esakal | ढिंग टांग : सुन्यासुन्या दालनात माझ्या…! (एका खुर्चीची कैफियत…)
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : सुन्यासुन्या दालनात माझ्या…! (एका खुर्चीची कैफियत…)

sakal_logo
By
- ब्रिटिश नंदी

मी एक प्रसिद्ध, परंतु अतिशय गरीब, एकलकोंडी खुर्ची आहे. मंत्रालयाच्या एका रिकामटेकड्या दालनात विषण्ण मनाने बसून असत्ये. फक्त माणसेच रिकामटेकडी नसतात.

खुर्च्या आणि दालनेही असतात. मी त्यापैकीच एक. साहिर लुधियानवीची ती नज्म मला सारखी आठवते…

मैं और मेरी तनहाई,

अक्सर यह बातें करते है…

तुम होते तो ऐसा होता,

तुम होते तो वैसा होता….

…असे काहीबाही स्वत:शीच गुणगुणत असत्ये. कुणीही इथं येत नाही. मनात खूप वाटतं, ‘त्यांनी’ यावं, कुणीतरी यावं…राजसा जवळी जरा बसा, जीव हा पिसा…लेकिन हाय! वो यहां आतेच्च नहीं! इथे फक्त आम्ही दोघी- मैं और मेरी तनहाई! गेले चौदा महिने मी त्या क्षणाची आतुरतेने वाट पाहात आहे. ‘कुणीतरी येणार येणारगं’ अशी चाहूल लागेल. पट्टेवाल्यांचा गलबला होईल. कर्मचाऱ्यांची धावपळ होईल. फायलींचे ढिगारे माझ्या समोरच्या मेजावर ठेवले जातील. त्या वजनानं ते मेज कासावीस होईल. दालनात छानदार सुगंधाची फवारणी होईल. दरवाजाची अदबशीर उघडझाप होईल.

लगबगीने ते दारात उभे राहतील! माझ्याकडे बघून मनातल्या मनात का होईना, किंचित हसतील! मग मला एक अर्धवर्तुळाकार वळसा घालून ऐटीत बसतील. माझ्या हातांवर हात ठेवतील, म्हणतील- हुश्श!!

पण कसलं काय! गेले चौदा महिने स्वारी इकडे फिरकलेलीसुध्दा नाही. तो मेला कोरोना आल्याचं निमित्त झालं, आणि स्वारीनं इथे येणंच सोडलंन! तेव्हापासून मी मोकळी, हे दालन मोकळं, इतकंच काय हा सहावा मजलाही जवळजवळ मोकळाच आहे…कोण्णीही इथं फिरकत नाही. साहेबच नाहीत, म्हटल्यावर कशाला येणारेय कुणी? चौदा महिन्यांपूर्वी त्यांना पाहिलं होतं. किती राजस मूर्ती! आल्या आल्या स्वारीनं माझ्याकडे पाहिलं पण नाही. खरं तर महाराष्ट्रातली मी नंबर वन खुर्ची! खुर्च्यांमधली पट्टराणीच! पण नशिबी असं सवतीचं दु:ख आलं! स्वारीची उठबस दुसरीकडेच चालू आहे, हे कळल्यावर इतकं दु:ख झालं म्हणून सांगू? मनातून फार्फार खट्टू झाल्ये! ते पहिल्यांदा या दालनात आले तेव्हा कित्ती छॉन वाटलं होतं. आले आणि सोबतच्या लोकांबरोबर बोलत उभेच राहिले. मग कुणीतरी म्हणालं, ‘बसा ना, साहेब!’

तेव्हा स्वारीनं खिशातून रुमाल काढला आणि मला आधी नखशिखांत झटकून काढलं! (सॅनिटायझरची तेव्हा पध्दत यायची होती…) अंगावर शहारा आला!! मग साहेब एकदाचे ‘हो-ना’ करता करता बसले एकदाचे. (स्वत:ला चिमटाही काढून घेतला होता! मी स्वत: पाहिलं होतं!!) मग उगाच समोरच्या मेजाचा ड्रावर उघडून बघितला. पुन्हा बंद केला. हे सगळं माझ्या एका हातावर हात ठेवून हं! मी ज्या दालनात बसत्ये, त्या दालनातून समुद्र दिसतो. साहेब उठून बराच वेळ समुद्रच पाहात बसायचे. अधून मधून एक उंचपुरे गृहस्थ येऊन ‘अमुक अमुक व्यक्ती भेटायला येणार आहे’ असं सांगायचे. मग साहेब घाईघाईने निघून जायचे!! पुढे पुढे तर साहेबांचं येणं बंदच झालं. गेल्या चौदा महिन्यात ना त्यांनी मला पाहिलं, मी त्यांना! अशा जगण्याला काय अर्थ आहे, सांगा बरं? एकेकाळी माझा केवढा रुबाब होता. माझी खूप काळजी घेतली जायची.. खुर्चीवर बसणारा प्रत्येक जण माझ्याकडे प्रेमाने बघायचा. एक गृहस्थ अजूनही कधी कधी येतात. मला बजावून जातात.- ‘मी पुन्हा येईन हं! आणखी थोडेच दिवस...!’

loading image