esakal | ढिंग टांग : नवा स्वातंत्र्य दिन!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : नवा स्वातंत्र्य दिन!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

माझ्या महाराष्ट्रातल्या तमाऽऽम बंधूंनो, भगिनीन्नो आणि मातांनो, सर्वप्रथम तुम्हा सर्वांना नव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा. आश्चर्य म्हणजे जुना स्वातंत्र्य दिन, म्हंजे १५ ऑगस्ट आणि नवा स्वातंत्र्य दिन एकाच दिवशी येत आहेत. हा नवा स्वातंत्र्य दिन फक्त याच वर्षीपुरता साजरा करायचा आहे. दरवर्षी करायची पाळी येऊ नये!! नाही, नाही, मी काही तुम्हाला त्यादिवशी थाळ्या-बिळ्या वाजवायला सांगणार नाही की मेणबत्त्या पेटवायची सक्ती करणार नाही. जरा अधिकची काळजी घ्या एवढंच सांगेन.

आज मी अतिशय महत्त्वाची बातमी देण्यासाठी तुमच्यासमोर आलो आहे. हो, महत्त्वाचीच. निश्चितच महत्त्वाची. किंबहुना अतिशय महत्त्वाची. खरं तर आनंदाचीच बातमी म्हटलं पाहिजे. पण नाही म्हणणार. माझ्या महाराष्ट्रातली जनता गेले काही महिने जो त्रास भोगतेय, तो बघितल्यानंतर...जाऊ दे. बोलण्यासारखं बरंच काही आहे. पण कुठून सुरवात करायची? असं मी आज विचारणार नाही. नाहीच विचारणार. का म्हणून विचारु? सध्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे नैसर्गिक संकटांमध्ये खूप वाढ झाली आहे. पूर येतायत, दरडी कोसळतायत. ध्रुवीय प्रदेशात हिमनद्या वितळायला लागल्या की असं होतं...नाही नाही, कृपया च्यानल बदलू नका! या हवामान बदलामुळेच संसर्गजन्य साथींचं प्रमाण वाढीस लागणार आहे, असं डब्ल्यूएचओनं म्हटलंय. त्यांना मीच सांगितलं. मी त्यांचा सल्लागार आहे.

...तर येत्या नव्या स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर तुम्हा-आम्हा सर्वांना मोकळीक मिळणार आहे. इच्छा नसताना मला तुमच्यावर निर्बंध लावावे लागले. साधं मॉल किंवा दुकानात जाणं मुश्किल झालं. पण आता तुम्ही पहिल्यासारखा चक्क श्वासोच्छ्वास करणार आहात! पहिल्यासारखं हॉटेलात बसून मिसळबिसळ खाणार आहात! मॉलमध्ये जाऊन कपडे खरेदी करु शकणार आहात. त्याची ट्रायलसुध्दा घेऊ शकणार आहात. मॉलमध्ये कोणीही टाइमपासला जाऊ नये, एवढीच विनंती आहे!

नव्या स्वातंत्र्यदिनापासून उपनगरी रेल्वेगाडीत तुम्हाला विंडोसीटवरुन एकमेकांशी भांडण्याची मोकळीकही देण्यात आली आहे. -पण लांबून भांडा! एकमेकांच्या हातावर सॅनिटायझरचे दोन थेंब टाकून मग हात उगारा! एवढी काळजी घ्यायलाच हवी. अगदी खरं सांगायचं तर मला ही मोकळीक द्यायची इच्छा नव्हती. कोरोनाची तिसरी लाट दार ठोठावतेय...हो, ठोठावते आहेच. बेल वाजवून झाली, कडी वाजवून झाली, आता ठक ठक चालू आहे. मला स्पष्ट ऐकू येतेय. पण मी दार उघडणार नाही म्हंजे नाही, असं ठणकावून सांगत होतो. एकदा तोंडावर दार आपटून बंद केलं की ते कायमचंच, हा माझा कडक स्वभाव आहे. एक तर दार बंद करायचंच नाही, आणि केलं तर मग जाम उघडायचं नाही, असा आपला खाक्या आहे. मोकळीक दिली तर कोरोनाची तिसरी लाट आनंदानं उड्या मारत आपल्या अंगावर येईल, हे मला दिसतंय. पण सगळे ओरडायला लागले, ‘‘उघडा, उघडा, उघडा!’’ अरे, उघडा काय उघडा? तो काय शेंगदाण्याचा डबा आहे का, येता जाता उघडायला? पण लोक अगदीच घायकुतीला आले. म्हणाले, ‘‘पोटात काटे घालू का?’’ त्यांना माझं सांगणं आहे, ‘‘आपलं शिवभोजन काय वाईट आहे?’’

तेव्हा काळजी घ्या, आणि नवा स्वातंत्र्य दिन काळजीपूर्वक साजरा करा. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा आणि सुरक्षित अंतर पाळा. जय महाराष्ट्र.

(टिप : वरील मजकुराचा कागद आम्हाला मुंबईत बांदऱ्याच्या सिग्नलशी बोळावस्थेत सांपडला. नावगाव काही नाही.)

loading image
go to top