esakal | ढिंग टांग : बाटल्या कुणाच्या?
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : बाटल्या कुणाच्या?

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

कृपावंत हॉनरेबल डिअर होम्मिनिष्टर, यांसी गोपनीय लेटर सविनय सादर. लेटर लिहिनार नामे बबन फुलपगार पो. ह. बक्कल नं. १२१२ कदकाठी पाच फू साडेसहा इं, वजन ४६, उजव्या गालावर मस, जाहीर करतो की सदरील निवेदन निशापाणी न करता लिहिले असे.

अर्जंटमधे अर्जंट निवेदन करणेचे कारण कां की, राज्यात कायदा-सुव्यवस्थेची सिच्युएशन सिरिअस आहे. त्याचे झाले असे की, ता. १० माहे ऑगष्ट रोजी मी मंत्रालय परिसरात कर्तव्यावर असतावेळी सदरील घटणा घडली. डूटीवर एका हातात दांडू, दुसऱ्या हातात बॅटरीचा टॉर्च आणि तोंडात शिट्टी असा मी राऊण्डला गेलो असतावेळी मंत्रालयाच्या आवारात उत्तर दिशेला सुप्रशिध्द त्रिमूर्तीच्या स्टॅच्यूच्या पुतळ्यामागे (जरा कोपऱ्यात) चोवीस कदमांवर संशयास्पद वस्तू दिसून आली. ब्याटरीचा टॉर्च मारुन पाहिले असता दारुच्या बाटल्या निष्पन्न झाल्या. मंत्रालयाच्या आवारात बाटल्या आढळून आल्या हे फारसे गंभीर नाही, पण त्या रिकाम्या आढळून आल्या हे जास्त गंभीर आहे!!

दारुच्या बाटल्या असल्याचे मी वरिष्ठांच्या काणांवर घातले. (खुलासा : फौजदार उंदिरमारे हा अत्यंत कंडम मनुक्ष आहे. मला छळ छळ छळतो. स्वत: जीपमधी बसून राहातो व आम्हाला पुढे पाठवतो. त्याची ट्रान्सफर करावी, ही रिक्वेष्ट आहे...) वरिष्ठांचे डोळे चमकले. त्यांनी मला ‘मुद्देमाल घेऊन येण्यास’ फर्मावले. मी नकार दिला. पंचनाम्याशिवाय मुद्देमालाला हात लावने नियमबाह्य आहे, याची मी विणम्रपने आठवन करुन दिली. त्यामुळे त्यांचे डोळे लालेलाल झाले. ‘वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करणेच्या कामी कुचराई केल्याबद्दल डिपार्टमेंट कारवाई करीन’ अशी धमकी त्यांनी मला दिली. तथापि, सदरील बाटल्या रिकाम्या आहेत, हे कळल्यावर त्यांना माझे म्हणणे ताबडतोब पटले. ‘‘बबन, कुछ तो गडबड है...कुणाचं काम आसंल?,’’ येक डोळा बारीक करुन फौजदार उंदिरमारेने विचारले. तो स्वत:ला ‘सीआयडी’ इन्स्पेक्टर प्रद्युम्न समजतो. मागल्या टायमाला मंत्रालयात उंदिर फार झाले होते, तेव्हा फौजदारसाहेबांनी एकट्याने (लढून) चाळीस उंदरांचा पुरावा सादर करुन आपले आडनाव सार्थ केले होते.

फौजदारसाहेबांचा आदेश मानून मी पुढील तपासकाम हाती घेतले. मंत्रालयातील काही कंत्राटी कामगारांनी पार्टी केली असावी, असा प्राथमिक अंदाज बांधण्यात येत आहे. हल्ली बाहेरचा माहौल लॉकडाऊनमध्ये टाइट आहे. काही बार मागल्या दाराने चालू आहेत तर, बरेच बार बंद आहेत. अशा परिस्थितीत लोक सार्वजणिक ठिकाणी मद्यपान करु लागल्याचे आढळून येत आहे. अशा अनेकांना आम्ही राऊण्डपमध्ये अंदर केले आहे. परंतु, मंत्रालयात सर्वात ‘सेफ’ जागा असेल असे वाटून काही जणांनी येथेच बैठक जमवली असे वाटते.

मी रिपोर्टिंग केले ते असे : आणणाऱ्याने भरलेल्या बाटल्याच आणल्या असणार, हिते गुन्ह्याच्या ठिकाणी रिकाम्या केल्या असणार. बाटल्यांबरोबर पलाष्टिकच्या फाटक्या पिशव्या आढळून आल्या असून त्याला चकलीचे कण, आणि तळलेली चणाडाळ चिकटल आहे, त्याअर्थी चकणाही आणण्यात आला असणार. सबब, सदरील ठिकाणी गटारी साजरी झाल्याचे पुरावे प्रथमदर्शनी आढळून आले असून अधिक तपास चालू आहे...

मी दिलेला रिपोर्ट कचऱ्याच्या टोपलीत टाकून फौजदार उंदिरमारे म्हणाले, ‘‘मारो गोली, आता तपास थांबवा, या विषयावर चौकशी समिती बसली आहे!’’

साहेब, ही समिती कुठे बसली आहे, कळेल का?

आपला नम्र व कर्तव्यदक्ष सेवक. बबन फुलपगार. (ब. नं. १२१२)

loading image
go to top