ढिंग टांग : बढती का नाम दाढी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : बढती का नाम दाढी!

नमो नमः ...दाढी हा गंभीर विषय आम्ही आज निरुपणासाठी घेतला आहे. अधूनमधून तो कुरवाळावा, असाच आहे. कुणी म्हणेल की (मध्येच) हा दाढीचा विषय कशाला निष्कारण ओढता? तो प्रत्येकाचा शतप्रतिशत खाजगी मामला आहे. पहिल्या लॉकडाऊननंतर आम्ही एका नातलगांस ‘व्वा, बरीच वाढली की दाढी!’ असे सहज म्हणालो, तर पायताणाने आमच्या डोकीवरचे केस काढण्याचा जाहीर कार्यक्रम पार पडला. चूक आमचीच होती. दाढी वाढल्याचे कौतुकोद्गार आम्ही ज्या व्यक्तीविषयी काढले, ती आमची आत्त्या निघाली! असो.

दाढी वाढविणारी आणि राखणारी व्यक्ती विरागी वृत्तीची असते. ‘इदं न मम’ या भावनेनेच ते जीवितकार्य पार पाडत असतात. भारीतले जोडे, फैनाबाज गॉगल, डोईवर अव्वल टोपी, आणि उभय गालांवर दाढीचे कुरण अशा व्यक्तिमत्त्वाकडे बघून आदरयुक्त भाव उत्प्रेरित होतात. काही ख्यातनाम उद्योजक अशा पेहरावात भारतातील ब्यांका बुडवून परदेशी पळून गेले. तेही विरागी वृत्तीनेच. ‘हे विश्वचि माझे घर’ हे एकदा मनाशी घेतल्यावर कुठला मायदेश नि कुठला परदेश?

आदिमानवाला कृषिसंस्कृतीचा पहिला साक्षात्कार दाढीमुळेच झाला असावा, असे काही मानववंश शास्त्रज्ञांचे मत आहे. धारदार शस्त्राचा पहिला उपयोग श्मश्रूकार्यासाठीच झाला असावा, असेही पुरावे दिले जातात. त्यादृष्टीने लोहाचा उपयोग धारदार पाती तयार करण्याचे ज्यास सुचले, त्यास पायघोळ दाढी असणार, हे कोणीही ओळखेल. पुढे आलेल्या पुराणकाळात ऋषिमुनींनी दाढ्या वाढेपर्यंत संस्कृतमध्ये श्लोकबिक सुभाषिते वगैरे लिहून ठेवले. त्यातील काही श्लोक आपल्या वाट्याला (वीस मार्कांसाठी) येतात, याबद्दल विद्यार्थीवर्गाने कृतज्ञ राहायला हवे. ऋषिमुनीवरांना दाढी वाढवणे तसे कंपल्सरीच असे. कारण, दाढीच्या लांबीवरच ऋषिवर्यांच्या ज्ञानाची खोली ठरत असे. छातीपर्यंत रुळलेली दाढी, शुभ्र केस, तेज:पुंज चेहरा अशा लक्षणांनी युक्त अशा मुनिवरांनी नुकतेच तपश्चर्येचे वारुळ झटकले असल्याची खात्री पटत असे.

दाढीला संस्कृत भाषेत दाढिका, लप्सुद, शिंगी, कूर्चम, श्मश्रू, आस्यलोमन, मुखरोमन अशी संबोधने आहेत. पैकी मुखरोमन हा शब्द रोमन संस्कृतीतून आला असावा, असेही काही मानववंशशास्त्रज्ञांचे (दु) मत आहे. आम्हाला ते मान्य नाही. हिंदी शब्द कोशात आम्ही ‘श्मश्रू’ या शब्दाचा अर्थ पाहात असता ‘ठोढीपर उगनेवाले बाल’ असा अर्थ आढळल्याने आम्ही घाबरुन शब्दकोश मिटलाच!! पुन्हा असो.

सर्वसाधारणपणे प्रदीर्घ काळ घरी राहणाऱ्या इसमाला दाढीकर्म करण्याचा विलक्षण कंटाळा येतो. (आम्हाला तर आंघोळीचादेखील येतो.) बाहेर कुठे जावयाचेच नाही तर दाढीचे खुंट राहिले तर काय बिघडले? असा काहीसा विरक्त विचार यामागे असतो. तथापि, सुट्टीनंतर कार्यालयात किंवा कार्यक्रमास जाण्याचा योग आला तर माणसाला दाढी ही करावी लागतेच. खुंट असतील तर गुळगुळीत करावी लागते, राखली असेल तर तीस आकार द्यावा लागतो, छप्पन्न इंची छातीवर रुळणारी भरदार दाढी असेल तर तिची लांबी कमी करावी लागते. माणसाने कसे चारचौघात साजरे दिसावे! म्हणूनच काही दिव्यपुरुष परदेशी जाण्यापूर्वी दाढिकेची लांबीरुंदी व्यवस्थित करुन मगच विमानात बसतात.

माला तिलक लगाई के, भक्ती न आई साथ

दाढी-मूंछ मुराई के चले दुनी के साथ

...असे संत कबीरांनी म्हणून ठेवले आहे. या दोह्याचा अर्थ काय (असावा!) याचाच विचार करत आम्ही तूर्त दाढी वाढण्यास घेतली आहे. घराबाहेर पडण्याचा योग आला तर वस्तरा हाती घेऊच. इति.