esakal | ढिंग टांग : यात्रेचा खतरा!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : यात्रेचा खतरा!

sakal_logo
By
-ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे बुद्रुक.

वेळ : रात्रीच्या टीव्ही मालिका वगैरे संपल्यावर...!

चि. विक्रमादित्य : (दारावर टकटक करत) हाय देअर, बॅब्स... मे आय कम इन?

उधोजीसाहेब : (कानटोपी चढवताना थबकून) नको! सुरक्षित अंतर पाळा, नाहीतर पुन्हा लॉकडाऊन लावीन! गुड नाइट!!

विक्रमादित्य : (दार ढकलून बिनधास्त आत येत) कमॉन बॅब्स, तुम्ही दरवेळी लॉकडाऊनची धमकी देऊन आम्हाला गप्प बसवता! इथे महाराष्ट्रासमोर कितीतरी अर्जंट कामं उभी राहिली आहेत, ती कोण पूर्ण करणार?

उधोजीसाहेब : (हात झटकत) जगातली सगळी अर्जंट कामं दिवसा कार्यालयीन वेळेत करता येतात!

तू झोपायला जा बघू!

विक्रमादित्य : (स्वप्नाळू मूडमध्ये) बॅब्स, मुंबईला तापमानवाढीचा प्रचंड धोका निर्माण झाला आहे! सबब, मला मुंबईचं तापमान ताबडतोब खाली आणायचं आहे! कुछ करना पडेगा!!

उधोजीसाहेब : (समजुतीच्या स्वरात) मला त्याची कल्पना आहे, पण ते काय एका रात्रीत होणारं काम आहे का? त्यासाठी बोरिवलीचं जंगल वाचवायला हवं! नवीन जंगल वाढवायला हवं! झालंच तर, वाहनांच्या प्रदूषणामुळे भयंकर परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यावर उपाय काढायला हवा!! चिक्कार कामं आहेत, पण ती सगळी नऊ ते पाच या कार्यालयीन वेळेत होतील! जा आता!!

विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत) करेक्ट! वाहनांचं प्रदूषण इज ए बिग हेडेक! म्हणूनच मी मुंबईकरांसाठी आता समुद्रकिनारी सायकल ट्रॅक तयार करतोय! फ्रॉम बांद्रा फोर्ट टु माहीम फोर्ट!!

उधोजीसाहेब : (खोल आवाजात) बाप रे! मागल्या खेपेला गिरगावच्या चौपाटीजवळ ओपन जिम उभा केला होतास, त्याचं काय झालं, ते आठव!!

विक्रमादित्य : (तळमळीनं) मुंबईकरांच्या तब्बेतीची मला काळजी आहे, बॅब्स! यापुढे लोकांनी सायकलवरुनच रपेटी कराव्यात! मुंबईतल्या सगळ्या मोठ्या रस्त्यांसोबत मी सायकलींसाठी वेगळा ट्रॅक तयार करणार आहे! त्यामुळे मुंबईकरांची आणि मुंबईची फुफ्फुसं बळकट होतील!

उधोजीसाहेब : (निक्षून सांगत) मी सायकलवरुन मंत्रालयात जाणार नाही म्हंजे नाही, आधीच सांगून ठेवतो!!

विक्रमादित्य : (उजळलेल्या सुरात) बॅब्स, मी आज रक्षाबंधनासाठी वरळीच्या बीडीडी चाळींमध्ये जाऊन आलो! तिथंही मी सायकल ट्रॅक करायचे आदेश देऊन आलोय! हाहा!!

उधोजीसाहेब : (खांदे पाडून) सायकल रस्ते बांधा, बगिचे तयार करा, कारंजी उडवा... काहीही करा! पण गर्दी करु नका, म्हंजे झालं!!

विक्रमादित्य : (ठामपणाने) दॅटस द पॉईंट!! लोक सायकल वापरायला लागले की मोटारी कमी होतील! मोटारी कमी झाल्या की प्रदूषण कमी होईल! प्रदूषण कमी झालं की गर्दी कमी होईल!

उधोजीसाहेब : (बुचकळ्यात पडून) प्रदूषण कमी झाल्यावर गर्दी कशी कमी होईल?

विक्रमादित्य : (टाळीसाठी हात पुढे करत) सो सिंपल! जिथे गर्दी, तिथे प्रदूषण हे खरंय ना? मग प्रदूषण कमी केल्यावर आपोआप गर्दी कमी नाही का होणार?

उधोजीसाहेब : (संयमानं) हे बाहेर बोलला नाहीस ना?

विक्रमादित्य : (स्वप्न बघत) मला काहीही करुन महाराष्ट्राचं पर्यटन वाढवायचं आहे, बॅब्स! लोकांची यात्रा सुकर व्हावी म्हणून मी झटतोय!! त्यासाठी मला जनांचा आशीर्वाद हवा आहे! काढू का मी पण यात्रा?

उधोजीसाहेब : (कर्तव्यकठोरपणाने) खामोश! जनआशीर्वाद यात्रेचं नाव काढू नकोस! हे यात्रा प्रकरण फार वाढलं तर, सरळ पुन्हा लॉकडाऊन लावीन! कळलं?

loading image
go to top