esakal | ढिंग टांग : एक डाव भुताचा!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : एक डाव भुताचा!

sakal_logo
By
- ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री महाल, वांद्रे बु. वेळ : अवेळ!

पात्रे : राजाधिराज उधोजीराजे आणि संजयाजी फर्जंद.

....

उधोजीराजे : कोण आहे रे तिकडे? ...छे! या महालात एक गोष्ट जागेवर सापडेल तर शपथ!!

संजयाजी फर्जंद : (खोलीत येत नाटकीपणाने) ...ड्यूटीवर आहे महाराज!

उधोजीराजे : (नापसंतीने) मुजरा राहिला फर्जंद! गेले काही दिवस शोध शोध शोधतो आहे, हवी असलेली एकही गोष्ट सांपडत नाही, या महालात! नॉन्सेन्स!!

फर्जंद : (दातात काडी घालत) काय शोधताय?

उधोजीराजे : ...आम्ही एक महत्त्वाची फाइल शोधत आहो! कुठे गहाळ झाली कुणास ठाऊक!

फर्जंद : (शहाजोगपणे) ती बारा नावांची फाइल शोधत आहात का महाराज?

उधोजीराजे : (गादी उचलून बघत) ...तीच ती! आणखीही बऱ्याच फायली गायब आहेत!

फर्जंद : (खुलासा करत) ती फाइल राजभवनावर पाठवली होती ना महाराज?

उधोजीराजे : (शोधाशोध चालूच ठेवत) तिथूनही ती गहाळ झाल्याचं कळतंय फर्जंदा! ‘घरीच शोधा, सापडेल’, असा निरोप आलाय तिथून!

फर्जंद : महाराज, माझं ऐका, तुम्ही शांतियज्ञ करा!!

उधोजीराजे : (हेटाळणीच्या सुरात) कॅय?

फर्जंद : (शांतपणे) शांतियज्ञ! म्हंजे होम ऑफ पीस!!

उधोजीराजे : (कळवळून) होम ऑफ पीस?

फर्जंद : (मांत्रिकाच्या सुरात) ...हा भुताटकीचा प्रकार आहे, महाराज! वस्तू गायब होणं, पहाटे सावल्यांच्या हालचाली दिसणं असले प्रकार इथं वाढले आहेत सध्या!! गेल्या अमावास्येला-

उधोजीराजे : (घाईघाईने) हॅ:!! आमचा नाही विश्वास असल्या भंपक गोष्टींवर!

फर्जंद : (खांदे उडवत) ऱ्हायलं! पण मी म्हणतो म्हणून शांतियज्ञ करुन घ्या, महाराज! त्यामुळे काही त्रस्त समंध शांत होतील, आणि हे असले भुताटकीचे प्रकार थांबतील!

उधोजीराजे : (डोळे मोठे करत) भुताटकी?

फर्जंद : (सहजपणे) येस! भुताटकीच!!

उधोजीराजे : (पुटपुटत) अस्य श्रीरामरक्षास्तोत्रमंत्रस्य... बुधकौशिकऋषी... श्रीसीतारामचंद्रोदेवता:...! राम राम राम राम... न्यम न्यम न्यम न्यम...!!

फर्जंद : मला काही म्हणालात महाराज?

उधोजीराजे : (ओठांना कोरड पडल्यासारखे) रामरक्षा म्हणतोय रे! तूदेखील म्हण!!

फर्जंद : (अतिशय गूढ आवाजात) अण्णा इलेऽऽ...गेलीऽऽ...! रात्रीस खेळ चाले, हा गूढ चांदण्याचा, संपेल ना कधीही... हा खेळ सावल्यांचा!!

उधोजीराजे : (उठून खिडकी लावून घेत) हॅ:!! फालतू अंधश्रद्धा पसरवू नका! आपल्या राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा आहे, हे माहीत आहे ना, फर्जंदा?

फर्जंद : (खांदे उडवत) ऱ्हायलं!

उधोजीराजे : (स्वत:लाच धीर देत) हे कल्याणकारी राज्य आहे! इथे भुताखेतांचा वावर असूच शकत नाही! वाडवडलांच्या पुण्याईवर आणि जनतेच्या आशीर्वादावर उभ्या असलेल्या या कल्याणकारी राज्यात पापात्म्यांना थारा नाही! कळलं? असल्या अफवा पसरवणं बंद करा!

फर्जंद : एका चेटूक करणारीनं ही करणी केली आहे, महाराज! तिनं एक डाव भुताचा टाकला ना, तर...तर...

उधोजीराजे : तत...पप...तर काय होईल?

फर्जंद : (निर्वाणीचा सल्ला देत) फार महागात जाईल!! हे राजकारणाचं भूत आहे, सहजासहजी बाटलीत भरता येणार नाही, महाराज!!

उधोजीराजे : (विचारपूर्वक) माझा असल्या अंधश्रद्धांवर विश्वास नाही! पण तुम्ही सगळे म्हणत असाल तर करून टाकू शांतियज्ञ... कसं काय?