की फर्क पईंदा? ‘‘येवढे पैसे भारताच्या उभारणीसाठी खर्च होणार आहेत, मिस्टर!’’ कुणीतरी म्हणाले.

‘‘छ्या! इथं फद्या नाही खिशात दातावर मारायला! शंभर लाख कोटी म्हणे!’’ आणखी कुणीतरी शंका काढली. ‘‘ऐकायला बरं वाटतं ना, मग झालं तर…तेवढीच त्याची किंमत!’’ हातात पायताण घेत घरची मंडळी म्हणाली. चप्पल हातात घेऊन त्या आमच्या निश्चेष्ट देहाकडे चाल करुन येत असतानाच पुन्हा ‘फट’ असा ध्वनी होत्साते आम्ही गतिमानपणे आमच्याच कुडीत घुसलो.

‘‘ उठा, काय मेली ही तऱ्हा-’’ एवढं म्हणत मंडळी माजघराकडे वळली. गर्दी पांगली. आम्ही उठून बसलो. पुनर्जन्म म्हणतात, तो हाच असावा. मोदी है, तो मुमकीन है!

loading image
go to top